आज आपण श्री दिपक जिजाबराव ठाकरे (BA, B.Ed) यांच्या शिक्षक प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षक दिपक यांचे मूळ गाव शिरपूर जि. धुळे हे आहे व ते सध्या जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शाळा राठीवडे गोंजीचीवाडी शाळेत म्हणून कार्यरत आहेत. गेली ११ वर्षे ते शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. 2006 या वर्षी तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पूरके साहेबांनी शाळेत 3 महिन्यासाठी वाचन लेखन उपक्रम राबविला होता, त्याअंतर्गत शाळांवर स्वयंसेवकाची नेमणूक करायची होती. त्यांचे वडील शिक्षक असल्याने त्यांनी त्यांच्या शाळेत दीपक सरांना स्वयंसेवक म्हणून नेमले. या 3 महिन्यात मुलांना शिकवण्याचा अनुभव त्यांना खूप आवडला, मुलांच्या निरागस आनंदात आपल्याला नेहमीच सहभागी होता यावं म्हणून त्याक्षणी मनाशी ठरवले होते की त्यांना शिक्षक व्हायचं आहे. आणि ठरवल्याप्रमाणे त्यांनी D.Ed केलं आणि 2010 वर्षी झालेल्या CET परीक्षेतून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले.दीपक सरांचे वडील शिक्षक असल्याने या पेशाबद्दल अगदी जवळून ओळख असल्याने शिक्षक पेशा स्विकारताना त्यांना काही अडचण आली नाही.
शाळेत शिवजयंती निमित्ताने त्यांनी विद्यार्थ्यांची शिवाजी महाराज व त्यांचे मावळे अशी वेशभूषा करून त्यांची गावात मिरवणूक काढून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते, त्याप्रसंगी गावातील सर्वांना तो कार्यक्रम खूप आवडला, गावच्या इतिहासात असा कार्यक्रम कधीही झाला नव्हता म्हणून सर्व ग्रामस्थांनी त्यांच्या कामाचे खूप कौतुक केले. तो प्रसंग त्यांच्यासाठी खूप अविस्मरणीय आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या ज्ञानी मी होणार या प्रश्नमंजुषा स्पर्धेत त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सलग 2 वर्ष जिल्हास्तरावर विजेतेपद मिळविले व विविध जिल्हास्तर व तालुकास्तरावर प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे ही आतापर्यंतची मोठी Achievement आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व योग्य दिशेने विकास होण्यासाठी शिक्षकांवर असलेले अशैक्षणिक कामांचे ओझे कमी व्हायला हवे, तसेच समाजाचे सहकार्य अजून वाढायला हवे हा बदल समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी होण्याची गरज आहे असे त्यांना वाटते.
शिक्षकांचे वय खूप मोठे असते, शिक्षक त्यांच्या आयुष्यात जितक्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्या विध्यार्थ्यांच्या आठवणीत शिक्षक कायम असणार आहेत, म्हणूनच ती आठवण चांगली असायला हवी म्हणून प्रामाणिकपणे अध्यापन करून व मैत्रीपूर्ण संबंधातून आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी प्रयत्नशील राहूया असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.