आज आपण श्रीमती क्रांती लालासाहेब भोसले (बी.ए.डी.एड.) यांच्या शिक्षिका होण्यापर्यंतचा प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षिका क्रांती या मुक्काम पोस्ट श्रीनगर तालुका रायगड येथे राहत असून सध्या त्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवखोल या शाळेत कार्यरत आहेत. त्यांना या क्षेत्रात एकूण १९ वर्षांचा अनुभव आहे.
त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांनी शिक्षिका व्हावे कारण शिक्षकासारखे आदर्श पवित्र क्षेत्र दुसरे कुठलेच नाही,असं त्यांचे मत होते आणि दुसरं असं की लहानपणापासून त्यांना शिकवत आलेल्या सर्व शिक्षकां बद्दल मनामध्ये असलेला आदरभाव व ज्ञानदानाचे पवित्र कार्य यामुळे त्यांना शिक्षक व्हावेसे वाटले.
ज्या विद्यार्थ्यांना शिकवणे त्यांना कठीण वाटते अशा विद्यार्थ्यांना विविध खेळ, गाणी याद्वारे आनंददायी पद्धतीने त्या शिकवतात. ज्ञानरचनावादाद्वारे कृतीवर भर देऊन विविध शैक्षणिक अनुभव देतात. विद्यार्थ्यांच्या क्षमता कौशल्यांचा विचार करून विविध शैक्षणिक साधनांचा वापर करून मुलांना शिकवतात. ई- लर्निंग तंत्राचा वापर करून त्या अध्यापन करतात.
विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक करतात. त्यांचे गट करून गटातून त्यांचा कृतीयुक्त जास्तीत जास्त सहभाग मिळवतात. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अगदी लहान गोष्ट जरी चांगली केली तरी त्यांचे ते कौतुक करतात. शाब्बासकीची थाप देऊन व त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करतात.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रमांचे त्या आयोजन करतात. प्रत्यक्ष मुलांना प्रयोग करण्याची संधी देतात. प्रयोगाचे साहित्य त्यांना हाताळायला देतात. स्तुती करून त्यांना प्रोत्साहन देतात .विद्यार्थ्यांचे विचार प्रगल्भ होण्यासाठी बाल नाटिका,कोडी, प्रश्नमंजुषा रांगोळी,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे त्या आयोजन करतात.
पालकांची संवाद साधायला त्यांना खूप आवडते. त्यांच्या शाळेतील पालकांशी त्यांचे संबंध अगदी सलोख्याचे व जिव्हाळ्याचे आहेत. शाळेच्या गरजांसाठी त्यांच्या शाळेतील मुलांचे पालक कोणतीही मोफत मदत करण्यास सदैव तत्पर असतात.
विविध अमूर्त कल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करण्यासाठी संगणकाचा वापर त्या शाळेत करतात. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करतात. दीक्षा ॲप तसेच विविध शैक्षणिक ॲप,Youtube इत्यादी Digital माध्यमाच्या द्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान देतात.
त्या करित असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल म्हणून रायगड जिल्हा परिषदेने सन 2022 चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व अविष्कार फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर केला आहे.
त्यांनी त्यांच्या रा.जि.प.शाळा देवखोल या शाळेमध्ये तंबाखूमुक्त हा उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे त्यांचे गाव आता संपूर्ण तंबाखू व्यसनमुक्त झालेले आहे.