S R Dalvi (I) Foundation

Tr. Jayendra Kadam

Tr. Jayendra Kadam

आज आपण शिक्षक श्री जयेंद्र बाबू कदम (M.A .D Ed) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. जयेंद्र सर हे नालासोपारा येथे राहत असून सध्या ते धारावी काळा किल्ला मनपा मराठी शाळा क्रमांक 2 येथे कार्यरत आहेत .

मला शिक्षक व्हावेसे वाटले :
माझ्या जवळच्या 2 शिक्षकांनी मला शिक्षकी पेशाकडे वळण्यास प्रवृत्त केले . नोकरीची फारच गरज होती . समाजात शिक्षकांना किती आदर मिळतो व किती प्रतिष्ठा आहे हे मला त्यावेळी समजले होते . मलाही लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होतीच . शिक्षक म्हणून नोकरी मिळाल्यास उदरनिर्वाह तर होईलच परंतु आपणही नवी पिढी घडविण्यासाठी सामाजिक कार्य केल्याचे समाधानही मिळेल या भावनेने प्रेरित होऊन मी शिक्षकी पेशाकडे वळलो .

ज्या विद्यार्थ्यांना शिकवणे कठीण वाटते अशा विद्यार्थ्यांना याप्रकारे हाताळतो :
काही विद्यार्थी अतिशय गरीबीमुळे, त्यांच्या कौटुंबिक ,सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षण घेत असताना इतर विद्यार्थ्यांच्या मानाने फारच मागे असतात, त्यांना मग नैराश्य येते, ते विद्यार्थी सतत गैरहजर रहातात . त्यांचे शिकण्यात मन लागत नाही . त्यांच्या पालकांशी मी संपर्क साधून त्यांची त्यांना त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाचे महत्व पटवून देतो . त्या विद्यार्थ्यांना गोडीगुलाबीने ,मायेने त्यांच्या कलेने घेतो ,त्यांच्या आवडीच्या विषयावर गप्पा मारतो ,त्यांना आवडणाऱ्या गोष्टी सांगतो .
विद्यार्थ्याने एखादी गोष्ट पूर्ण केल्यावर किंवा तसे करण्याचे किमान प्रयत्न केल्यास त्याचे शाब्दिक कौतुक करतो ,त्याला शाबासकी देतो . त्याच्या आवडीच्या इतर विषयांबद्दल त्याची प्रशंसा करतो .त्याला आवडणाऱ्या या सोप्या विषयांशी त्याला कठीण वाटणाऱ्या विषयांचा किती जवळचा संबंध आहे हे सोदाहरण स्पष्ट करतो .त्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये शिकण्याबद्दल positivity तयार होते . You have to do this , तू हे करू शकतोस असा त्याला आत्मविश्वास देतो . थोडक्यात काय तर माझ्या दिशादर्शक मार्गदर्शनामुळे त्याच्यात शिकण्याची गोडी निर्माण झाल्याचा मला कोण आनंद होतो . यातच मला खूप समाधान मिळते .

विद्यार्थ्यांना प्रेरित करतो :
थोर समाजसुधारक ,थोर क्रांतिकारक ,थोर शास्त्रज्ञ ,थोर चित्रकार ,थोर गायक यांच्या गोष्टी सांगून ,काही वेळा वैज्ञानिक प्रयोग दाखवून, अद्यवत टेक्नॉलॉजीचा अध्यापनात योग्य वापर करून ,सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा कृतीयुक्त सहभाग घेऊन ,विविध स्पर्धा ,राष्ट्रीय सण ,उत्सव ,धार्मिक सण यावर आधारित लेखन ,चित्रकला स्पर्धा ,वक्तृत्त्व स्पर्धा ,वेशभूषा स्पर्धा ,बालनाट्य स्पर्धा , क्रीडास्पर्धा ,शिष्यवृत्ती परीक्षा ,नास तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षा ,प्रत्यक्ष विज्ञान कुतूहल भवन ,प्रेक्षणीय ठिकाणे इत्यादींना सहलीद्वारे भेटींचे नियोजन करून त्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घेतो. विविध दृक्श्राव्य अनुभव कथन करून ,यशस्वी खेळाडू ,शिक्षणात गरिबीतूनही आय एस ,एम पी एस ,आयपीएस , शिक्षक, डॉकटर ,वकील , वैज्ञानिक , अभिनेता ,चित्रकार , साहित्यिक , पत्रकार ,संसदपट्टू , सामाजिक पुढारी यांनी यशस्वी होण्यासाठी कसा संघर्ष केला याची विद्यार्थ्यांना विविध साधनांद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती करून देतो .
त्त्यांच्याविषयी माहितीपट , चित्रपट ,कथा ,कादंबऱ्या ,इत्यादी संदर्भ पुस्तकांचे वाचन करण्यास प्रवृत्त करतो .
स्त्रीपुरुष समानता , सर्वधर्म समभाव ,राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करणे ,विविधतेतून राष्ट्रीय ऐक्य भावना वाढीस लावण्यासाठी शालेय पातळीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेतो .

पालकांशी संपर्क व संवाद :
शाळा म्हटले की शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या त्रिसूत्रीनुसार शैक्षणिक वाटचाल करावी लागते . आपला पाल्य शिकून खूप मोठा व्हावा अशी पालकांची मनोमन इच्छा असते . अतिशय विश्वासाने ते आपल्या पाल्याला शिक्षकांच्या स्वाधीन करतात . विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच माझी नियुक्ती झाल्याने किंबहुना मी ती जबाबदरी मी स्वीकारल्यामुळे मला विद्यार्थी आणि संबंधित पालकांची पार्शवभूमी माहिती असणे गरजेचे आहे .मासिक पालक सभा आयोजित करून प्रत्यक्ष पाल्याच्या प्रगतीविषयी माहिती दिली जाते , मागे असलेल्या पाल्यासाठी पालकांना खचून न जाता त्याची कशी प्रगती करता येईल याची मार्गदर्शन केले जाते . प्रत्यक्ष वेळ न देणाऱ्या पालकांशी फोनद्वारे संपर्क साधून ,गृहभेटी देऊन पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीविषयी माहिती दिली जाते . पाल्याच्या प्रगतीसाठी शाळा कोणकोणते उपक्रम राबवते ,पालक विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले जाते ,विद्यार्थ्यांची चित्रे , स्वनिर्मित बालसाहित्य ,त्यांनी काढलेल्या रांगोळ्या , त्यांनी मातीपासून तयार केलेल्या विविध गृहपयोगी वस्तू , टाकावूतून टिकाऊ अशा स्वनिर्मित वस्तू इत्यादींचे प्रदर्शन आयोजित करून ते पहाण्यासाठी पालकांना ,पाहुण्यांना निमंत्रित करतो . महिला पालकांसाठी हळदीकुंकू समारंभ , सर्व पालकवर्गासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ,विविध खेळ ,मेळावे आयोजित करून पालकांचा देखील प्रत्यक्ष सहभाग घेतला जातो .एक शिक्षक म्हणून पकलकांशी माझे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत .
कोविडकाळात पालकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले . काहीजणांच्या नोकऱ्याही गेल्या . कोणी यूपी ,बिहार ,कर्नाटकला ,आपल्या लोकरांसह निघून गेले . शाळा बंद होत्या पण या गरीब मुलांचे ऑनलाइन शिक्षण आम्ही सुरू ठेवले . काही पालकांना नेटपॅक टाकणे जमत नसे , अशांना मी स्वतः नेटपॅक टाकले . त्यांना संपर्क साधून पाल्याचे शिक्षण सुरू ठेवण्यास प्रेरित केले. जे शाळेच्या परिसरात धारावी सारख्या मोठ्या झोपडपट्टीत राहत होते त्यांना अर्थार्जना अभावी अन्नधान्य मिळत नव्हते . अशा गरीब पालकांशी फोनद्वारे संपर्क करून जीवनावश्यक वस्तू मिळवून देण्याचे प्रयत्न केले . तसेच कोरोना महामारीस न घाबरता ,कोणती काळ जी घ्यावी त्याचे ऑनलाइन सभा घेऊन मार्गदर्शन केले. म्हणून विद्यार्थी आणि पालक हे माझे जीवनातील एक अविभाज्य भाग बनले आहेत . त्यांच्या शिवाय माझे शैक्षणिक उद्दिष्ट मी पूर्णत्वास नेऊ शकत नाही अशी माझी ठाम धारणा आहे . .

अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर :
एखाद्या घटकविषयी माहिती सादर करताना कधी पीपीटीचा वापर करून ,ऑडिओ ,विडिओ , व्हर्च्युअल क्लास ,डिजिटल क्लास ,स्मार्ट बोर्डचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवितो .

शिक्षण क्षेत्रातील माझी अचिव्हमेंट :
विभागीय बालनाट्य स्पर्धेत मी स्वतः लेखन ,दिगदर्शन ,केलेल्या बालनाट्याना लागोपाठ तीन वर्षे प्रथम व द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे .तसेच मी काव्य लेखन देखील करतो त्याचा माझ्या अध्यापनात वापरही करतो . तसेच माझे काही विद्यार्थी शिक्षक ,प्राध्यापक , बालचित्रपट अभिनेता झालेत . त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर खूपच समाधान वाटते .
त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी मी प्रार्थना करतो . आज मी शिक्षक म्हणून समाजात वावरताना असे विद्यार्थी घडल्याचे पहाहून मी स्वतःला भाग्यवान समजतो .

शिक्षण प्रवासातील अविस्मरणीय अनुभव :
10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे . मी शाळेत शिकवत होतो . मला एका माझी विद्यार्थिनीचा अचानक फोन आला . तिचे पालक तिचे एका तरुणाशी जबरदस्तीनं तिचे लग्न लावण्यास तयार झाले होते . तेव्हा ती इयत्ता 8 वीत शिकत होती . तिला पुढे शिकायचे होते . तशी ती वयाने लहानच होती . मी तिला शाळेत बोलवून घेतले ,सगळी माहिती विचारली ,तुझे पालक तुझ्या लग्नाची असे घाई का करत आहेत ? उत्तर मिळाले ,त्या तरुणाने तिच्या मुलीचे त्याच्याबरोबर लग्न लावून दिल्यास तिच्या आईबाबांना रुपये 20,000 देऊ केले होते . ही अन्यायकारक गोष्ट होती . मी काय तरी मार्ग काढावा या इर्षेने ती विद्यार्थिनी मला भेटायला आली होती . मी फोनवर पालकांना संपर्क केला आणि शाळेत बोलावले . त्यांना तिच्या कोवळ्या वायबद्दल समजावून सांगितले .त्यावेळी गरीबीमुळे ते पैसे त्यांना हवे असल्याचे त्यांच्या बोलण्यातून समजले . कोवळ्या वयात फूस लावून किंवा जबरजस्तीने लग्न करणे कसे बेकायदेशीर आहे . त्यासाठी तुम्ही पालक जरी असलात तरी कशी सजा होऊ शकते हे तिच्या पालकांना समजावून सांगितले .

स्वतःच्या मुलीचाच आपण जन्मदाते कसा निष्ठुरपणे छळ करीत आहोत हे त्यांच्या वेळीच ध्यानात आले व त्यांनी मुलीच्या लग्नाचा निर्णय मागे घेतला . असे ऐकून त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आंनद गगनात मावेनासा झाला . तिचा तो प्रसन्न चेहरा पाहून ती मी खूपच समाधानी झालो . शिक्षक या नात्याने मी आज तिला बालविवाहपासून वाचवले. ही गोष्ट माझ्या हृदयात कायमचीच कोरली गेली . ती मुलगी अगदी हसतमुखाने एखाद्या पिंजऱ्यातील पक्षाने अचानक मुक्तपणे उडून जावे तशी ती मागे न बघता निघून गेली .

Scroll to Top