आज आपण श्री.अमर अशोक वाघमारे (एम.ए./बी एड) यांच्या शिक्षक होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री. अमर मु. पो.कोळंब कातवड तालुका -मालवण जिल्हा- सिंधुदुर्ग इथले असून गेले २२ वर्ष ते शिक्षक म्हणून कार्य करत आहेत. आणि सध्या ते हडी नं.१ ता. मालवण जि. सिंधुदुर्ग या शाळेत शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.
‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी:
अडचणी म्हणता येतील असे काही अमर यांच्या शिक्षकी प्रवासात आले नाही. डी एड झाल्यावर दोन महीने त्यांनी पोस्ट ऑफिस मध्ये काम केले. आणि त्यानंतर लगेचच शिक्षक होण्याचे भाग्य त्यांना लाभले. नोकरी मिळवण्यासाठी त्यांना फार काळ प्रतीक्षा करावी लागली नाही.
अविस्मरणीय प्रसंग/ क्षण:
अविस्मरणीय अनुभव शिक्षक म्हणून काम करताना बावीस वर्ष कशी निघून गेली कळलंच नाही असे शिक्षक अमर सांगतात. पण आपल्याकडे असलेली इयत्ता पहिलीतील इवली इवली मुलं आज स्वतःच्या पायावर उभी राहिलेली पाहताना त्यांना खूपच आनंद होतो. त्यातही शाळा तोंडवळी सापळे बाग ही नेहमीच त्यांच्या लक्षात राहणारी शाळा आहे. समुद्र किनारी निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही शाळा यातील मुलं व पालक यांच्याशी त्यांचे फार चांगले संभाषण जुळले होते. तिथुन बदली झाली तेव्हाचा भावपूर्ण निरोप हा कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहणारा आहे असे ते म्हणाले.
अचीवमेंट्स:
आज पर्यंत शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवून विद्यार्थी प्रगतीचे अनेक प्रयोग शिक्षक अमर यांनी केले बहुतेक उपक्रमात त्यांना यश मिळाले पण कोरोना काळात आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नव्हतो तेव्हा पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा विद्यालय उपक्रम हा त्यांच्यासाठी खूपच प्रेरणादायी अनुभव होता. त्याच बरोबर त्यांच्या शिक्षक मित्रांच्या सहकार्याने सिंधुगुरू या नावाने संपूर्ण सिंधुदुर्ग व काही प्रमाणात महाराष्ट्र यांच्यासाठी सिंधुगुरू प्रज्ञा शोध परीक्षा, शिक्षकांसाठी प्रश्नमंजुषा, संगणक शिक्षण वर्ग अशा उपक्रमातून सर्वांसाठी काम केले व आजही करीत आहेत .सदैव सर्वांसाठी शिक्षक पालक विद्यार्थ्यांसाठी हेच त्यांचे ब्रीद वाक्य घेऊन शैक्षणिक काम करताना खूप आनंद होतो. असे ही ते आवर्जून सांगतात.
शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज:
नवीन आव्हाने पेलण्यासाठी नवीन तंत्रज्ञान याचे अवलोकन मुलांना व्हावे व त्यात योग्य व अयोग्य अशा दोन बाजूत तंत्रज्ञानाची विभागणी करता यावी अशी पिढी निर्माण व्हावी. तसेच समाजात आमच्या सारखी अंधारात चाचपडणारी मुलं खूप आहेत त्यांच्या साठी करियरच्या वाटा त्यांना माहिती होण्यासाठी ग्रामीण भागात याचा प्रसार व्हावा. असे मत शिक्षक श्री.अमर यांनी व्यक्त केले.
शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना सल्ला:
पुढे शिक्षक म्हणून काम करण्यासाठी उत्सुक भावी पिढीने विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांच्या कलाने प्रगत अध्ययन अध्यापन कसे करावे याचा विचार करावा. असा सल्ला शिक्षक अमर यांनी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना दिला.