मी दर्शन पोचीराम भंडारे .मी पालघर या ठिकाणी राहत असून गेली १५ वर्षे मी शिक्षक या क्षेत्रात काम करत आहे. सध्या मी पालघर येथील भगिनी समाज संचलित,
प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज येथे शिक्षक आहे.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
माझ्या विद्यार्थीदशेत मी हायस्कूलला असताना सौ .मंजुळाबाई हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खतगाव, तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील शाळेत ५ सप्टेंबर दिनी, शिक्षक दिन हा विद्यार्थ्यांनी साजरा करायचे ठरविले. त्याप्रमाणे संपूर्ण दिवसाचे प्रशासन कसे चालवायचे याची माहिती शिक्षकांनी आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांना समजावून दिली होती. ठरल्याप्रमाणे एक मुख्याध्यापक, अनेक शिक्षक तर काहीजण शिपाई झाले.मला लहानपणापासूनच गाणी व कविता गायनाची आवड होती .म्हणून मी मराठी विषय शिकविण्याचे ठरवले. मग मी मराठीचा शिक्षक झालो. त्यावेळी ‘घननीळ सागराचा घननाद येतो कानी’ अशी शब्दबद्ध असलेली कवी विद्याधर सीताराम करंदीकर यांची किनारा नावाची कविता मला खूप आवडायची . ती कविता मी चालीवर खूप सुंदरतेने गात असे. आणि ती कविता मी शिक्षक बनून खूपच सुंदरतेने मुलांना शिकवली. त्यामुळे ती मुलांना खूप आवडली. त्यावेळी माझे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये पाठ निरीक्षणासाठी बसले होते. त्यांना माझे शिकवणे खूपच आवडले .आणि कविता शिकवून झाल्यावर ते म्हणाले,” मोठा होऊन जर शिक्षक झालास तर, मुलांची मने जिंकशील !” आणि मी मनात तेव्हाच ठरवून टाकले की, आपल्याला मोठं होऊन शिक्षकच व्हायचे आहे.
सुरुवातीला ‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
हो. बारावी पास झाल्यानंतर डी.एड. ला जाण्यासाठी अर्ज भरला .आणि नंबर लागला तो थेट वर्धा जिल्ह्याच्या डायट कॉलेजला. घरापासून एवढं लांब आणि एकट्याला जायचं आणि तिथे राहायचं फारच कठीण वाटू लागले. त्यात मोठी अडचण म्हणजे मला काही स्वयंपाक करता येत नव्हता. त्याचबरोबर शहरी जीवनाचा एवढ्या मोठ्या लांब प्रवासाचा आणि दैनंदिन व्यवहाराचा काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे तिथे जाऊन शिकणे म्हणजे हिमालया एवढे दडपण मनावर आले होते .पण गावातल्या शेजार्यांनी, मित्रमंडळीनी ,”अरे सहजासहजी डीएडला नंबर लागत नाही ; तुला टक्केवारी चांगली असल्याने नंबर लागला आहे तर जा. नाहीतर जिंदगीभर शिकून-सवरून अडाण्यासारखं राहायचं का तुला? वेडा कुठला ! घाबरू नकोस. आता तू मोठा झालास. हिमतीने वागायचं ! जा शिकायला!” असे जो तो सांगत होता. आणि मग काही झालं तरी आता वर्ध्याला जायचंच ,अशी मनाशी पक्की खूणगाठ बांधली .आणि मग पुढे वर्धाला गेल्यावर हळूहळू सार्या गोष्टींना जमवून घेत गेलो आणि आपोआप समस्या दूर होत गेल्या. आणि त्यानंतर सहा महिन्यात माझी बदली झाली आणि मी माझ्या गावाजवळ असलेल्या धर्माबाद येथील डीएड कॉलेजला प्रवेश घेऊन शिकू लागलो. तिथे मात्र माझ्या जीवाभावाचे मित्र मिळाले .अन मग हिमालयाएवढे आलेले दडपण नाहीसे झाले .
शिक्षक म्हणून 15 वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे
आमच्या पालघर तालुका स्तरावर एकदा डॉ. स.दा वर्तक विद्यालयाने पथनाट्य स्पर्धा आयोजित केली होती. दिलेल्या विषयाप्रमाणे , नियमाप्रमाणे माझी स्वलिखित ‘होळी आली रे, होळी!’ ही प्रदूषणावर आधारित नाटिका विद्यार्थ्यांकडून बसवून ती स्पर्धेत सादर केली आणि त्या नाटीकेला तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला . योगायोगाने त्या कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे लाभले होते ते आकाशवाणी मुंबई केंद्राशी संलग्न होते. त्यावेळी त्यांनी मला बोलावून सांगितले की, आपण आपली ही नाटिका मुंबई आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित करूया . त्यांनी केलेल्या आवाहनाला आम्ही लगेचच प्रतिसाद दिला . मग विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही मुंबईला गेलो. मुंबईच्या आकाशवाणी केंद्राच्या स्टुडिओत रेकॉर्डिंग झाले आणि दोन तीन दिवसानंतर ती नाटिका रेडिओवरून प्रसारित झाली . ही बाब मात्र विद्यार्थ्यांसाठी , माझ्यासाठी आणि माझ्या सोबत आलेल्या सहकारी शिक्षकांसाठी व मुख्याध्यापिक खूपच आनंदानुभूती देणारी आणि अविस्मरणीय ठरली.
तुमची आतापर्यंतची मोठी Achievement कोणती?
मुंबई येथे मराठी भाषा मंडळाने शिक्षकांसाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते . त्या स्पर्धेत मी प्रथम क्रमांकाने विजेते ठरलो आणि त्याचबरोबर एस. आर. दळवी फाउंडेशनकडून राज्यस्तरावर महाशिक्षक पुरस्काराने सन्मानित झालो. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी Achievement आहे.
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज आहे अस वाटते?
समाजात शिक्षकांनी आपले स्थान कायम दराचे अबाधितपणे राहील याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आचार , विचार आणि चारित्र्य संपन्नशील व्हावे .याकरिता शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत .समाजातील प्रत्येक विद्यार्थी हा आज्ञाधारक व संस्कारशील होणे गरजेचे आहे. शिक्षक विद्यार्थी या दोघांमधील गुरू-शिष्याचे पवित्र नाते जपण्यासाठी एकमेकांमध्ये आपुलकीची भावना जोपासणे गरजेचे वाटते .शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचेही वर्तन शिस्तप्रिय व संवेदनशीलतेचे होणे आजच्या काळासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुख्यत: वेशभूषेत आपण आपल्या भूमिकेत व समाजाच्या आणि नैतिकतेच्या दृष्टीने समर्पक असणे अत्यंत गरजेचे आहे .आता सध्याच्या आधुनिक युगात सोशल मिडीयाचा वापर गरजेपुरता व कामापुरता करणे आवश्यक आहे. अर्थात त्याचा वापर विधायक गोष्टीसाठी होणे गरजेचे आहे. याची काळजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांनी सर्वप्रथम आपले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ बनविले पाहिजे. ते अधिक संवेदनशील व सृजनशील बनवावे. लेखन-वाचनासहित अभ्यासू वृत्ती बाळगावी. विविध कलांचा कलाकार व रसिक बनावे. सर्वधर्मसमभावाची व समतेची भावना जोपासावी . आधुनिक शैक्षणिक साहित्याची व तंत्रज्ञानाची सखोल माहिती घ्यावी. लहान मुलांमध्ये रममाण व्हावे. त्यांच्यासोबत बोलीभाषेकडून प्रमाणभाषेत संवाद साधावा . स्वतः आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवावे. अंगी नम्रता जोपासावी . कार्यतत्परता बाळगावी ।अद्यावत घडामोडींचा वेध घेत राहावे। काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदलण्याची मानसिकता बनवावी.