आपण आज श्री दीपक ज्ञानेश्वर थोरात (Bsc BEd.Dip.V.G C.C.M. MA EDu.) यांच्या शिक्षक प्रवासाबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
श्री. दीपक थोरात सर नेरळ, कर्जत .रायगड या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांना शैक्षणिक क्षेत्रात 28 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. सध्या ते ज्ञानानुभव विद्यालय ए .डी.एस. कशेळे या प्रशालेत माध्यमिक विभागात विज्ञान विषयाचे अध्यापन व करिअर मार्गदर्शन करीत आहेत. विद्यार्थ्यांचा अधिकाधिक वैज्ञानिक दृष्टिकोन व मूलभूत संकल्पना यांचे ज्ञान, भविष्यातील करिअर विषयक त्यांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन मार्गदर्शन व समुपदेशन कार्य करत आहेत.
तुम्हाला शिक्षक व्हावेसे कधी व का वाटले?
कॉलेजच्या शेवटच्या वर्षामध्ये माझे आदरणीय गुरुजन मला लाभले. त्यांची विद्यार्थ्यांना समजावण्याची व समजून घेण्याची आणि भविष्यातील चांगल्या करियर साठी विद्यार्थ्यांना मदत करण्याची तळमळ. गुरुजनांची संगत त्यांचे प्रेरणादायी विचार सामाजिक जडणघडणीमध्ये शिक्षकाची भूमिका याबद्दल आकर्षण वाटत राहिले. इयत्ता पाचवी ते पदवी पर्यंतचे रयत शिक्षण संस्थेमधील शिक्षण व संस्कार. समाजसेवेची आवड व प्रत्येक दिवशी नवीन नवीन संधी उपलब्ध होणारे क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. सामाजिक सेवा करता येणारे व प्रत्येक दिवस नव्याने जगता येणारे ज्ञानदान क्षेत्र माझ्या मनात देव घर करत होतं. ठरलं आता शिक्षक व्हायचं. मी अध्यापक पदवीका घेतली आणि शिक्षक झालो.
तुम्ही विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करता?
विद्यार्थी हा शिक्षण क्षेत्राचा कणा आहे त्याला सुसंस्कृत करणे. पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्याची त्याची महत्त्वकांक्षा विकसित करणे.वैज्ञानिक दृष्टिकोन व ज्ञानरचनावादी चिकित्सक अभ्यास करण्याची वृत्ती त्याच्या ठायी यावी म्हणून मी विद्यार्थ्यांचा कल त्याचे वर्तन, अभ्यासाच्या सवयी, सोप्यातून अवघडाकडे जाणारी अध्ययन पद्धती. नवनवीन विज्ञान खेळ, कोडी, मनोरंजनातून चिकित्सक विचार. टाकाऊतून नवनवीन प्रयोग निर्मिती त्यातून मिळणारा आनंद. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसण्यासाठी मी नवनवीन उपक्रमातून विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी लागावी म्हणून सतत प्रेरित करत असतो.
तुम्हाला पालकांशी संवाद साधला आवडतो का?
होय, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक पालक यांच्यामध्ये सतत विचारांची देवाण-घेवाण होणे गरजेचे आहे.पाल्याची पूर्ण ओळख
होण्यासाठी शिक्षक व पालक यांच्यामध्ये सुसंवाद व्हावेत.सुसंस्कार व आदर्श जीवनपद्धती जोपासण्यासाठी शिक्षक पाल्य मेळावे व्हावेत.
मुलांच्या पालकां सोबत तुमचे संबंध कसे आहेत?
मुलांचे अंतरंग त्याच्या सवयी त्याचे भावना विश्व, त्याची विचार करण्याची पद्धती, सामाजिक वर्तन ,कौटुंबिक संवेदना, शारीरिक ठेवण , देहबोली, अभ्यास पद्धती हे जाणून घेण्यासाठी पालकांची सुसंवाद हवाच. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या सुसंवादातूनच व विचारांच्या देवाणघेवाणीतूनच विद्यार्थी सुसंस्कृत होत असतो. माझ्या दुर्गम व ग्रामीण भागातील पालकांशी संवाद साधताना तो मनमोकळेपणाने साधता येतो.निकोप संबंधामधून विद्यार्थी घडवता येतो.
तुम्ही वर्गात तंत्रज्ञान कसे वापरता?
मी ग्रामीण व दुर्गम भागामध्ये कार्यरत असल्याने आजही माझ्या शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. परंतु अनेक शैक्षणिक ॲप जसे दीक्षा, उमंग, युट्युब वरील सुयोग्य शैक्षणिक कार्यक्रम डाऊनलोड करून ई लर्निंग साहित्यद्वारे त्याचे प्रक्षेपण करतो. ज्यांच्या घरी मोबाईल उपलब्ध असेल अशा विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप वर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन मंडळ पुणे यांचे शैक्षणिक व्हिडिओ दाखवतो. आकृत्या सभोवतालचा परिसर अभ्यास व चार्ट त्याचबरोबर प्रयोगशाळेतील प्रयोग पद्धतीने शिकविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. यामुळे विद्यार्थी अध्ययनशील व स्वयंशिस्तीने स्वतः अभ्यास करायला प्रवृत्त होतात व अभ्यासही करतात.
शिक्षण क्षेत्रातील तुमची सर्वात मोठी अचीवमेंट कोणती?
शिक्षण क्षेत्रातील प्रवास व विद्यार्थी घडवत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन व कारण मीमांसा ,चिकित्सक विचार करण्याची पद्धती विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत आहेत. ज्यावेळी विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला या साऱ्या गोष्टींचा लाभ होतो. विज्ञान मेळावे ,विज्ञान प्रदर्शन व करियर मार्गदर्शन व्याख्यानांमधून मिळणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद व काही सामाजिक पुरस्कार यामुळे आपण या क्षेत्रात कार्यरत आहोत याचा अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांसमवेत असताना विद्यार्थ्यांचा पडणारा गराडा त्यांचे शंका निरसन करताना मिळणारा आनंद व विद्यार्थ्यांचा वाढलेला आत्मविश्वास पाहताना खऱ्या अर्थानेआत्म समाधान लाभते.
शिक्षक म्हणून तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासातील एखादा अनुभव.
आकाशात झेप घेणारी पाखरं पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या घरट्याकडे येताना काही जुन्या आठवणी घेऊन येतात. त्यांच्याशी हितगुज गेल्यावर त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात ती आज कार्यरत आहेत. याचा अभिमान वाटतो . उर भरून येतो. प्रत्येक जण अभिमानाने सांगत असतो मी डॉक्टर, पोलीस, नर्स, शिक्षक, व्यावसायिक, सरपंच ,ड्रायव्हर रेल्वे कर्मचारी ,प्रगतशील शेतकरी, सीएच्या फाउंडेशन कोर्स पूर्ण .प्राध्यापक ,इंजिनियर, शेत मजूर ,शेतीपूरक व्यवसाय, व्यापार. अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारा आपला शिष्यगण पाहिल्यावर आपण शिक्षक झालो याची धन्यता वाटते.
मला भावलेले माझे दोन लाडके विद्यार्थी श्री. सचिन बुरंगे डॉक्टर व कुमार दिव्येश आहिर अतिशय हुशार ,मेहनती ,विनम्र ,आज्ञा धारक होते. ते जेव्हा प्रशालेच्या प्रांगणात येतात विचारपूस करतात नतमस्तक होतात चरण स्पर्श करतात. तेव्हा जगातील सर्वश्रेष्ठ सुख त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य त्यांची यशोगाथा पाहिल्यावर अंतरी मनाला आनंद होतो. ईश्वरा हीच सुख अनुभवया मज व्हावेसे वाटते पुढील जन्मी पुन्हा गुरु…
हे सरस्वती माता माझे नमन शतशः तुला..
येथे कर माझे जुळती.