मी श्रीमती सुप्रिया काशिनाथ सोसे. माझे शिक्षण बीए बीएड झाले आहे. मी औरंगाबाद येथे राहते आणि मला एकूण पंधरा वर्षांचा शैक्षणिक अनुभव आहे. मी सध्या केंद्रीय प्राथमिक शाळा निधोना तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी सहशिक्षिका या पदावर कार्यरत आहे. माझी प्रथम जॉइनिंग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गायगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला या ठिकाणी 2007 साली झालेली होती .
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
शिक्षक होणं हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होतं. माझे वडील माध्यमिक शिक्षक होते जसं मला कळायला लागलं त्यानंतर मी स्वतःच्या मनाशी ठरवलं की मला प्राथमिक शिक्षिका व्हायचं आहे आणि हे माझं स्वप्न मी लहानपणी सर्वांना सांगायचे तेव्हा माझे वडील कौतुकाने सर्वांना सांगायचे की माझी मुलगी म्हणते मला शिक्षिका व्हायचं आहे आणि याचा त्यांना सार्थ अभिमान वाटायचा त्यामुळे इतरांप्रमाणे आयुष्यात मला कधीही डॉक्टर व्हाव इंजिनिअर व्हाव असं वाटलं नाही शिक्षिका होणे हे माझं एकमेव स्वप्न होतं.
सुरुवातीला शिक्षक हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
अडचणी बऱ्याच आल्या मी ग्रामीण भागात शिक्षण घेत होते डी एड करण्यासाठी तिथून बाहेर जावे लागणार होते तसेच त्यावेळच्या कॉम्पिटिशन नुसार डी. एड ला जायचे म्हणल्यावर बारावीला सर्वाधिक percentage असणं खूप गरजेचं होतं बारावीपर्यंत राहत्या गावात फारशा सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे मी आर्ट्स ला प्रवेश घेतला होता अंतिम उद्देश डीएड करून शिक्षिका होणे हाच होता बारावीला प्रथम थोडे कमी मार्क पडले त्यानंतर मी रिचेकिंग साठी फॉर्म टाकला त्यामध्ये माझे इंग्रजी विषयामध्ये आठ गुण वाढून आले आणि माझा दीड पर्सेंट वाढून माझा डीएड ला नंबर लागला त्या मधल्या काळात मी स्वतः खूप डिप्रेशनमध्ये जाऊन सहन केला मला असं वाटायचं की आता माझं स्वप्न पूर्ण होणार नाही परंतु नशिबाने साथ दिली आणि इंग्रजी विषयातील वाढलेल्या मार्कांनी मला मदत केली. काठावर असलेल्या मार्कांमुळे माझा नंबर वर्धा जिल्ह्यात लागला .माझा मुळ जिल्हा जालना होता. जालना वरून वर्धा जायला मला दहा तास लागायचे .तरीही मी वर्ध्याला एकटी राहिले आणि दोन वर्ष डीएड चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरही मी दूरच्याच जिल्ह्यात म्हणजे अकोला जिल्ह्यात नोकरीला लागले आणि तिथे मी चार वर्ष एकटीने काढले नंतर 2011 साली मी औरंगाबाद जिल्ह्यात पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत जिल्हा बदली करून आले. प्रत्येक ठिकाणी खूप स्ट्रगल करावी लागली ,ती चार वर्षे एवढ्या दूर एकटीने राहून नोकरी करणं असो की जिल्हा बदली करून औरंगाबाद जिल्ह्यात येणे असो. परंतु हे सर्व करत असताना कुठेही थकवा आला नाही कारण मूळ शिक्षिका होण्याची इच्छा माझी पूर्ण झाली होती आणि त्यात मला सर्वस्वी आनंद होता.
शिक्षक म्हणून पंधरा वर्षांच्या प्रवासातील असा एखादा अनुभव अविस्मरणीय आहे
हो नक्कीच मी अकोला जिल्ह्यामध्ये शिक्षण सेविका या पदावर 2007 साली जॉईन झाले तिथे चार वर्ष एकटी राहिले तेथील माझ्या पहिल्या बॅच च्या विद्यार्थ्यांनी मला जेव्हा सोशल मीडियाद्वारे शोधून काढून एकमेकांची साखळी बनवत सर्वांनी माझ्याशी संपर्क केला तो क्षण खरोखर खूप आनंदाचा होता की विद्यार्थी एखाद्या शिक्षकाला लक्षात ठेवून इतक्या वर्षानंतरही जेव्हा त्यांना व्यवस्थित सर्व कळायला लागतं आणि त्यांच्या लक्षात येतं की प्रायमरी च्या या वर्गाच्या शिक्षकांचा आपल्या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि ते अशा वेळी आपल्याला शोधून त्याबद्दल धन्यवाद देतात हा क्षण शिक्षकासाठी सर्वाधिक आनंदाचा असतो असं मला वाटतं. माझ्या त्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क करत मॅडम तुमचं शिकवण आमच्या साठी किती मार्गदर्शक आणि मोलाचं ठरलं हे मला सांगितलं तेव्हा खरोखर मला कुठलाही पुरस्कार जिंकल्याच्या आनंदापेक्षा सर्वाधिक जास्त आनंद झाला.
तुमची आतापर्यंतची सर्वात मोठी अचिव्हमेंट कोणती?
विद्यार्थ्यांना शिकवणं आणि त्यांनी ते शिकून समजून घेणे व त्यांच्या आयुष्यात यशस्वी होणे, पंधरा वर्षे नोकरीला झाले तरीही पहिल्या बॅचचे विद्यार्थी अजूनही संपर्कात असणे मला असं वाटतं यापेक्षा मोठी अचिव्हमेंट दुसरी कोणतीही नाही. या पंधरा वर्षांच्या सेवे दरम्यान ओबीसी फाउंडेशन इंडिया हा राज्यस्तरीय, तसेच शिक्षक समिती औरंगाबाद यांचा जिल्हा पुरस्कार अशा दोन पुरस्कारांनी मी सन्मानित झाले. सुरुवातीची चार वर्ष मी 5 ते 7 वी वर्गाला विज्ञान आणि गणित विषय शिकवला व जिल्हा बदली करून आल्यावर गेली अकरा वर्ष मी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवते आहे. या शाळेत आल्यावर श्री संदीप गुंड यांची शाळा बघायला आम्ही पष्टेपाडा ठाणे,तसेच कुमठे बिट येथे गेलो आणि त्यातून प्रेरित होऊन सध्याची केंद्रीय प्राथमिक शाळा निधोना तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद ही शाळा आम्ही डिजिटल केली त्यासाठी लोकसहभाग जमवला, गावात फिरलो, लोकांना शाळेला निधी द्यावा म्हणून विनंती केली, लोकांनीही चांगला प्रतिसाद देत जवळजवळ दोन लाख रुपये जमा केले, त्यानंतर आम्ही डिजिटल क्लासरूम तयार केली शाळेसाठी एक मोठा एलईडी टीव्ही घेतला, सुशोभित सुंदर रंगरंगोटी केलेली एक वर्ग खोली तयार केली ,शाळेत झाडे लावली, प्रसंगी पैसे कमी पडत असल्यामुळे स्वतः पेंटिंग काम केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामीण पालकांना इंग्रजी शाळेचे असलेले वेड कमी करण्यासाठी आणि आमच्या शाळेची अधिकाधिक प्रगती करण्यासाठी आम्ही सेमी इंग्रजी माध्यम सुरू केलं व त्यांनतर 31 मार्च 2017 ला डिजिटल शाळेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात केलं औरंगाबाद जिल्ह्यात आल्यानंतरच 2014 साली माझा बीएडला नंबर लागला आणि मी बीएड पूर्ण केले आता मी एम ए च्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे.ही माझी शैक्षणिक प्रगती आहे.
समाजात शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे असे वाटते?
मुले म्हणजे आपण निर्माण केलेल्या समाजव्यवस्थेचे द्योतक आहेत आपल्या समाजात ज्या पद्धतीने शिक्षकांना सन्मान दिला जातो त्याच पद्धतीने मुलेही शिक्षकांना शाळेमध्ये सन्मान देत असतात कदाचित प्राथमिकच्या वर्गांमध्ये शिक्षकांना एवढा वाईट अनुभव येत नाही पण मी पाहिले की वरच्या वर्गांमध्ये शिक्षकांनाही विद्यार्थ्यांकडून वाईट अनुभव येतात विद्यार्थी शिक्षकांचा सन्मान करत नाही यासाठी विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर निर्माण व्हावा म्हणून काही प्रमाणात विद्यार्थ्यांनी त्यांचे वर्तन सुधारणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे घरून त्यांच्या पालकांकडून सुद्धा शिक्षकांप्रति आदराची भावना मुलांनी ठेवावी याबद्दल पालकांनीदेखील मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी शिक्षक पेशाला व्यवसाय म्हणून न बघता एक व्रत म्हणून बघितलं पाहिजे तरच येणाऱ्या पिढ्या ना शिक्षक पूजनीय वाटतील असे मला वाटते. समाजानेही सर्व आदर्शवत गोष्टी शिक्षकांकडून अपेक्षित करून आपल्या मुलांनी कसंही वागलं तरी चालेल हा विचार सोडून देऊन आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे हे प्रत्येक पालकांचे काम आहे.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना मी सांगेल की जर तुम्ही शिक्षक होण्याचा निर्णय घेतला असेल तर प्रथमत: तुम्ही तुमची दृष्टी बदलून व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार न करता शिक्षक होण्याला एका व्रताच्या दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. शिक्षक म्हणजे समर्पण ,शिक्षक म्हणजे आदर्श ,शिक्षक म्हणजे दिशादर्शक, शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा द्वितीय पालक, शिक्षक म्हणजे समाजाला दिशा दाखवणारा ,शिक्षक म्हणजे निस्वार्थ वृत्ती या सगळ्या गोष्टी एका शिक्षकाने स्वतःचा अंगी बाणने म्हणजेच खर्या अर्थाने शिक्षक होणे असे मला वाटते.