माझे नाव भगवान मनोहर बुरांडे रा. बामणी (दु.) त. बल्लारपूर जिल्हा. चंद्रपूर इथे राहतो. गेले २० वर्ष मी शिक्षक या क्षेत्रात कार्यरत असून सध्या अनुदानित आदिवासी आश्रम शाळा सिंधी त. राजुरा जिल्हा. चंद्रपूर या शाळेत शिकवत आहे.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
प्राथमिक शिक्षण घेत असताना मी अभ्यासु होतो आणि नेहमी वर्गातून प्रथम येत होतो साहजिकच त्यामुळे माझे शिक्षक मला जवळ घ्यायचे आणि प्रेमाने वागवायचे. मी त्यांच्या संस्कारात वाढलो शिक्षकांचे काम त्यांना शिकवण्याची पद्धत खुप जवळून पाहिले हळूहळू क्षेत्राबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागले आणि मग शिक्षक होण्याची इच्छा निर्माण होऊ लागली हाच विचार मी कायम ठेऊन पुढे शिक्षण पूर्ण करून शिक्षक झालो.
सुरुवातीला ‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
हो , सुरुवातीला आदिवासी आश्रम शाळा येथे माझी नेमणूक झाली होती त्यामुळे तिथे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.अती संवेदनशील क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थ्यांना भाषेची अडचण असते, लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे तिथे रुजू झाल्यावर आम्ही सर्वप्रथम त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.
शिक्षक म्हणून 20 वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे
मला संगीत विषयाची आवड आहे. विद्यार्थ्यांना गायन, वादन आणि नृत्य शिकवायला मला खुप आवडते. मी शिक्षक म्हणून काम करतो त्या शाळा संचालकांनी याची दखल घेत शैक्षणिक अर्हता, व अनुभव यामुळे पदवीधर शिक्षक पदोन्नती दिली हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे .
तुमची आत्तापर्यंतची मोठी Achievement कोणती?
कोरोना काळात आदिवासी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकविण्याचे कार्य केले त्यामुळे एस. आर. दळवी फाऊडेशन मुंबई तर्फे शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व जागतिक शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. डीसले सर यांचे हस्ते महाशिक्षक पुरस्कार प्राप्त झाला ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे.
समाजात शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे असे वाटते?
मी आदिवासी भागातील शाळेत शिक्षक असल्यामुळे त्यांचे जीवन मी खुप जवळून पाहिले आहे. तेव्हा माझ्या ही गोष्ट लक्षात आली की आदिवासी विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणासाठी पोषक वातावरण नसते. त्यामुळे शिक्षकांनी त्यांच्या बोलीभाषेत शिकवून,त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी हे बदल करणे आवश्यक आहे.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
शिक्षक व्हायचे असेल तर, प्राथमिक शिक्षण घेत असताना समाजातील अनेक घटकाशी,शिक्षकांशी आदर युक्त वागणे,गायन, वादन,खेळ इत्यादी कला अवगत करणे गरजेचे आहे.