आज आपण भावेश रमेश संखे (B.Sc,M.A (Eng & Edu),B.ed,D.ed,DSM,CPCT, Vedik maths course, CET, PET) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. भावेश सर हे पालघर येथे राहत असून त्यांना शिक्षण क्षेत्रात १४ वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळा पालघर तालुका जिल्हा पालघर या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
आयुष्याच्या वाटेवर येणाऱ्या विविध प्रसंगानुसार माणसाला बदल करावासा वाटतो परंतु या बदलाला सामोरे जाताना कसे वाटत असेल ? असा मनात नेहमीच प्रश्न पडत होता. जीवन जगत असताना आपण काय होणार? असे प्रश्न लहानपणी बरेच नातेवाईक तसेच मित्रमंडळी विचारत असे.त्यावेळेस कदाचित शिक्षक हे आयुष्यात पदरी पडेल असं कधीच वाटलं नव्हतं… परंतु जस जसे शिक्षण घेत गेलो तस-तसे होणारे बदल लक्षात घेता भविष्यकालीन पिढीला योग्य ती वाटचाल देण्यासाठी शिक्षक बनावे असं वाटू लागले.घरातील वातावरण त्यासाठी सकारात्मक होते. शिक्षकांमध्ये विशिष्ट वेगळ्या प्रकारची ताकद असते तसेच आपल्या कार्यात कार्यतत्पर असतात हे मला नेहमीच सांगण्यात आलं.
माझी शिक्षक बनण्याची कथा थोडी वेगळी आहे…बारावी विज्ञान शाखेतून पास झाल्यानंतर इंजिनीयर शाखेमध्ये प्रवेश घेण्यात आला परंतु या इंजिनियर कॉलेजमधील न परवडणारा खर्च मी स्वतःहून अनुभवत होतो आणि त्याच वर्षी माझे वडील शिपाई या पदावरून निवृत्त झाले होते… घरात कमावणारे एक व त्यांच्यावर अवलंबून असलेले आम्ही पाच बहिण भावंड त्यामुळे स्वतःहूनच विचार करून माझ्याच पालघर मध्ये सुप्रसिद्ध असलेल्या डीएड कॉलेजमध्ये माझा नंबर लागला व कसलाही विचार न करता मी माझं इंजीनियरिंग शाखा बदलून डीएड शाखेला प्रवेश घेतला. बऱ्याच जणांनी मला त्यावेळेस तू चुकीचा निर्णय घेतला असे सांगितले परंतु आपल्यातच असलेल्या कौशल्याचा निश्चितच कुठेना कुठे वापर नक्कीच होईल हे मनाशी ठाम धरलं होतं आणि त्यामुळे मी डीएड करण्यास समाधानी होतो…आयुष्यात खरी उभारी मला डीएड कॉलेजने दिली कारण त्या कॉलेजमधून मिळालेले सर्वगुण व अनुभव सध्याच्या बदलत्या शिक्षण प्रवाहाला अतिशय वेगवान पद्धतीने पुढे घेऊन जाणारे आहेत… डीएड कॉलेजमधून चांगला अभ्यासाने प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन लगेच आमच्या पालघर मधील सुप्रसिद्ध अशी भगिनी समाज शाळा,पालघर यामध्ये एकही दिवसाचा खंड न पडता माझी नियुक्ती झाली…त्यानंतर सुखकर प्रवास अतिशय आनंदाने तसेच समाधानाने सुरू झाले…
शिक्षक म्हणून काम करताना विविध अनुभव पदरी पडतात…या अनुभवातूनच आपण आपल्यातील अध्ययन अध्यापनातील त्रुटी समजून घेत असतो.. एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते… आमच्या शाळेत दरवर्षी आठशे नऊशे विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गात असतात..त्यामुळे मागील दोन-तीन वर्षांपूर्वी उपक्रमांची सलग मालिका इयत्ता ७ वी च्या वर्गासाठी सादर करण्यात आली…या मालिकेतून मिळालेले माझ्या शाळेतील विद्यार्थीरत्न अतिशय जवळून पाहता आले..त्यांच्यातील क्षमता ओळखण्यास मदत झाली.. विद्यार्थ्यांना योग्य त्या कृतीमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी त्या काळापासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची मांदियाळी सुरूच आहे…
गणिताचे अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना तो विषय कसा आवडीचा होईल ? याकडे माझे बारकाईने प्रयत्न सुरू होते…या सर्व प्रयत्नाला जोड दिली ती म्हणजे माझ्या गुरुप्रिय विद्यार्थ्यांनी…विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दलची विविध स्पर्धा,सोप्या पद्धतीने सांगण्यात आलेल्या आकडेमोड,विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने सांगण्यात आलेल्या गणितीय पद्धती तसेच त्या गणिताचा नेमका अर्थ काय ? व त्याचा जीवनात कुठे कुठे उपयोग होऊ शकतो…या सर्वांची सांगड घालून ज्यावेळेस अध्यापन करत होतो त्यावेळेस काही विद्यार्थ्याने मला गणित विषयात आम्ही पैकीच्या पैकी गुण मिळूनच दाखवेल असा निश्चय केला होता… मला त्याचा आत्मविश्वास बघून खूपच बरं वाटलं. परंतु गणित विषयाचे पेपर सोडवताना झालेल्या साधक-बाधक चूका ज्यावेळेस विद्यार्थ्यांच्या लक्षात आले त्यावेळेस अजून कटाक्षाने विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केला व त्यातूनच आत्मविश्वासाचा उच्चांक गाठत त्या विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवलेच…आणि हा अनुभव माझ्या शिक्षण क्षेत्रातील आत्मविश्वासाचा कस लावणारा ठरला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा परीक्षा तसेच गणित व विज्ञान विषयांच्या विविध संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना नियमितपणे मार्गदर्शन करण्यात येत होते व या मार्गदर्शनामुळे दरवर्षी होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत विद्यार्थ्यांची निवड झालेली दिसून आली तसेच शारिरीक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कबड्डी व खो-खो चे धडे प्राथमिक स्तरावर ती देण्यात आले व त्याचा फायदा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात झालेला दिसून आला.. माझ्या शाळेतील काही विद्यार्थी पालघर तालुका तसेच पालघर जिल्हा स्तरावर संघामध्ये निवड होऊन पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य त्यांना मिळाले…या चौदा वर्षात केलेल्या नावीन्यपूर्ण विविध उपक्रम तसेच शिक्षकांच्या स्पर्धेत घेतलेला सहभाग या सर्वांची दखल घेऊन आतापर्यंत तीन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच आमच्या शाळेतील जेष्ठ संस्थाचालक सदस्या व सल्लागार आदरणीय चित्रे बाई यांच्या हस्ते रोख पारितोषिक घेताना काहीतरी केल्याचे सार्थक वाटत होते…
हल्लीच्या समाजात शिक्षक आणि विद्यार्थी यांमधील नाते खुपच वेगळे असून त्यामध्ये विविध प्रकारची काळजी घेणे अपेक्षित आहे..बदलता काळ हा विद्यार्थ्यांना खूप काही सांगून जातो परंतु समाजाचा बघण्याचा एकांतरित दृष्टिकोन हा शिक्षकाप्रति मागील काही वर्षा पासून वेगळा बनत चालताना दिसून येतोय..शिक्षक आणि विद्यार्थी हे शालेय जीवन घटकातील रथ हाकणारे दोन महत्त्वाचे चाके आहेत.या दोघांचा समतोल राखला नाही किंवा यातील एकाचा समतोल बिघडला तरी भविष्यकालीन पिढी वेगळ्या वाटेवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण पद्धतीने तसेच रंजक पद्धतीने शिकवण्यासाठी शिक्षकाने तत्पर असणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना कोणत्या प्रकारचे अध्यापन करणे सोपे जाईल हेदेखील शिक्षकाने बघणे तेवढेच सोयीस्कर ठरेल. अपेक्षांच ओझ हल्ली पालक वर्गात खूप असल्याकारणाने येणाऱ्या नवीन पिढीचे काम सोप्या रीतीने करण्याची जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे आली आहे. शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक पालक,विद्यार्थी तसेच शिक्षकाने सकारात्मक पद्धतीने बघून त्यांच्या सुयोग्य वाटचालीमध्ये हातभार लावणे खूपच लाभदायक ठरेल. तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या पद्धती शिक्षकांनी अवगत करणे गरजेचे आहे. कोणतेही काम करताना चे किती सकारात्मक व चांगले आहे हे शिक्षकांनी नेहमीच बघितले पाहिजे. इतर कोणत्याही नकारात्मक बाबींचा विचार न करता विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काय योग्य ती कार्यवाही करता येईल हे पुढाकार घेऊन त्या शिक्षकांनी सक्षम पणे करणे हल्लीच्या वेगळ्या वातावरणात टिकण्यायोग्य करून ठेवायला हवे….
जाता जाता एवढंच म्हणेन…
IF YOU WANT TO LIKE BECOME THE SUN,FIRST YOU BURN LIKE THE SUN…