आज आपण श्री गोपाळ लक्ष्मण पाटील (B.SC B. Ed, MA EDUCATION, SET, DIP IN YOGA ) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. गोपाळ सर हे गुहागर येथे राहत असून ते श्री. पांडुरंग रुपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय या शाळेत शिकवत आहेत. त्यांना अध्यापनाचा बावीस वर्षांचा अनुभव आहे. गोपाळ सर त्यांच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान गे विषय शिकवतात.
त्यांना त्यांच्या सिनियर कॉलेजच्या शिक्षकांपासून प्रेरणा घेऊन शिक्षक व्हावेसे वाटले होते. कॉलेजनंतर खाजगी रासायनिक कारखान्यात त्यांनी ३ वर्ष काम केले पण त्यांच्या मनात एक सल होती की ते त्यांची गुणवत्ता एकाच व्यक्तीच्या उत्कर्षासाठी वापरत आहेत. म्हणून त्यांनी B.Ed करून शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला.
सुरुवातीला शिक्षण क्षेत्रात त्यांना बऱ्याच अडचणी आल्या. त्यांना जन्मजात जीभ कमी वळण्याची समस्या आहे परिणामी बोलताना त्यांचे शब्द अडखळतात. परंतु त्यानंतर त्यांनी योगाद्वारे या समस्येवर प्रयत्नपूर्वक मात केली.
शिक्षणाच्या या २२ वर्षाच्या प्रवासात अनेक चांगले वाईट अनुभव त्यांना आले पण त्या अनुभवांमधून त्यांना बरेच काही शिकता आले, विशेषकरून माणसे वाचता आली. त्यांच्या अध्यपनाच्या विषयात आतापर्यंत २२ वर्षात एकही विद्यार्थी नापास झालेला नाही. या २२ वर्षात त्यांच्याकडे असलेल्या स्कॉलरशिप विभागात जवळजवळ ४५ मुले मेरिटमध्ये आली. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना एकाही पालकाने त्यांना विरोध केला नाही.
शिक्षक व विद्यार्थी यांचे एकमेकांशी घट्ट असे नटे नेहमी रहायला हवे,या दोघांनी नेहमी मित्रच असायला हवे असे त्यांना वाटते. नवीन येणाऱ्या शिक्षकांनी मुलांच्या मनात समाज, पर्यावरण, प्राणिमात्रांविषयी प्रेम व आदर रुजवावा व हे सर्व स्वकृतीतूनच शक्य होईल असा सल्ला त्यांनी दिला.