आज आपण विश्वविक्रमवीर श्री.बाळासाहेब रघुनाथ चव्हाण (बी.एड) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. बाळासाहेब सर हे डहाणू येथे राहत असून त्यांना शिक्षण क्षेत्रात १६ वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचलित के. एल. पोंदा हायस्कूल, डहाणू या शाळेत कार्यरत आहेत.
चैतन्यपूर्ण उषःकाल झालेल्या सोमवारी दिनांक 20 मार्च 1978 रोजी तुरची तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी जन्म झाला. इ.1 ली ते 4 थी पर्यंत चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी प्राथ.शाळा, हणमंतपूर,- सांगली येथे घेतले त्यानंतर इ.5 वी ते 8 वी पर्यंत श्री सिद्धेश्वर हायस्कूल, तुरची,जि-सांगली या शाळेत शिक्षण घेतले पण इयत्ता 8 वी मध्ये नापास झाल्याने शिक्षण सोडून दिले. शिक्षक सोडून करायचे काय? हा प्रश्न सतावत असतानाच सुदैवाने भारती विद्यापीठ प्रशाला, तुरची फाटा ही गावात नवीन शाळा सुरू झाली. मग याच शाळेत इ. 8 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण घेतले.
पुढे HSC(12वी) लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनिअर कॉलेज,पलूस – सांगली आणि B.A.(पदवी)- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,पलूस,-सांगली येथे पूर्ण केले. व्यावसायिक अहर्ता B.Ed. यशवंत शिक्षणशास्त्र महावियालय,कोडोली,पन्हाळा,-कोल्हापूर या ठिकाणी पूर्ण केले.
शैक्षणिक अर्हता बी. ए. व व्यावसायिक अहर्ता बी.एड. प्राप्त केल्यानंतर लौकिकार्थाने परंपरागत अध्ययन-अध्यापनाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा अहर्निश संतुलित उपयोग करून विद्यार्थ्यांच्या सर्वार्थाने विकासाकडे लक्ष देणारे डहाणूतील 1926 पासून प्रबळ दावेदार ज्ञानमंदिर अर्थातच दि डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचलित के. एल. पोंदा हायस्कूल, डहाणू तालुका- डहाणू जिल्हा- पालघर या मराठी माध्यमाच्या शाळेत दिनांक 24 जुलै 2006 पासून आजपावेतो अत्यंत विनितवृत्तीने इंग्रजी विषयाचे पवित्र विद्याध्यापन कार्य करीत आहे. आज 16 वर्षे इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10 वी च्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा अध्यापनाचा अनुभव आहे. संस्थेची दुसरीकडे एकही शाखा नसल्याने बदली होणार नाही परिणामी आज मी डहाणू येथे स्वतःची सदनिका घेऊन स्थायिक झालो आहे.
तुम्हाला शिक्षक व्हावेसे कधी व का वाटले?
मी श्री सिद्धेश्वर हायस्कूल, तुरची येथे आठवीमध्ये नापास झाल्याने घरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तत्कालीन शिक्षण मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठ प्रशाला, तुरची फाटा येथे प्रवेश घेतला. त्यावेळी आमच्या वर्गात 23 मुले होती. पैकी 22 जन सातवी पास होऊन आठवीत आलेले होते. मी एकटाच आठवीत नापास होऊन पुन्हा आठवीतच होतो. त्यावेळी मला इंग्रजी वाचता येत नव्हते. दोन-चार शब्द फक्त वाजता यायचे. नवीन शाळा असल्यामुळे दोनच शिक्षक होते. त्यांनाही अध्यापनाव्यतिरिक्त इतर ही अनेक कामे असायची, त्यावेळी शिक्षक वर्ग प्रतिनिधींना वाचन घेण्यास सांगायचे. बहुतेक सर्वांना वाचता यायचं. दोन तीन विद्यार्थी असे होते की त्यांना इंग्रजी वाचता येत नव्हतं. त्यामध्ये मी एक होतो. शिक्षकांनी वाचता न येणाऱ्यांसाठी शिक्षा ठरवून दिलेली. ती म्हणजे ज्यांना वाचता येतं त्यांनी खाली बसवायचं,आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांनी उभा राहायचं. सर्वांचे वाचून झाल्यानंतर जे विद्यार्थी बसले असतील, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. त्या प्रत्येकाने उभा असलेल्या प्रत्येकाला नाक धरून जोरात थोबाडीत मारायची. मुलांनी मारलेलं काही वाटायचं नाही पण मुलींनी मारलेलं खूप मनाला लागायचं. मग वाचन शिकण्याचा निर्धार केला. अमेरिकेचे माजी राष्ट्राधक्ष बराक ओबामांच्या “ Everyone has potential to change the whole world” या ओळीने प्रभावित होऊन अभ्यास करण्याचा निर्धार केला. प्रत्येक शब्दाच्या खाली त्या शब्दाचा उच्चार पेन्सिलने लिहून घेतला. घरातून शाळा तीन किलोमीटर अंतरावर होती, रस्ता निर्जन होता, कोणीही ये-जा करत नव्हते, सोबत कोणीही नसायचे. मी एकटाच तीन किलोमीटर चालत जायचो. मी शाळेपर्यंत प्रत्येक शब्दाचा उच्चार मोठ्याने वाचत जात असे. या नित्यक्रमामुळे मला थोडं थोडं वाचता येऊ लागलं. मी वाचण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यामुळे रोज मिळणारी शिक्षा बंद झाली. तेव्हा ठरवलं की आपण शिक्षक व्हायचं.
अभ्यास केला तर आपल्यालाही वाचता येऊ शकतं हा आत्मविश्वास माझ्यामधे आला. मग मी रोज घरातून शाळेत येईपर्यंत सर्व विषयांच्या प्रश्नांची उत्तरं वाचत येऊ लागलो. प्रथम घटक चाचणी परीक्षेत चक्क मी सर्व विषयात पास झालो. विद्यार्थ्यांचे सोडा पण शिक्षकांनाही मी पास झालो यावर विश्वास बसत नव्हता. शिक्षकाने तर खात्री करण्यासाठी मला काही प्रश्नही विचारले. त्यानंतर सहामाही परीक्षा आली सहामाही परीक्षेत सुद्धा नेहमीप्रमाणेच अभ्यास केला आणि सर्व विषयात पास झालो. नंतर तिमाही परिक्षा, वार्षिक परीक्षा या चारही परीक्षांमध्ये पास झालो. आठवीमध्ये नापास होणारा मी नवीन शाळेत आठवीत प्रथम क्रमांकाने पास झालो.नववीत सुद्धा माझा पहिला नंबर आला. आणि दहावीच्या परीक्षेत सुद्धा 78.14% गुण मिळवून प्रथम क्रमांक आला. आजही शाळेत कधी गेलो तर बोर्डावर लिहिलेले नाव वाचून अभिमान वाटतो.
ज्या विद्यार्थ्याला शिकवणे तुम्हाला कठीण वाटते त्याला तुम्ही कसे हाताळता?
अशा विद्यार्थ्याला गरज असते ती समजून घेण्याची. मी त्या विद्यार्थ्यांशी स्नेहपूर्ण आणि मित्रत्वाचं नातं निर्माण करतो. मित्रत्वाच्या नात्याने कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेतो. त्याच्या शिकण्यातल्या अडचणी समजून घेतो. सुरुवातीला त्याला आवडतील अशाच गोष्टी किंवा बाबी त्याला करण्यास सांगतो. तो सहज करू शकेल असेच कार्य त्याला देतो. त्यातून त्याला आपणही करू शकतो हा आत्मविश्वास येतो. सोप्याकडून कठीण या संकल्पनेचा उपयोग त्याला अध्यापनासाठी वापरतो. शाळेतील बहुतेक कामे मी त्यालाच सांगून त्याचा आत्मविश्वास वाढवितो. अध्यापन करताना सोप्या गोष्टी नेमक्या मी त्यालाच विचारतो. आणि तो उत्तर देत नाही तोपर्यंत एकच घटक वारंवार शिकवितो. त्या विद्यार्थ्याला समजले की सर्व वर्गाला समजले असे मी मानतो. त्याच्या बाजूला बसून एक एक घटक त्याला समजावून सांगतो. इतरांपेक्षा जास्त सराव त्याचा करून घेतो. इतरांपेक्षा जास्त त्याला गृहपाठ देतो. नित्यनेमाने त्याचा गृहपाठ तपासतो. काही चुकले असल्यास त्याला तेथेच समजावून सांगतो. असे झाल्यामुळे त्याला अभ्यासाची आवड निर्माण होते. जास्तीत जास्त अभ्यास करू लागतो. परिणामी परीक्षेत गुण सुद्धा चांगलेच मिळतात. खरंच अशा विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शनाची नितांत गरज असते. त्यांची गरज ओळखून त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करीत असतो. त्यांच्याशी जवळीकता साधून आपला हेतू साध्य करीत असतो. आज पर्यंत अनेक इतरांसाठी वाया गेलेले विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन त्यांच्या जीवनात यशस्वी झाले आहेत. हे आवर्जून सांगावसं वाटतं. खरंच त्यांची गरज आहे ती शिक्षकांनी आपल्याशी आपलेपणाने वागावे. हीच त्यांची आपलेपणाची गरज मी पूर्ण करीत असतो.
तुम्ही विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करता?
असं म्हणतात की विद्यार्थ्यांना काय शिकायचे? कसे शिकायचे? हे शिकविणे म्हणजे शिक्षण! मी नेहमीच विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये असणाऱ्या बलस्थानावर भर देत असतो. आपल्याकडे काय नाही? आणि आपल्याकडे काय आहे? या दोन्ही गोष्टींची यादी बनवायला सांगून, स्वतःच आत्मपरीक्षण करायला सांगतो. त्यांच्या दोन्ही याद्या पाहिल्या तर आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींची यादी खूप मोठी असते; तर नसणाऱ्या गोष्टींची यादी खूप छोटी असते. हे त्यांच्या लक्षात आणून देतो. म्हणून त्यांना प्रेरणा मिळते.
तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना कसे motivate करता?
या वर्षात तुम्हाला काय मिळवायचे आहे? हे ठरविण्यास सांगतो. वर्षभरात आपल्याला काय मिळवायचे आहे हे ठरल्यानंतर रोज रात्री झोपताना अंथरुणावर बसून डोळे बंद करून या वर्षात जे आपल्याला मिळवायचे आहे? ते आपल्याला मिळाले आहे याचा विचार करायचा. आणि त्यानंतर झोपायचे. असे केल्याने वातावरणामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात. आणि आपल्याला जे हवे आहे ते नक्की मिळते. याचा मी घेतलेला अनुभव विद्यार्थ्यांना सांगतो. जगातील सर्वच यशस्वी माणसे माईंड पॉवर टेक्निक वापरतात. हे तंत्र वापरून आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो हे पटवून देतो. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण अभ्यासाला बसतो त्या ठिकाणी आपल्याला काय मिळवायचे आहे हे मोठ्या अक्षरात लिहून ठेवायला सांगतो. त्याने त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आणि लहरी निर्माण होतात. आणि ज्या ठिकाणी सकारात्मकता असते तेथे यश नक्कीच मिळते. इंटरनॅशनल कोच आणि मोटिवेटर समीर नारद यांच्याकडून हे शिकून मी मिळवलेल्या यशाची गाथा विद्यार्थ्यांसमोर सांगून त्यांना प्रोत्साहित करीत असतो.
तुम्हाला पालकांशी संवाद साधायला आवडते का? मुलांच्या पालकांसोबत तुमचे संबंध कसे आहेत?
काही विद्यार्थी अगदीच अबोल असतात. घराबाहेर इतरांशी अजिबात बोलत नाहीत. इतरांनी विचारलेल्या गोष्टींना फक्त प्रतिसाद देत असतात. जितकं विचारलं तितकंच! असे विद्यार्थी जेव्हा शाळेत येतात तेव्हा त्यांना येणाऱ्या अडचणी, होणारा त्रास, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा ते शिक्षकांना सांगत नाहीत. ते सारं मुकाट्याने सहन करत असतात. घरी गेल्यानंतर या साऱ्या गोष्टी आपल्या पालकांना सांगतात मग पालक शिक्षकांशी संपर्क साधून त्या विद्यार्थ्याच्या अडचणी किंवा समस्या सोडविल्या जातात. याच प्रांजल उद्देशाने प्रत्येक शाळेत पालक शिक्षक संघ स्थापन करण्याचा शासन निर्णया आहे. आमच्या शाळेत असणाऱ्या पालक शिक्षक संघाचा सचिव म्हणून मी काम पाहत आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या बहुतेक पालकांशी माझे संबंध येतात. आई वडील हे विद्यार्थ्यांचे पहिले पालक तर मी स्वतःला विद्यार्थ्यांचा दुसरा पालक समजतो. शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना येणाऱ्या प्रत्येक अडचणीमध्ये मदत करीत असतो. पालकांना मी विद्यार्थ्यांबद्दल जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आणि कमीत कमी तक्रारी सांगत असतो. ओळख झालेल्या पालकांची सुखदुःखात सहभागी होण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. पालक घरातील शुभ कार्याचं मला साग्रह आमंत्रण देतात आणि मी ही आवर्जून कार्यक्रमास उपस्थित राहतो. शाळेतील विद्यार्थी आणि पालक हक्काने मला फोन करतात. येऊन भेटतात. आमच्या मध्ये आता एक कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला आहे. पालक आपल्या पाल्याबद्दल निश्चिंत आहेत. विद्यार्थी आणि पालक यांना अजिबात असुरक्षितता आणि परकेपणा अजिबात वाटत नाही. पालक , विद्यार्थी आणि माझ्या मध्ये निर्माण झालेला स्निग्ध स्नेह आणि जिव्हाळा कायम रहावा. यासाठी मी सतत प्रयत्नाधीन होतो, आजही आहे आणि भविष्यातही असणार आहे.
तुम्ही वर्गात तंत्रज्ञान कसे वापरता?
‘लिहिता वाचता येण म्हणजे सुशिक्षित’ ही पारंपारिक संकल्पना कालबाह्य होऊन आज माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात “तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर करणारा” सुशिक्षित ही नवी संकल्पना रूढ होत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज तंत्रज्ञानामुळे ज्ञानाचा अफाट स्रोत जगासमोर उघड झाला आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, काळाची गरज आहे. काळाबरोबर अभ्यासक्रम बदलला, पुस्तक बदलली, अध्ययन-अध्यापनाचा पद्धती सुद्धा बदलल्या. आज मी शिक्षक या नात्याने या सर्व बदलांची जाणीव ठेवून तंत्रज्ञानचा अध्यापनात वापर करतो. मी ही कालानुरूप ,समायोचित आणि यथायोग्य कार्यप्रणालीत म्हणजेच अध्यापन पद्धतीत बदल केला. तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर करतो. कारण नवीन अभ्यासक्रमात अनेक घटक तंत्रज्ञानाशी निगडीत आहेत. पाठ्यपुस्तकात आवश्यक तेथे तशा सूचनाही दिल्या आहेत.
MY ENGLISH COURSEBOOK STANDARD TEN या इयत्ता 10 वी मराठी माध्यमाच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील दिलेले पाठ्यघटकांचे अध्यापन तंत्रज्ञानाशिवाय करणे अशक्य आहे किंवा निरर्थक ठरेल.हे सर्व पाठ्यघटक तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय अध्यापन करणे म्हणजे वेळ आणि उर्जा वाया घालविण्यासारखेच आहे. तंत्रज्ञान आणि अध्यापन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजेच तंत्रज्ञानाशिवाय अध्यापन अपुरे आहे हे कटू सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. म्हणूनच आजच्या युगात प्रत्येक शिक्षकाने अध्यापन करताना तंत्रज्ञान वापरणे काळाची गरज आहे. आपल्याला अध्यापन तर करावे लागणारच आहे परंतू माध्यम थोडेसे बदलावे लागणार म्हणजेच हातातला खडू दुर करून, माऊसशी मैत्री करावी लागणार. जुने ते सोने या विचारधारेतून बाहेर पडून नवे ते हवे हा विचार स्वीकारायला हवा. आणि तो मी केला. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले व्हिडीओ सर्वाना पाहता यावे. त्यांचा सर्वाना अध्ययन – अध्यपनात वापर करता यावा यासाठी ‘ENGLISH गुरू’ या शैक्षणिक YOUTUBE CHANNEL ची निर्मिती करून आजपर्यंत अनेक व्हिडीओ अपलोड केले आहेत.
प्रत्येक इयत्तेच्या, प्रत्येक विषयाच्या, प्रत्येक पाठ्यपुस्तकात, प्रत्येक पाठ्यघटकाच्या शेवटी QR CODES दिले आहेत. त्या QR CODES त्या पाठ्यघटकासंबधी संदर्भ आणि उपयुक्त साहित्य दिले आहे. हे QR CODES स्कॅन करण्यासाठी DIKSHA APP मोबाईल मध्ये इंस्टाल करून QR CODES स्कॅन करतो. व अध्यापनात यांचा वापर करून अध्ययन-अध्यापन रंजक आणि परिणामकारक करतो. सुदैवाने माझ्या वर्गात प्रोजेक्टर बसविला असल्याने नित्य नियमाने वापर करता येतो. मी सुध्दा खूप इ- साहित्य निर्माण केले आहे.सरावासाठी 180 होमवर्क्स, आनंददायी शिक्षणासाठी 36 ऑनलाइन गेम्स, स्वयं मूल्यमापनासाठी 26 ऑनलाइन टेस्टस, संदर्भासाठी साठी 37 फ्लिप बुक्स आणि स्वअध्ययनासाठी 10 ऑडिओ क्लिप्स, 185 GIF व्हिडिओ, इत्यादी ई- साहित्याची निर्मिती केली. त्याचा नित्य अध्यापनासाठी उपयोग करत असतो. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (स्कॉलरशिप) इयत्ता – आठवीच्या इंग्रजी भाषा विषयाच्या तयारीसाठी निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित एकूण 22 व्हिडिओची निर्मिती केली आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे मार्फत माझ्या 22 व्हिडीओची निवड झाली व “शाळा बंद…… पण शिक्षण आहे” या अभ्यासमालेतून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचले. त्यानंतर केंद्र सरकारच्या दिक्षा aap वर अपलोड करण्यात आले आहेत. आज हे सर्व व्हिडिओ दीक्षा AAP वर उपलब्ध आहेत. याचा सर्वांनी अध्ययन-अध्यापनासाठी संदर्भ घ्यावा हीच प्रांजळ अपेक्षा.
शिक्षण क्षेत्रातील तुमची सर्वात मोठी Achievement कोणती?
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दरवर्षी दिला जाणारा शैक्षणिक पटलावरील प्रतिष्ठित राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार हा नव्या नावाने म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2021-22 हा पुरस्कार माध्यमिक प्रवर्गातून मला शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी मा.ना.श्री. मंगलप्रभात लोढा मंत्री, पर्यटन, कौशल्य विकास विभाग, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते , मा.ना.श्री.दिपक केसरकर मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे विशेष व्ही सी द्वारे उपस्थितीत, आमदार मा श्री कपील पाटील विधानपरिषद सदस्य, मा.श्री. रनजीतसिंग देओल (भा.प्र.से.) प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, मा.श्री. सुरज मांढरे (भा.प्र.से.) आयुक्त शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य, श्री कृष्णकुमार पाटील, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य , मा.श्री. संदीप संगवे, विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्या उपस्थितीत रंग शारदा सभागृह, के.सी. मार्ग, बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा (प.), मुंबई – 400 050 येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
शिक्षक म्हणून तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासातील एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे.
कमी शब्द वापरून जास्त वाक्य बनवण्यासाठी सेन्टेन्स बँक नावाचे स्वयंअध्ययन शैक्षणिक साहित्य विकसित केले. इंग्रजी भाषेतील फक्त 170 शब्द वापरून व्याकरणदृष्ट्या अचूक आणि अर्थपूर्ण अशी तब्बल पन्नास लाख इंग्रजी वाक्य तयार करता येतात. हे साधन वापरून मी स्वतः 5000000 वाक्य तयार केली. याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेऊन नवीन राष्ट्रीय विक्रम म्हणून घोषित केला व 2017 च्या आवृत्तीमध्ये या नवीन विक्रमाची नोंद माझ्या नावावर करण्यात आली. जागतिक दर्जाचे गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांनीही दखल घेऊन हा नवीन जागतिक विक्रम म्हणून घोषित केला व 2018 च्या आवृत्तीमध्ये विक्रमाची नोंद माझ्या नावावर केली. माझ्या नावावर एक राष्ट्रीय विक्रम आणि एक जागतिक विक्रमाची नोंद आहे.
राष्ट्रीय विक्रम जाहीर झाल्याबरोबर बातमी वाऱ्यासारखे सर्वत्र पसरली आणि स्थानिक, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील अनेक वर्तमानपत्राने ही बातमी छापून प्रसिद्धी दिली. न्यूज चॅनलचे प्रतिनिधी शाळेत येऊन माझी मुलाखत घेऊन टीव्हीवरून प्रसारित केली. इतके मोठे यश बघून मी तर भारावूनच गेलो. इंग्रजी विषयात आठवीमध्ये नापास होणारा विद्यार्थी मराठी माध्यमात शिकून इंग्रजी विषयात विश्वविक्रम करतो, अविश्वसनीय गोष्ट आहे पण हे सत्य आहे. पुढे शासनाने दखल घेऊन शिक्षणाची वारी 2017-18 मध्ये ज्ञान पंढरीच्या वारकऱ्यांना प्रकल्पाची माहिती देण्याची संधी दिली. मा.शालेय मंत्री श्री.विनोद तावडे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षणाची वारी 2017-18 मध्ये माझी कमीत कमी शब्दांचा वापर करून जास्तीतजास्त इंग्रजी वाक्यरचना बनविणे हा प्रकल्प सादरीकरणासाठी निवड झाली. मी लातूर येथे 17 ते 19 नोव्हेंबर 2017 , अमरावती येथे 15 ते 18 डिसेंबर 2017 , रत्नागिरी येथे 11 ते 13 जानेवारी 2018 आणि नाशिक येथे 29 जानेवारी ते 01 फेब्रुवारी 2018 या चार ठिकाणी उपस्थित राहून प्रत्येक जिल्हातून येणाऱ्या शिक्षकांना 170 शब्दापासून 50 लाख इंग्रजी वाक्ये तयार करणे या अविश्वसनीय प्रकल्पाची माहिती दिली. ही सुवर्ण संधी उर्जस्वल होती. याचा आनंद अविसमरणीय आहे.