आज आपण शिक्षिका सौ.दर्शना आठवले (एम. ए. बी एड) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षिका दर्शना रोहा रायगड येथे राहत असून रोह्यापासून 23 किलोमीटर लांब असलेल्या रिलायन्स फाउंडेशन स्कूल, नागोठणे-मराठी माध्यम या शाळेत गेली 28 वर्ष सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
एम ए करत असताना सौ.दर्शना यांच्याकडे थोडा वेळ होता म्हणून त्यांनी ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा दिली आणि त्यात त्या उत्तीर्ण झाल्या. तसेच त्या त्यांच्या माहेरी वाई येथील सार्वजनिक ग्रंथालयात सहग्रंथपाल म्हणून कार्य करत होत्या . एकीकडे मराठी हा विषय घेऊन एम ए करणार आणि ग्रंथालयाचा संपूर्ण खजिना त्यांच्या हाती होता याचा फायदा घेऊन त्यांनी मन लावून अभ्यास केला व प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाल्या . ग्रंथालयात नोकरी करत असताना त्याच ग्रंथालयात पुन्हा ग्रंथपालन प्रमाणपत्रचे वर्ग भरत होते तेथील संचालकांनी त्यांना ‘या वर्गाला शिकवशील का?’ असे विचारले की आणि त्यावेळेस त्यांनी लगेच होकार दिला. त्यावेळी शासनाचा नियम आलेला होता की ग्रंथालयात कार्य करणाऱ्या व्यक्तीने कमीत कमी हा कोर्स करणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्वप्रथम शिकवण्याची संधी त्यांना मिळाली ती अतिशय वयोवृद्ध अशा माणसांना आणि तिथेच कुठेतरी त्यांना त्यांच्यातली शिक्षिका सापडली. ग्रंथालयाचे संचालक त्यांच्या सतत मागे लागत असतं की, एम ए झालेली मुलगी इथे काय करते आहे? तू पुढे जा’ आणि त्यांच्या याच प्रोत्साहनाने व शिकवण्याच्या आलेल्या अनुभवाने सौ दर्शना यांनी बीएड करायचे निश्चित केले. प्रथम श्रेणी असल्यामुळे त्यांना सहज प्रवेश मिळाला व तिथेहीआवडीचा मराठी विषय असल्यामुळे डिस्टिंक्शन मध्ये त्या बीएड उत्तीर्ण झाले.
शिक्षक हे क्षेत्र निवडताना अडचणी:
शिक्षकी क्षेत्र निवडताना सौ दर्शना यांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत उलट सगळीकडून त्यांना प्रोत्साहनच मिळाले असे त्या सांगतात.आणि बीएड करत असताना सुरुवातीलाच मायक्रोटीचिंग च्या वेळी आपल्याकडे किती छान समजावण्याची कला आहे हे त्यांचे त्यांनाच उमगले. त्यापूर्वी त्यांनी कधी ही कुठल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला नव्हता फक्त गायनाची आवड असल्यामुळे कॉलेज मध्ये गाणी मात्र म्हणत असे. म्हणजे ज्याला ‘स्टेजडेरिंग’ म्हणतात ते त्यांच्याकडे होते. शिवाय आवडीचा मराठी विषय आणि त्यातील कविता हा त्यांच्या विशेष आवडीचा भाग. व्याकरण सोप्प करून सांगण्याची कला त्यांना हळूहळू अवगत झाली. हळूहळू हा प्रवास व्यवस्थित होत गेला.
अविस्मरणीय प्रसंग/क्षण
‘शिक्षक म्हणून 28 वर्षाच्या प्रवासात कितीतरी लक्षात राहावे असे अनेक अविस्मरणीय प्रसंग आले’ असे शिक्षिका दर्शना म्हणतात. मुलांना घडवत असताना आपल्याला सूत्रसंचालन उत्तम करता येते याचा शोध त्यांना लागला आणि शाळेने 28 वर्षे ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली आणि ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली सुद्धा तसेच अनेक लक्षात रहावेत असे विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी यांच्याशी एक वेगळा संवाद घडत गेला त्यांना समजून घेणे, त्यांच्या वेदना जाणून घेऊन आणि जमेल तशी त्यांना मदत करणं यातून असे अनेक दिव्यांग विद्यार्थी आज स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि आजही त्यांच्या संपर्कात आहेत. यापेक्षा एक शिक्षक म्हणून आणखी काय हवं असतं. असेही त्या आवर्जून सांगतात.
अचिव्हमेंट:
वरती दिव्यांग मुलांचा उल्लेख केला त्यांच्याशी त्यांच्या एक वेगळा संवाद होता असं म्हटलं त्याचं कारण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी आहे. 1992 साली त्यांचा विवाह झाला आणि 93 साली त्यांना एक अतिशय गोंडस असा मुलगा झाला. परंतु त्याच्या जन्माच्या वेळी दुर्दैवाने त्याच्या लहान मेंदूला चिमटे लागले आणि तो ‘मल्टिपल डिसेबल’ झाला. आता खरे आव्हान होते; लढाई होती नियतीशी! परंतु त्यांच्यातली आई आणि शिक्षिका खंबीरपणे या गोष्टींशी दोन हात करायला सज्ज झाली शिक्षिका म्हणून माहीत असलेल्या सर्व गोष्टी त्यांनी त्याच्याकडून करून घेणे, त्याच्या वाणीवर संस्कार करणं, शक्य आहे तेवढे त्याला घडवणे हे काम एखाद्या आई पेक्षा शिक्षिका जास्त चांगले करू शकते असं त्यांना त्या वेळी पदोपदी वाटले. या बाळाला लहानाचे मोठे करत असताना आजूबाजूला लक्ष गेले तेव्हा आपल्या बाळापेक्षा सुद्धा वाईट स्थितीत असलेली कितीतरी मुलं आहेत हे लक्षात आले आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या गोष्टीची जाणीव त्यांना झाली. आणि याच जाणिवेतून, प्रेरणेतूनच 2006 साली रोह्या मध्ये ‘ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेची’ स्थापना करून गेली 15 वर्ष ही शाळा त्या स्वतः हा संचालित करत आहेत. ही शाळा जेव्हा सुरु केली तेव्हा केवळ सहा विद्यार्थी होते आज त्या ६ चे ५० विद्यार्थी झाले आहेत.तीन प्रशिक्षित शिक्षक त्या शाळेत आहेत. त्यांच्यासाठी ही त्यांच्या माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे.
समाजात शिक्षक आणि विद्यार्थी काय बदल होण्याची गरज:
आज समाजात शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्ही घटकांचा एकमेकांशी काही संबंध राहिलेला दिसत नाही त्याचे कारण आपले शैक्षणिक धोरण. आठवीपर्यंत विद्यार्थी नापास होणार नाही हा नियम आल्यामुळे म्हणजे या नियमाचा चुकीचा अर्थ घेतल्यामुळे सर्वच विद्यार्थी पुढे जाणार तर त्यांना काय शिकवायचं कशाला शिकवायचं? असा प्रश्न घेऊन शिक्षक उभा आहे आणि आपण जर नापास होणार नाही. तर अभ्यास कशाला करायचा? हा प्रश्न घेऊन विद्यार्थी उभा आहे यामध्ये पिढ्याच्या पिढ्या बरबाद होत आहेत याची कोणालाच खंत नाही. कदाचित आमच्यासारख्या संवेदनशील शिक्षकांना आहे. परंतु समाजाला नाही. बदल व्हायचा असेल तर निश्चितपणाने आवडेल ते शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्याला मिळायला हवी आणि टक्क्यांच्या मागे न धावता आणि खाजगी क्लासेसवाल्यांची चंगळ न करता जर शिक्षकांनी निश्चित केलं की माझा विद्यार्थी शाळेमध्येच घडेल तर खऱ्या अर्थाने काही बदल झाला तर होऊ शकेल. असे मत शिक्षिका दर्शना यांनी व्यक्त केले.
तसेच आज-काल शिक्षक होणं सोपं राहिलं नाही. अनेक दिव्यातून जावं लागतं. सीईटी द्या, एकाऐवजी तीन वर्ष अभ्यास करा आणि शिक्षक व्हा असे होत आहे आणि शिक्षक झाल्यानंतर सुद्धा नोकरीची खात्री मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाला शिक्षकांच्या हाताखाली शिकायचं असतं पण शिक्षक व्हायचं नसतं हे दुर्दैव आहे. पूर्वी आपल्या शिक्षकांना पाहून एक प्रेरणा व्हायचं नसतं हे दुर्दैव आहे. पूर्वी आपल्या शिक्षकांना पाहून एक प्रेरणा मिळत असे की आपणही आपल्या शिक्षकासारखं व्हावं, आपल्यालाही शिकवता यावे. तो आनंद आमच्या पिढीने पुष्कळ घेतला. इथे एक चिंतनही करावेसे वाटते की आपण विद्यार्थ्यांसमोर तसा आदर्श निर्माण करू शकत नाहीये का? परंतु भविष्यामध्ये शिक्षक हा अध्यापक व्हावा, पोटार्थी होऊ नये. एवढीच अपेक्षा. शिक्षक अवश्य व्हा परंतु एक ध्येय घेऊन पुढे या शिक्षक अख्खी पिढी घडवत असतो त्याच्या वर्तनाने संपूर्ण पिढीवर परिणाम होऊ शकतो. सगळेच आदर्श शिक्षक होऊ शकत नाहीत पण चांगले शिक्षक नक्कीच होऊ शकतात. अशी भावना शिक्षिका सौ दर्शना यांनी व्यक्त केली.