S R Dalvi (I) Foundation

Tr Kishor Walavalkar

Tr. Ashwini Jadhav

आज आपण शिक्षक श्री. किशोर अरविंद वालावलकर (एम्.ए. बी.एड.) यांच्या शिक्षक होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.श्री.किशोर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या ठिकाणी राहत असून गेली १६ वर्ष ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आणि ते सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त ता. सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेतसहाय्यक शिक्षक म्हणून कार्य करत आहेत.श्री. किशोर यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे शिक्षकी पेशा कसा असतो याचे बाळकडू त्यांना अगदी लहानपणापासून घरातच मिळत गेले. शिक्षकाचा प्रवास त्यांना अगदी जवळून अनुभवता आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या खेड्यापाड्यांत वडिलांबरोबर शाळांच्या परिसरात वावरताना ‘शाळा’ हेच आपले दुसरे घर मानणा-या गुरुजनांचा सहवास त्यांना लाभला व आपणही भविष्यात नवी पिढी घडवणारे शिक्षक व्हावे हे स्वप्न त्यांच्या मनात आकार घेऊ लागले.

जीवनाच्या, शैक्षणिक प्रवासाच्या पुढील एक-एका टप्प्यावर (शालेय ते महाविद्यालयीन) मनावर संस्कार करणारे, जीवनाला दिशा देणारे उत्तमोत्तम शिक्षक त्यांना लाभले आणि  त्यांनीच दिलेल्या शिदोरी मुळे त्यांचा  शिक्षक होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला.
या संदर्भात किशोर यांनी एक प्रसंग ही आपल्याबरोबर शेअर केला. ते दहावीत असताना ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी त्यांच्या प्रशालेत  विद्यार्थी शिक्षक होऊन शालेय कामकाजाचा अनुभव घेत. यावेळी ते ही इतर अनेक विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षक झाले होते . त्यावेळी विद्यार्थी शिक्षकातून ‘उत्कृष्ट शिक्षक’ निवडला जाई व त्याचा गौरव केला जात असे. आणि त्या वर्षी शिक्षक दिनाच्या समारोप प्रसंगी त्यांच्या मुख्याध्यापकांनी ‘उत्कृष्ट शिक्षक’ म्हणून किशोर यांच्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप दिली. हा प्रसंग त्यांना आजचा शिक्षक होण्यास खुप महत्वपूर्ण ठरला असे. श्री. किशोर यांना आज ही वाटते.

‘शिक्षक’ क्षेत्र निवडताना काही अडचणी:

किशोर यांना शिक्षकच व्हायचे ते ही माध्यमिक स्तरावरचे ही प्रबळ इच्छा होती. त्यासाठी त्यांनी कला शाखेतील पदवी ‘इंग्लिश’ या मुख्य विषयासह संपादन केली. पुढे व्यावसायिक पात्रता मिळविण्यासाठी बी.एड. ला गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश मिळवला आणि बी.एड. झाले. परंतू नोकरीच्या बाजारात सहजासहजी नोकरी मिळणे शक्य नाही हे वास्तव स्विकारून त्यांनी सुरुवातीला खाजगी क्लास घेण्याचा मार्ग पत्करला. या वेळीही दहावी-बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवून ते अनेकांच्या कौतुकास पात्र ठरले . पुढे त्यांनी राजापूर, सांडवे-देवगड,आचरा हायस्कूल ता. मालवण या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात नोकरी मिळवून शिक्षकी पेशाचा श्री गणेशा केला. काही ठिकाणी विनावेतन, तर काही ठिकाणी अल्प मानधनावर काम करणे असा संघर्ष त्यांना करावा लागला. त्यानंतर मात्र ते सध्या ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेत म्हणजेच सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त मध्ये २००६ मध्ये ‘शिक्षण सेवक’ म्हणून रुजू झाले आणि तिथुन त्यांच्या शिक्षक म्हणून प्रवासास ख-या अर्थाने सुरुवात झाली.

अविस्मरणीय प्रसंग / क्षण:

शिक्षक किशोर यांना शैक्षणिक क्षेत्रात वावरत असताना अनेक प्रसंग बरे-वाईट प्रसंग अनुभवता आले. परंतू उमेदीच्या काळात शिक्षण सेवक असताना विद्यार्थी पटसंख्या टिकविण्यासाठी व स्वतःचे शाळेतील स्थान कायम करण्यासाठी फार कसरती त्यांना कराव्या लागल्या. आजही त्या कमी अधिक प्रमाणात कराव्याच लागतात. त्यासाठी दशक्रोशीत काही वेळा जिल्हाभरातून मुले आणून त्यांचा सर्व खर्च करणे स्वतः च्या मुलांप्रमाणे सांभाळ करणे असं काम ही ते आणि इतर बरेच शिक्षक करायचे. त्यातली काही मुले किशोर यांच्या सोबत राहायची. त्यामुळे अर्थातच या मुलांच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्यावर असायची. एक दिवशी त्या मुलांपैकी इयत्ता आठवीतील केशव नावाचा मुलगा जो थोडासा शरीराने अशक्त होता. त्याला सोबतच्या दुसऱ्या मुलाने थट्टामस्करीत धक्का मारला त्यामुळे तो डोक्यावर पडला व तेथेच त्यांची शुद्ध हरपली. काही केल्या तो डोळे उघडेना. सर्व शिक्षक आले. तेव्हा काय करावे ते त्यांना समजेना. शेवटी त्याला स्थानिक डॉक्टर जवळ उचलून नेले. त्यानेही प्रयत्न केले. त्यावेळी तो थोडा शुद्धीत यायचा आणि पुन्हा डोळे मिटायचा. शेवटी त्यांच्या सल्ल्यानुसार सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल केले  तेथे उपचार सुरू झाले. त्यांच्या आई-वडिलांना हॉस्पिटलमध्ये बोलावले. रडणाऱ्या आई-वडिलांना पाहून मलाही राहवेना. शेवटी ती रात्र आम्ही त्या दवाखान्यात जागून काढली. तब्बल १२ तासानंतर तो विद्यार्थी शुद्धीवर आलेला पाहून आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. हा दिवस त्यांच्या आयुष्यातला कधीही न विसरता येणारा प्रसंग आहे.

अचीवमेंट:

– शैक्षणिक क्षेत्रातील आजवरच्या वाटचालीत अनेक स्पर्धा व उपक्रमातून सहभागी  होऊन अगदी  तालुका, जिल्हा ते राज्य पातळीवरील(निबंध, काव्यलेखन,कथालेखन) पारितोषिके प्राप्त केली आहेत.
– अनेक सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमांत सहभाग घेतला. विविध पुरस्कारही मिळाले.
– नुतन बाल शिक्षण संघ, कोसबाड यांनी “शिक्षण पत्रिका” या मासिकातर्फे आयोजित केलेल्या “आजचा शिक्षक कसा असावा? या राज्यस्तरीय लेख स्पर्धेत आलेला प्रथम क्रमांक.
–  अलीकडील सर्वोत्तम गोष्ट! परंतू खरे तर ज्यावेळी माझा विद्यार्थी यशस्वी झालेला पाहतो तीच मी माझी मोठी achievement मानतो.

समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल व्हावेत असे वाटते:

आजचं शिक्षण काळानुरुप बदलते आहे. या बदलत्या प्रवाहांना विद्यार्थी- शिक्षक व एकूणच समाजाने आत्मसात करावे. ‘शिक्षणाने अपेक्षित समाजपरिवर्तन व्हावे’ मूल्यांची घसरण होऊन न देणे यासाठी शिक्षकांनी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहावे. विद्यार्थी-शिक्षक यांचे नाते जपले जावे. समाजाचा शिक्षणाकडे, शिक्षकांकडे पाहण्याचा नकारात्मक, उदासिन दृष्टिकोन वाढतो आहे.. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी शिक्षक, व्यवस्था व प्रशासन व सामाजिक ,शैक्षणिक संस्थानी आपल्या कार्यशैलीत आमूलाग्र बदल करणे गरजेचे वाटते. नवे शैक्षणिक प्रयोग करताना त्याचा समाजाभिमुख विचार करणे, त्यांची सामाजिक उपयोगिता तपासणे गरजेचे वाटते. असे मत शिक्षक किशोर यांनी  मांडले.

शिक्षक होणा-यासाठी संदेश:

गुणवत्तेला पर्याय नाही. तुमच्याजवळ जर गुणवत्ता असेल, प्रामाणिक काम करण्याचा विधायक दृष्टिकोन असेल तर, शिक्षकी पेशासारखे राष्ट्रनिर्माणाचे, सामाजिक परिवर्तनाचे दुसरे पवित्र क्षेत्र नाही. अद्ययावत ज्ञान मिळविण्यासाठी नवं तंत्रज्ञानाची कास धरा. वाचन, मनन, चिंतन व ज्ञानाचे उपयोजना या चतु:सुत्रीचा वापर करा. सतत प्रयोगशील राहा. नाविन्याचा व सृजनाचा ध्यास धरा. स्वतः बदला,जग बदलण्याची ताकद तुमच्यात आपोआप येत जाईल. असा मोलाचा सल्ला श्री. किशोर यांनी दिला.

Scroll to Top