नमस्कार मी जयश्री अमोल मेटकर (ढोक) B.A., D.T. Ed ,क्राफ्ट D.T.ed) जीवनपुरा ,अचलपुर ,जिल्हा अमरावती येथे राहत असून गेले 4 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. सध्या मी संस्कार इंटरनॅशनल स्कूल परतवाडा येथे मराठी आणि हिंदी विषयाचे अध्यापनाचे कार्य करीत आहे.
शिक्षक का कधी व्हावेसे वाटले?
2010 ला मी बारावी उत्तीर्ण झाले तेव्हा माझे आदर्श माझे अकरावी ,बारावी चे शिक्षक शुक्ला सर ,देशपांडे मॅडम यांच्यात असणारे सुप्त गुण त्यांची शिकवण्याची पद्धत बघून ‘मला एक समाज घडवायचा आहे’ ही भावना माझ्या मनात निर्माण झाली तसेच माझ्या घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती पण या दोन शिक्षकांनी माझ्यातले सुप्त गुण ओळखून मला प्रोत्साहन दिले आणि मला सांगितलं की तू शिक्षक हो याने तुझ्या सुप्तगुणांना पूर्णपणे वाव मिळेल जसे की, सूत्रसंचालन कविता प्रस्तुत करणे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि या गोष्टी एक शिक्षक देऊ शकतो. त्यांनी सांगितलं की तू एक सुंदर अशी पिढी घडवू शकते आणि खरंच आज मी एक सुंदर पिढी घडवण्याचे कार्य करीत आहे त्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी पूर्णपणे खरं ठरवीत आहे. विद्यार्थ्यांना एक सुंदर असा व्यासपीठ निर्माण व्हावा व व्यासपीठावर बोलण्यासाठीज्या आवाजाची ज्या कलागुणांची गरज असते माझा विद्यार्थी हा एक सुंदर वक्ता व त्याचप्रमाणे सूत्रसंचालन कवि कुठल्याही स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेऊन स्वतःचं नाव रोशन करावं यासाठी मी धडपडीने प्रयत्न करीत आहे. मला माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक सुजान नागरिक घडवायचा आहे व्यासपीठावर जाण्यासाठी जी भीती विद्यार्थ्यांच्या मनात असते ती भीती नाहीशी करायची आहे. मी माझ्या शाळेच्या परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना परिपूर्ण सहाय्य करीत असते त्यांना कुठे कुठल्या चारोळ्या वापरायच्या कुठे काय बोलायचं याबद्दल सुद्धा मी माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असते आणि विद्यार्थी घडवणे हेच माझे कर्तव्य आहे.
शिक्षक क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
होय, साल 2010 ला मी बारावी पास झाली, D.Ed. करण्यासाठी माझ्याकडे पुरेसा पैसा नव्हता. नागपूरच्या गव्हर्मेंट कॉलेजला एका मार्काने नंबर नाही लागला पण बाहेरगावी राहून शिक्षण घेणे अशक्य होते यासारख्या बऱ्याच समस्या समोर होत्या मात्र तरी सुद्धा माझे मनोधैर्य खचले नाही एक छोटासा जॉब करून मी माझे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर मी D.Ed. केल आणि 2013 साली मी नोकरी शोधायला सुरुवात केली. आता मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये शिक्षिका म्हणून कार्य करीत आहे त्याच बरोबर मी माझ्याआयुष्याचे 2 वर्ष लोकमत न्युज पेपर मध्ये डाटा ऑपरेटर या पदावर काम केले आहे . ते म्हणतात न ‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हा ही, क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, जिद्द असावी! ” मी जीवनात खूप कठीण परिस्थितीचा सामना करून आज एक आदर्श शिक्षिका होण्याच्या प्रयत्नात आहे. असं म्हटले जाते ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी खरंच समाजामध्ये आई नसेल तर हा सर्वात मोठा दुर्देवी घटक समजला जातो आणि तो दुर्देवी घटक मी एक त्याचा भाग बनलेली आहे तरी पण या सर्व परिस्थितीचा सामना करून एक आदर्श शिक्षिका होण्याच्या प्रयत्नात मी माझ्या जीवनाचे ध्येय निश्चित केलेले आहे मला एक आदर्श सुशिक्षित समाज सुधारक समाजाला समजून घेणारा समाज सेवा करणारा असा एक नागरिक घडवायचा आहे.
शिक्षण क्षेत्रात आतापर्यंत चा अविस्मरणीय क्षण कोणता?
2013 मध्ये नागपूर महानगरपालिकेकडून महिला दिनानिमित्त मला सन्मान करण्यात आला तो माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. माझ्या कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मला त्या पुरस्काराने खुप प्रेरणा दिली आहे आणि प्रोत्साहित केले आहे. तसेच मला मागील वर्षी राज्यस्तरीय नारी रत्न पुरस्कार ही प्राप्त झालेला आहे.
इथे मला एक प्रसंग ही सांगावासा वाटतो 2019 साली शिक्षक दिनाच्या दिवशी आमच्या शाळेत सर्व शिक्षक आणि विद्यार्थी जमले होते . तेव्हा मुख्यध्यापिकांनी ‘तुमचे आवडते शिक्षक कोणते’? हा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला होता आणि तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या 80% विद्यार्थ्यांनी माझे नाव घेतले. माझ्यासाठी ही मी करत असलेल्या कामाची पोचपावती होती. त्या वेळेस मला शिक्षक क्षेत्रात केवळ 1 वर्षे झाले होते माझ्यापेक्षा अनुभवाने जास्त असलेले शिक्षक तिथे उपस्थित होते पण तरीही विद्यार्थ्यांनी माझ नाव घेणे हे माझ्यासाठी खुप खुप मोठी गोष्ट होती. तसेच नुकताच माझा वाढदिवस साजरा करण्यात आला ,माझ्या विद्यार्थ्यांनी इतक्या उत्सुकतेने माझा वाढदिवस साजरा केलेला आहे की तो मी कधीही विसरू शकणार नाही.
समाजात शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे असे वाटते?
दिवसेंदिवस शिक्षण पद्धत बदलत चाललेली आहे त्या प्रवाहात शिक्षकाने ही स्वतःमध्ये परिवर्तित केले पाहिजे आणि जसा कुंभार मडक्याला आकार देऊन घडवतो त्याप्रमाणे शिक्षकाने परिस्थितीनुसार आपल्या विद्यार्थ्यांना समजून घेऊन त्यांना समाजासाठी योग्य असं बनवावे आणि घडवावे. दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे तर ती गुन्हेगारी प्रवृत्ती कशाप्रकारे थांबवता येईल विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार कुठल्या गोष्टींनी करता येईल याचा सुद्धा एक शिक्षक म्हणून विचार करायला हवा.
जर विद्यार्थ्यांनी मूल्यशिक्षण याचे धडे गिरवले तर विद्यार्थी हा बिघडु शकत नाही कारण त्याच्या मनावर वारंवार ते संस्कार झालेले असतात आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझी शाळा. कोरोना काळात सुद्धा आम्ही घरी न राहता आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आणि साजेसे असे ऑनलाइन शिक्षण देत आहोत. एक उत्तम शिक्षक या नात्याने उत्तम विद्यार्थी घडविण्यासाठी या कोरोना काळात सुद्धा आम्ही मात केलेली आहे.
आम्ही बेस्ट एज्युकेशन देण्याचे कार्य या कोरोना काळात केलेले आहे घरोघरी मुलांना योग्य शिक्षण मिळवता येईल यासाठी आम्ही व्यवस्थित सुविधा निर्माण केल्या होत्या तसेच कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण सुरु केले खरे पण गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा हवा तसा फायदा झाला आम्ही कुठल्याही मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवले नाही एक हाडामासाचा शिक्षक म्हणून आम्ही आमच्या मुलांचे मन समजून घेतो आणि विद्यार्थी शिक्षक यांच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी मनाचा कोपरा आणि तो कोपरा जर एक शिक्षक या नात्याने जपला तर खरंच. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्यात दुरावा निर्माण होणार नाही आणि त्यामध्ये बदल करण्याची गरज पडणार नाही. बदलत्या काळानुसार जर शिक्षक सुद्धा बदलला आणि विद्यार्थी सुद्धा बदलला तर समाज आपोआपच बदलेल.
ज्यांना शिक्षक होण्याची इच्छा आहे त्यांना काय सल्ला दयाल?
सर्वात आधी त्यांना त्यांचे कर्तव्य काय आहे त्यांनी समाजासाठी देशासाठी छोट्या छोट्या घटकातून कशी सुरुवात करावी हे त्यांना त्याची जाणीव करून द्यायला हवी तरच तो हाडामासाचा शिक्षक होऊ शकतो आणि हाडामासाचा शिक्षक हा एक सुंदर स्वच्छ निर्मळ देश घडवू शकतो. सर्वात आधी मी त्या विद्यार्थ्यांना कुठल्या गोष्टी गरजेचे आहे हे सांगण्यासाठी इच्छुक आहे आणि तो माझा पुरेपूर प्रयत्न सुद्धा सुरू आहे .मुलांच्या मनाचा विचार करून मुलांना समजून घेऊन मुलांना कुठल्या भाषेत शिकणे गरजेचे आहे मुलांची मानसिक स्थिती काय आहे कुठल्या कुठल्या शिक्षणाची आवश्यकता आहे या सर्व गोष्टींचा अभ्यास करून ,मला असे वाटते शिक्षक होण्यासाठी केवळ बुद्धिमान असणे गरजेचे नाही तर मेहनत करण्याची जिद्द असायला हवी. शिक्षकाला केवळ गोष्टी महित असणे उपयोगाचे नाही तर त्या गोष्टी प्रेजेंट ही करता यायला हव्यात. तुमच्याकडे टॅलेंट आहे तुम्ही खुप हुशार आहात पण जर तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवता आले नाही तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे हार्डवर्क, प्रेजेंट करण्याची पद्धत आणि शिकवण्याची कला ही जमयलाच हवी. सरतेशेवटी मी माझ्या विद्यार्थ्यांना हेच सांगेल की,
” झेप अशी घ्या की पाहणा–यांच्या माना दुखाव्यात ,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा ,
इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा,
कर्तृत्वाच्या अग्नीबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…