S R Dalvi (I) Foundation

Tr. Bapu Sukdev Baviskar

Tr. Bapu Sukdev Baviskar

नमस्कार मी श्री बापू सुकदेव बाविस्कर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी
तालुका सोयगाव.जिल्हा औरंगाबाद.
माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण माझे मूळ गांव गोरगांवले तालुका चोपडा जिल्हा जळगांव या ग्रामीण भागात झाले असून पुढील बीएचे शिक्षण तालुक्याला कला,शास्त्र, व वाणिज्य महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव या ठिकाणी झाले आहे. मी राज्यशास्त्र या विषयात पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केले आहे.
सध्या मी औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव तालुक्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या डोंगर रांगेत निसर्गरम्य, प्रदूषणमुक्त व उत्साहवर्धक अशा ग्रामीण डोंगराड भागात साधारण 16 वर्षापासून वास्तव्याला आहे. माझ्या आयुष्यातील शैक्षणिक 16 वर्ष मी केवळ आणि केवळ दुर्गम,डोंगराळ व आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कार्य केले आहे.
माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी ही दुर्गम, अवघड डोंगराळ क्षेत्रातील शाळा आहे. ही शाळा प्रतिकूल परिस्थिती असूनही गुणवत्तेत जिल्ह्यात प्रथम 10 मध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवून नावलौकिक औरंगाबाद जिल्ह्यात नावारूपाला आणले आहे.

शिक्षक का? आणि कधी व्हावेसे वाटले?

मी वयाच्या 18 व्या वर्षी बारावी उत्तीर्ण झालो. पुढील शिक्षणासाठी माझ्या समोर अनेक पर्याय उपलब्ध होते. पण माझ्या आईचे इच्छेप्रमाणे मी शिक्षक होण्याचे पसंत केले. कारण आईचा या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होता. आईच्या बोलण्यातून अनेक वेळा या क्षेत्रातील चांगल्या गोष्टीची मला जाणीव झाली होती. आणि मी या क्षेत्राकडे आकर्षित झालो.
शालेय शिक्षण घेत असताना मला शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा जीवनक्रम मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला होता. त्यामुळे इतर व्यवसायाप्रमाणे शिक्षक व्यवसाय किती प्रमाणिक आहे याची मला जाणीव होती.

शिक्षक हे क्षेत्र निवडतांना काही अडचणी आल्या का?

हा व्यवसाय निवड तसेच त्याचे पुढील शिक्षण घेण्यासाठी मला राज्याची राजधानी मुंबई (श्रीमंत शहर ) येथे जावे लागणार होते. हे माझ्यासाठी खूप मोठे आर्थिक अडचणीचे होते. कारण याच्या अगोदरच माझं पूर्ण शिक्षण ग्रामीण भागात झालं होते. आणि मी लहानाचा मोठा ग्रामीण भागातच झालो होतो. शहरात शिक्षणासाठी जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भीती माझ्या मनात व माझ्या कुटुंबाच्या मनात होती. पण तरीही  मी मुंबईला शिक्षण घेण्यासाठी जाण्यास तयार झालो.
माझी आर्थिक परिस्थिती नाजूक होती. घरात आमच्या करता पुरुष  ही नव्हता माझे वडील मी लहान असतांनाच वारले होते. मुंबईला गेल्यावर मी पुढील दोन वर्ष मी शहरात राहून नवनवीन गोष्टी स्वीकार करून माझा डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करून माझे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

शिक्षक म्हणून कार्य करतांना अविस्मरणीय अनुभव

आज पर्यंतच्या माझ्या शैक्षणिक प्रवासाची 16 वर्ष मी केवळ गोरगरिबांच्या मुलांसाठी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांच्यावर संस्काराची बीजे रुजवण्यासाठी त्याचे व्यसन मुक्ती करण्यासाठी मी जे जे प्रयत्न केले त्यात मला जो संघर्ष करावा लागला. खास करून माझी पहिली शाळा मोहळाई तेथील सातवीच्या वर्गातील मुलांची झडती घेताना काही निरंक्षर पालकांच्या मुलांच्या खिशात मला तंबाखूजन्य आमली पदार्थ मिळाले. म्हणून मी त्या मुलांना शिक्षा केली त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी मला समाजाची प्रथा मोडत आहे असे म्हणून माझ्याशी हुज्जत घातली होती. जीवे मारण्याची धमकी ही दिली होती. पण मी माझे कार्य प्रामाणिकपणे सुरू ठेवले होते. कालांतराने त्यांच्या मुलांमध्ये सकारात्मक बदल घडलेला प्रकार पालकांच्या लक्षात आला, तेव्हा मात्र पालकांनी शाळेत येऊन माझे कौतुक केले होते. हा प्रसंग माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे.

शिक्षक म्हणून आता पर्यंतची सर्वात मोठी Achievement

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी येथे मी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग केले आहेत. ते खालील प्रमाणे:
1. स्त्री जन्माचे स्वागत.
2.गावासाठी वाचनालय.
3. एक मूल एक झाड.
4. साप्ताहिक आरोग्य भेट.
5. निर्मल ग्राम स्वच्छता.
6.100% हागणदारी मुक्त गाव.
7.100% साक्षर गाव.
8.covid 19 लॉकडाउन काळात ऑनलाइन शिक्षणाला पर्याय ऑफलाइन शिक्षण म्हणून मी नेबर कट्टा उपक्रम राबवला. सदर उपक्रमाच्या जगात टॉप 50 मध्ये समावेश होऊन भारतातील शिक्षण क्षेत्रातील एकमेव या कथेचा समावेश झाला आहे. जेव्हा मी व माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जगातील 120 देशांसोबत त्याचं सादरीकरण केले. त्यावेळेस या उपक्रमाचे जगभरातून खूप कौतुक झाले हे जीवनातील माझ्यासाठी व माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोठी अचिव्हमेंट होती.

समाजात शिक्षक व विध्यार्थी म्हणून कोणते बदल होणे गरजेचे वाटते?

 सध्या जगात खूप मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रात झपाट्याने बदल घडून येत आहे. त्यामुळे शिक्षक असो या विद्यार्थ्यांनी नवनवीन कल्पनांचा स्वीकार करून ते आत्मसात केले पाहिजे काळातील बदल स्वीकारून त्याला योग्य तो सकारात्मक प्रतिसाद दिला गेला पाहिजे. नावीन्यतेचा ध्यास घेऊन त्याचा स्वीकार करून स्वतःचा व इतरांचा विकास घडवून आणणारे शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षकांनी स्वतःला वेळोवेळी अपडेट करून घेतले पाहिजे. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. म्हणून पुस्तकाशी मैत्री केली पाहिजे. काळानुरूप होणाऱ्या बदलांचा जर आपण स्वीकार केला नाही. तर दुसरा कोणीतरी ती जागा घेऊन आपल्या पुढे निघून जाईल. त्यामुळे वेळेचे महत्त्व लक्षात घेता येणाऱ्या वेळोवेळीच्या संधी द्यायचे असतील तर आपल्याला नेहमी क्रियाशील राहिले पाहिजे .

ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?

शिक्षक हा एक पवित्र व्यवसाय आहे. या व्यवसायात आपला प्रत्यक्ष संबंध सजीव घटकाशी येतो. इतर व्यवसायात मानव यंत्राच्या सानिध्यात आपले पूर्ण वर्ष आयुष्य खर्चीत करतो. पण या व्यवसायात मात्र तसे नाही. कारण तुमच्या समोर असणारे नाजूक मनाची जिवंत सजीव घटक, विद्यार्थी तुमच्याशी त्याच्या भावना,सुख-दुःख प्रत्येक गोष्ट शेअर करतात. समाज  परिवर्तनात शिक्षकाचा खूप मोठा महत्वाचा वाटा आहे.आणि या व्यवसायात येऊन आपण सकारात्मक पिढी घडून मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणू शकतो.
म्हणून या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण हा व्यवसाय निवडावा. या व्यवसायाचा स्वीकार केल्यानंतर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, व्यवसायातील कौशल्य आत्मसात करून हसत-खेळत आदराने या व्यवसायात आपण रममाण होऊन समाधानी जीवन जगावे.