नमस्कार मी बसवेश्वर बालाजीराव कल्याणकस्तुरेपाटील (MA. B. Ed). मी साखरपा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे राहतो. गेले 15 वर्षे मी शिक्षक या क्षेत्रात कार्यरत आहे.दहा वर्षे जि. प. पू. प्राथमिक केंद्रशाळा वाडीखुर्द शिकवत होतो आणि आता गेल्या पाच वर्षापासून *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) रत्नागिरी* येथे गणित प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
शिक्षण म्हणजे जीवन सुखकर आणि सोपे करण्याचा राजमार्ग आहे. म्हणून प्रत्येकाला शिक्षण मिळालेच पाहिजे आणि प्रत्येकाने जगाच्या बदलाच्या गतीशी स्पर्धा करायलाच हवी. भविष्यकाळातील बाबी, जीवन जगण्यास उपयुक्त ठरतील ती सर्व कौशल्ये प्रत्येकांनी आत्मसात करावेत, असे मला वाटते आणि हे सर्व शिक्षणातून मिळते म्हणून अशा प्रकारचे शिक्षण सर्वांपर्यंत पोचावे यासाठी शिक्षक म्हणून कार्य करण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात नेहमीच होती.
लहानपणी मी ज्या पद्धतीने आणि ज्या वातावरणात शिकलो ते म्हणजे अगदीच भीतीयुक्त वातावरणात, दहशतीचे आणि दबावाच्या वातावरणात, पाठांतराने, घोकंपट्टी करून शिकलो. त्यामुळे कित्येकदा हे शिक्षण नको वाटायचे परंतु नंतर हळूहळू हे समजू लागले की जीवनात शिक्षण इतके महत्त्वाचे आहे की ते सर्वांना मिळणे आवश्यकच आहे, म्हणून प्रत्येकाला जर शिक्षण मिळायचे असेल तर शिकण्याच्या बाबतीतील भीती दूर झाली पाहिजे आणि आनंदाने शिक्षण मिळाले पाहिजे, असे वाटल्यामुळे आणि आपण ते आनंददायी पद्धतीने प्रत्येकाला शिकते होण्यासाठी प्रेरित करू शकतो, असा विश्वास वाटल्यामुळे मी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला ‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
स्वयंप्रेरित असल्यामुळे मी अडचणींचा फारसा विचार केला नाही. त्यामुळे जे समोर येत गेल ते ते पार करत गेलो आणि शिक्षक होण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण केले.
शिक्षक म्हणून 15 वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे?
आत्तापर्यंत असे अनेक क्षण अविस्मरणीय आणि संस्मरणीय ठरलेले आहेत. आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात माझे विद्यार्थी सरकारी नोकरीत विविध पदावर कार्यरत आहेत, याचा मला आनंद आणि अभिमान आहे. प्रत्येक मुल दर दिवशी नित्यनेमाने माझ्या सोबत नवनवीन अध्ययन अनुभव घेऊन शिकत असतो, तो प्रत्येक अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. वेगवेगळ्या वयानुसार विद्यार्थी शिकते होण्यासाठी आवश्यक असे वातावरण निर्मिती करून देणे, त्यांना स्वतः शिकण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यामध्ये नाविन्यता देणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक आणि अविस्मरणीय आहे.
तुमची आतापर्यंतची मोठी Achievement कोणती?
माझे 500 पेक्षा आधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आहेत. तसेच मी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे गणित विषयासाठी राज्यस्तरीय प्रशिक्षक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे बालभारती मध्ये राज्य अभ्यास गट समिती सदस्य विभागस्तरीय आणि जिल्हा स्तरावर विविध प्रशिक्षण घटक संच विकसना करिता कार्य केले आहे. संगमेश्वर तालुक्यातील सांगवे हे केंद्र घेऊन त्या केंद्रातील सुमारे तीनशे विद्यार्थी गणित विषयांमध्ये 100% प्रगत करण्यात आले.
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज आहे अस वाटते?
असं म्हणतात की देशाचे भविष्य शाळेत घडते. शिक्षक हे मुलांचे भविष्य घडविण्यासाठी सुलभक म्हणून कार्य करतात तर विद्यार्थी हे देशाचे भविष्य घडवण्यासाठी शिकतात. तर भविष्यातील जगाच्या बदलाची गती समजून घेऊन शिक्षक व विद्यार्थी यांनी स्वतःला अद्ययावत ठेवावे आणि त्यासाठी सातत्याने नवनवीन बाबी शिकत राहावे लागणार आहे.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?
फक्त आणि फक्त पाठ्यपुस्तके शिकवायचे असेल तर शिक्षक होऊन फायदा नाही. भविष्याचा वेध घेऊन त्याप्रमाणे मुले घडवण्यासाठी समर्पण वृत्तीने, स्वयं प्रेरित होऊन योगदान देण्याची तयारी असेल तरच शिक्षक होण्याचा आनंद मिळेल.