आज आपण श्री. दिनेश अशोक कांबळे (D.Ed, M.A.- English) यांचा शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.श्री. दिनेश यांचे डोंगरगाव अन्वी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद हे मूळ गाव असून सध्या ते आंबेगाव खुर्द पोस्ट कांबेगी ता वेल्हे जि. पुणे इथे राहत आहेत. गेली ५ वर्षापासून ते शिक्षक क्षेत्रात कार्यरत असून सध्या ते जि.प. प्राथमिक शाळा आंबेगाव खुर्द, केंद्र गोंडेखल ता.वेल्हे जि. पुणे येथे अध्यापनाचे कार्य करत आहेत.शालेय वयापासूनच दिनेश यांना शिक्षक हा अगदी जवळचा घटक वाटतं होता. आणि तेव्हापासूनच त्यांच्या मनात शिक्षक बनण्याची आवड होती. मात्र महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना बारावी विज्ञान शाखा असल्याने वैद्यकीय क्षेत्राबद्दल अधिकची माहिती मिळतं गेली. आणि वैद्यकीय क्षेत्राकडेही कल वाढू लागला. कधीकधी व्यवसाय म्हणून, ‘शिक्षण क्षेत्र की वैद्यकीय क्षेत्र?’ याबद्दल तळ्यात-मळ्यात अशीही अवस्था होतं होती. आणि शेवटच्या क्षणी शिक्षणरूपी खळ्यात उतरून अखंड ज्ञानाच्या सकस पिकाची मळणी करण्याचे पक्के झाले.आणि त्यांनी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला.
‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी:
काही प्रमाणात अडचणी या प्रत्येकाच्या वाट्याला येतच असतात,त्यात दिनेश अपवाद नाहीत.
त्यांचे D.ed करणे निश्चित झालेले होते तेव्हा बाकीच्या वर्गमित्रांनी B.A.M.S ,Hotel Management या सारखे क्षेत्र निवडून आपापले प्रवेशही करून घेतले होते. दिनेश यांनी मात्र केवळ D.Ed चा फॉर्म भरला होता.अजून नंबर लागणे, राऊंड होणे बाकी होते. त्यातही त्यांना D.Ed इंग्रजी माध्यमातून करायचे असल्याने आणि इंग्रजी माध्यमासाठी जागा कमी उपलब्ध असल्याने स्व-जिल्यातील कॉलेजमध्ये नंबर लागेल की नाही याची नेहमीच धडकी भरत असे. आणि तेच झाले जिल्हा राऊंड ला त्यांचा नंबर लागला नाही. परिणामी त्यांना राज्य राऊंड पुणे येथे हजर व्हावे लागले. आणि तेथून त्यांचा नंबर नागपूर येथील प्रजासत्ताक अध्यापक विद्यालय येथे लागला. आणि तिथुन पहिल्यांदा एकट्यानेच भुसावळ ते नागपूर असा त्यांचा रेल्वे प्रवास सुरु झाला.
अविस्मरणीय प्रसंग/ क्षण:
श्री दिनेश हे ज्या शाळेत शिकवतात ती शाळा दुर्गम क्षेत्रात येत असल्याने येथे दर दिवशी एक नवीन अनुभव नवीन काहीतरी शिकवून जात असतो असे ते सांगतात. मात्र मागील दोन वर्षात जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे विद्यार्थी- शिक्षक यांच्यात काही अंशी का होईना एक दरी निर्माण करण्याचे दुर्दैवी काम या आजाराने केले आहे . मात्र त्यांच्या दुर्गम क्षेत्रामुळे ते विद्यार्थी, पालकांशी सदैव संपर्कात राहू शकले.एकंदरीत तो संपूर्ण काळ कायम स्मृतित जपण्यासारखा आहे.असे शिक्षक दिनेश म्हणतात.
अचीवमेंट:
श्री दिनेश यांचे D.Ed. 2012 साली पूर्ण झालं तोपर्यंत शिक्षक भरती CET बंद झाल्यात जमा होती. शिक्षक होण्याची आस पूर्णतः मावळती दिसत होती तरीही, कणभर आत्मविश्वास अजूनही त्यांच्यात जपून होतो. मध्येच TET नवीन पात्रता परीक्षा पद्धती लागू झाली. आणि ती परीक्षा अग्निदिव्य ठरावी अशीच होती. त्यातही एक दोन नव्हे तर तीन तीन वेळा ते पात्र ठरले. त्यानंतर 2017 साली TAIT या नवीन चाळणी पद्धतीने पुन्हा परीक्षा झाली. त्यातही योग्य असा स्कोर बनवून ते सन 2019 च्या अंतिम निवड यादीत पुणे जिल्हा परिषद अंतर्गत निवडीस पात्र ठरले आणि अखेर ते ‘शिक्षक’ झाले.
त्यांच्यासाठी हीच आतापर्यंतची सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे असे दिनेश सांगतात.
शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज:
विद्यार्थी-शिक्षक हितासाठी आपला भारतीय समाज सदैव सकारात्मक आणि पोषक असेच वातावरण प्रदान करत आलेला आहे. अधूनमधून हलकासा आणि दबक्या आवाजात एक सूर कानावर पडत असतो की, ‘पूर्वी शिक्षकांना खूप मानसन्मान होता. गावातली एक सन्माननीय आणि आदरणीय अशी व्यक्ती म्हणजे शिक्षक/ गुरूजी असते. आता तितकासा मानसन्मान राहिला नाही. असे दिनेश यांना वाटते. मात्र, यातील पूर्वार्ध वाक्यचं तितके खरे वाटते. कारण, आजही गावातील विद्यार्थी,पालक आणि इतर गावकरी शिक्षकांना तितकाच आदर देतात. राहिली गोष्ट बदल होण्याची तर शिक्षकांना वेळोवेळी कराव्या लागणाऱ्या अशैक्षणिक कर्तव्यामुळे शिक्षक विद्यार्थी दरम्यान होणाऱ्या अध्ययन-अध्यापनाच्या आंतरक्रियांवर कुठेतरी बाधक परिणाम होण्याची शक्यता वाढीस लागू शकते. हे टाळण्यासाठी काही काही उपाययोजना करता आल्यास उत्तमच.असे मत शिक्षक दिनेश यांनी मांडले.
शिक्षक व्हायचे आहे त्यांना सल्ला:
या पवित्र क्षेत्राला जुगार समजून इथे दैव तुमचे अजमावू नका. आवड असेल तरच हे क्षेत्र निवडा दुसरीकडे जम बसत नाही म्हणून इकडे येऊ नका.असा सल्ला शिक्षक दिनेश यांनी शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांना दिला.