S R Dalvi (I) Foundation

Tr. Hridaynath Gawade

Tr. Hridaynath Gawade

आज आपण शिक्षक श्री. हृदयनाथ लक्ष्मण गावडे यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. हृदयनाथ यांचे मुळ गाव मुक्काम पोस्ट साळगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग असून गेले १८ वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.सध्या ते जिल्हा परिषद शाळा तेंडोली आवेरे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे साधा मुख्याध्यापक म्हणून कार्य करत आहे.

श्री. हृदयनाथ यांचे आई-वडील शेतकरी. त्यांचे  इयत्ता सातवी पर्यंतचे शिक्षण त्यांच्याच गावात झाले. त्यांना शिकवणारे सर्व शिक्षक म्हणजे त्यांच्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी विभूतीच होते. त्यांना शिकवणाऱ्या सर्वच गुरुजनांची छापत्यांच्या  कुटुंबावर असल्यामुळे एकदा शेतात काम करताना त्यांची आई त्यांना म्हणाली ‘तू मोठा झाल्यावर शिक्षकच हो’ ही गोष्ट श्री. हृदयनाथ यांच्या मनावर कोरली गेली आणि तेव्हापासून त्यांनी शिक्षक च होण्याचे मनावर घेतले.

शिक्षक होताना अडचणी: 

या प्रवासात श्री. हृदयनाथ यांना अडचण म्हणता येईल असे काही सोसावे लागले नाही  लहानपणापासूनच त्यांनी शिक्षक होणार स्वप्न पाहिले असल्याने त्यादृष्टीने त्यांचा अभ्यास आणि तयारी सुरू होती. त्यामुळे बारावी सायन्स करून कोणत्याही इतर शिक्षणासाठी अर्ज न करता त्यांनी फक्त डीएड ला फॉर्म भरला आणि चांगले गुण असल्यामुळे शासकीय अध्यापक विद्यालयांमध्ये त्यांना सहज प्रवेश मिळाला. मनाची तयारी असल्यामुळे आवडीने दोन वर्षात त्यांनी डीएड केले आणि दोन वर्षांनी नोकरी मिळून शिक्षकही झाले. आणि अगदी आवडीने शिक्षकी सेवा स्वीकारली असल्यामुळे मनापासून ते या क्षेत्रात काम ही करत आहेत.

अविस्मरणीय प्रसंग / क्षण 

गेल्या १८ वर्षात श्री. हृदयनाथ यांच्या आयुष्यात अनेक अविस्मरणीय क्षण येऊन गेले त्यांच्या अल्पशा कार्याचे कौतुक म्हणून माननीय पालक, ग्रामस्थ, वरिष्ठ अधिकारी, संस्था, संघटना ,प्रशासन यांच्याकडून त्यांना कौतुकाची थाप मिळाली आणि भविष्यातील कार्यासाठी प्रेरणा मिळत गेली. यातील सर्वच प्रसंग हे त्यांच्यासाठी खूप अविस्मरणीय आहेत.

अचिव्हमेंट : 

  • शाळेमध्ये दैनंदिन अध्यापन करत असतानाच अनेक सहशालेय उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी कलात्मक उपक्रम राबविले.
  •  संगीताची आवड असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी गीता मंच सुरमैफिल असे कार्यक्रम घेतले.
  • शालेय मुलींच्या दशावतारी नाटकाचे अनेक प्रयोग अगदीं मुंबईपर्यंत झाले. त्यात हार्मोनियम वादन आणि संगित दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
  • शिष्यवृत्ती मार्गदर्शन आणि विद्यार्थी प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवित असताना या सर्व कार्याची दखल घेऊन साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श सेवामयी शिक्षक पुरस्कार देऊन  एका कार्यक्रमात गौरविण्यात आले.

समाजात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी काय बदल होण्याची गरज:

कालानुरूप बदल अभिप्रेत आहेतच. प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून त्याला मूल्यशिक्षण जोडले गेले पाहिजे.अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेसाठी दोन्हीं सदैव तत्पर असायला हवेत. तसेच कोणतीही गोष्ट जाणून घेण्याची प्रखर तळमळ असावी. असे मत श्री. हृदयनाथ यांनी व्यक्त केले.

शिक्षक होणाऱ्यांसाठी सल्ला:

तुम्हाला जर का शिक्षक व्हायचे असेल तर मनापासून तसे वाटले पाहिजे.दुसरीकडे संधी नाही म्हणून शिक्षक होऊ नका. विश्वातील जास्तीत जास्त गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या विद्यार्थ्यांना पर्यंत पोहोचवा.शिक्षक अष्टपैलू असला पाहिजे.कारण आमच्यासारख्या शिक्षकांची छाप विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्ववर पडलीच पाहिजे.समाजात जबाबदारीने जगायला हवे करण आपले अनुकरण विद्यार्थी करत असतात. असा मोलाचा सल्ला शिक्षक हृदयनाथ गावडे यांनी दिला.
Scroll to Top