आज आपण सौ.दीपाली दीपक डोळस(M.A. D.Ed.), यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. दीपाली टीचर या सोलापूर येथे राहत असून त्यांना शिक्षण क्षेत्रात १८ वर्षांचा अनुभव आहे. सध्या त्या मॉडर्न हायस्कूल प्राथमिक विभाग सोलापूर या शाळेत कार्यरत आहेत.
तुम्हाला शिक्षक व्हावेसे कधी व का वाटले
मी जेव्हा स्वतः माझ्या शाळेत शिकत होते ती शाळा म्हणजेच हरीभाई देवकरण प्रशाला. तेव्हा माझे शिक्षक सर्वच विषय खूपच छान शिकवायचे.. त्यांना पाहून मला शिक्षिका व्हावे असे मनोमन वाटायचे.
विशेषतः मराठी विषयांचे सर्व शिक्षक!
बारावी झाल्यानंतर माझ्या आईची खूप तीव्र इच्छा होती की, मी शिक्षिका व्हावे त्यामुळे तिने मला डीएड शिकवले आणि मी शिक्षिका झाले..!
ज्या विद्यार्थ्याला शिकवणे कठीण वाटते त्याला मी माझ्याजवळ बसवून त्याच्या कलाने त्याला आवडतील त्या गोष्टी त्याच्याकडूनच करून घेऊन प्रसंगी त्यालाच मॉनिटर करून गोडीतच समजावून सांगून त्या विद्यार्थ्याला हाताळते…. यासाठी बालमानसशास्त्र जाणून घेणे हे खूप आवश्यक असतं आणि मी त्याचा वापर करते.
तुम्ही विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करता?
विद्यार्थी हे खरंतर आई-वडिलांपेक्षा सुद्धा शिक्षकांनाच देव मानतात त्यांनी सांगितलेले प्रत्येक वाक्य, गोष्ट त्यांना पटत असते. बोधकथा, शूरवीरांच्या, थोर नेत्यांच्या, पौराणिक कथा तसेच दिनविशेषाच्या निमित्ताने असणारे विविध उपक्रम यातूनच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रेरित करते.
तुम्हाला पालकांशी संवाद साधायला आवडते का?
हो,आवडते . कारण पालक आणि विद्यार्थी या दोन्हींचाही दुवा शिक्षकच असतो आपले मूल योग्य पद्धतीने शिक्षण घेत आहे ना? याचे पालकांना समाधान आहे का? हे जाणून घेण्यासाठी मला संवाद साधायला आवडते.
मुलांच्या पालकांसोबत तुमचे संबंध कसे आहेत?
मुलांच्या पालकांसोबत माझे संबंध अत्यंत निकोप, मैत्रीपूर्ण , सहकार्य भावनेचे आहेत.
माझ्याशी बोलताना मुलांचे पालक आदराने आणि अत्यंत मनमोकळेपणाने बोलतात.
तुम्ही वर्गात तंत्रज्ञान कसे वापरता?
विविध प्रकारची माहिती, नवीन गाणी, प्रार्थना, स्फूर्ती गीते शिकवण्यासाठी मी ब्लूटूथ साउंड बॉक्स वापरते.
माहितीपट, कृतिशील उपक्रम दाखवण्यासाठी शाळेतील प्रोजेक्टर चा वापर करते.
शिक्षण क्षेत्रातील तुमची सर्वात मोठी Achievement कोणती?
मराठी विषयासाठी सर्वच विद्यार्थ्यांना शुद्ध, स्पष्ट बोलता व लिहिता यावे यासाठी सतत मी प्रयत्नशील राहून विद्यार्थ्यांचा विकास करते.
कारण बरेच विद्यार्थी बहुभाषिक असतात त्यांची भाषा व बोलीभाषा वेगवेगळी असते त्याचप्रमाणे त्यांचे उच्चार, पद्धत लेखन पद्धती वेगळी असते. अशावेळी भाषिक प्रश्न वेळोवेळी मार्गदर्शन करून सोडवले आहेत. वक्तृत्व स्पर्धा आणि शिष्यवृत्ती स्पर्धेत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना अनेक बक्षीसे व पुरस्कार मिळवून दिले आहेत.
शिक्षक म्हणून तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासातील एखादा अनुभव अविस्मरणीय आहे.
खरतर अनेक विद्यार्थी आपण घडवत असतो. पण शिक्षकांना जरी अनेक वर्षांनी विसर पडला तरी विद्यार्थी आठवणी कायम लक्षात ठेवतात.
मी मराठी आणि इतिहास (शिवाजी महाराजांचा) इतिहास ते विद्यार्थ्यांच्या आवडीचे विषयी मी शिकवते विद्यार्थ्यांच्या कलाने आणि त्यांना आवडेल अशा पद्धतीने भाषिक खेळ, गाणी, विविध चाली लावून कविता ,मी शिकवत असते.
एकदा सलग दोन वर्ष तिसरी आणि चौथी दोन्ही वर्ग पाठोपाठ शिकवण्याचा प्रसंग आला. तेव्हा विद्यार्थ्यांनी आनंदाने खूप जल्लोष केला… याही वर्षी सलग तिसरी ,चौथी शिकवण्याचा योग आला माझ्या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.. माझा वर्ग सजवला टेबल खुर्ची..फळा सजवला, माझे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले, आणि पुढच्या वर्षी तुम्ही नक्की यायचं असं मला बजावलं…! शिवाजी महाराजांचा इतिहास नाट्यीकरण करून तसेच त्यांच्या आत्मचरित्रातील घटना, प्रसंग सांगून गोष्टी रूप शिकवते.. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने शिकवलेला इतिहास अतिशय आवडतो.. दरवर्षी दहावी च्या निरोप समारंभात अनेक विद्यार्थी माझा मराठी व इतिहास शिकवण्याच्या पद्धतीची प्रशंसा करतात आणि आम्ही त्यांना कधीही विसरणार नाही अशी ग्वाही देतात तेव्हा खरंच अभिमानाने उर भरून येतो आणि आपण शिक्षक झाल्याचे सार्थक वाटते.
विद्यार्थी प्रिय शिक्षिका होण्याचे भाग्य मला मिळाले आहे!!