S R Dalvi (I) Foundation

Tr. Kailas Ladke

Tr. Kailas Ladke

आज आपण श्री कैलास नागो लाडके, यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. कैलास सर हे औरंगाबाद येथे राहत असून गेले २७ वर्ष शिक्षक क्षेत्रात कार्य करत आहेत. सध्या ते जिल्हा परिषद प्रा.शा.बनशेंद्रा केंद्र हतनूर ता कन्नड या शाळेत कार्यरत आहेत व केंद्र प्रमुख हतनूर केंद्राचे प्रभारी केंद्र प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

समाजाची सेवा व्हावी, मुलांना घडवण्याचे काम करता यावे म्हणून 1990 साली त्यांना शिक्षक व्हावेसे वाटले. त्यांच्या शिक्षक म्हणून 27 वर्षाच्या प्रवासातील अविस्मरणीय अनुभव म्हणजे त्यांची पहिली शाळा माळेगाव जरंडी ता सोयगाव येथे होती, या गावाला जाण्यासाठी  त्यांना 5 किलोमीटर पायी किंवा सायकलने जाव लागायचं, त्यावेळेस त्यांनी ठरवलं की या गावातच राहायचं, मग गावात एक खोली गावातल्या लोकांनीच त्यांना पाहून दिली. गावात राहायला गेल्यावर त्यांच्यासाठी स्वतंत्र नळ होता, गावकरी सकाळी त्यांना दूध तसेच शेतातील भाजीपाला आणून द्यायचे, सणावाराला त्यांना  जेवायला बोलवायचे, सर्व प्रकारचा वानोळा त्यांना द्यायचे, कोणत्याही समाजाचे लग्न असो त्यांचे नाव पत्रिकेत टाकायचे, एवढे प्रेम व आपुलकी मिळायची, मग ते  गावात असतांना रविवारी पण पूर्ण दिवस शाळा भरवायचे.

त्यांच्या शाळेजवळ खूप मोठी दगडाची जुनी खान होती. त्यामुळे शाळेला मैदान नव्हते,गावात हरीनाम सप्ताह बाबत बैठक होती तेव्हा त्यांना बैठकीला बोलावण्यात आले होते, सर्व विषय संपल्यावर त्यांनी शाळेजवळ जुनी दगडाची खान बुजवून शाळेला मैदान तयार करण्याचा प्रस्ताव मांडला यासाठी गावातील जे सधन व्यक्ती होते त्यांनी दोन दिवस ट्रॅक्टर देण्याचे ठरवले, डिझेल साठी पैसे पालक, गावकरी व गावात येणारे कापसाचे व्यापारी यांच्या कडून वर्गणी जमा करण्याचे ठरवले. 15 दिवसात वर्गणी जमा झाली. या साठी गावातील तरुण मुलांनी श्रमदान करायचे ठरवलं मग दोन दिवस दोन ट्रॅक्टर व 15-20 तरुण मुलं मिळून जुनी दगडाची खान बुजवली व शाळेचे मैदान तयार झाले.

मग असंच प्रत्येक वर्षी शाळेतील विविध कामे त्यांनी केली. कैलास सर त्या गावात इतके रमले की ते गावचं त्यांचेच झाले होते, परंतु 2002 साली माझी बदली झाली. माझं सामान भरायला सर्व गाव जमा झाले होते, सर्व जण रडत होते,सर नका ना तुम्ही जाऊ असे म्हणत होते. या प्रसंगी  प्रत्येक घरातून टोपी टॉवेल, माझ्या पत्नीला साडी चोळी दिली.हा प्रसंग त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय असा हा प्रसंग आहे. आजही त्या गावात लग्न असल्यास त्यांना फोन करून लग्नाला या गुरुजी असं आग्रहाचे निमंत्रण दिले जाते.
त्यांची आतापर्यंतची मोठी अचिव्हमेंट म्हणजे त्यांच्या पहिल्या शाळेतील विद्यार्थी तहसीलदार, सैन्यात अधिकारी, ग्रामसेवक, आहेत.
समाजात शिक्षक-विद्यार्थी एकमेकांबदल प्रेम आदर, सहकार्य, त्याग व देण्याची वृत्ती वाढली पाहिजे. ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांनी समाजासाठी चांगलं काम कराव, समाज, विध्यार्थी आदर्श कसा होईल यासाठी काम करावे असे त्यांना वाटते.