आज आपण शिक्षिका सौ. मनिषा राजेंद्र कुऱ्हाडे (B.A English,DEd,DSM) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.मनीषा या नारायणगाव, तालुका- जुन्नर ,जिल्हा -पुणे येथे राहत असून मागील तेवीस वर्षांपासून त्या शिक्षण क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत उपशिक्षिका म्हणून काम करत आहेत.
शिक्षिका मनीषा अगदी इयत्ता दुसरीपासूनच वर्गात त्यांच्या मित्र-मैत्रिणींना शिकवायच्या .तसेच त्यांचे शिक्षक हे त्यांच्यासाठी समाजातील सगळ्यात जास्त आदर्श व्यक्तिमत्व होते .त्या हायस्कूलमध्ये असताना त्यांच्या आजूबाजूच्या मुले-मुली ,वर्गातील मैत्रिणी त्यांना गणित व इंग्रजी विषयातील प्रश्नांची उत्तरे विचारायला येत असत. मग त्यांना समजावून सांगताना त्यांनाही खूप आनंद व्हायचा. या सगळ्याच अनुभवचा त्यांच्यावर खुप सकारात्मक प्रभाव पडला त्यांच्यावर संस्कार घडवणाऱ्या व प्रभाव टाकणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांच्या आदर्शामुळे त्यांना शिक्षक व्हावेसे वाटले.
‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना अडचणी :
शिक्षकीपेशा हे क्षेत्र निवडताना शिक्षिका मनीषा यांना काही अडचणींना तोंड द्यावे लागले होते. त्यांचे शिक्षक आणि त्यांच्या घरातल्यांचा त्यांनी शिक्षक होण्यासाठी विरोध होता .त्यांच्या मते त्यांनी इतर इतर क्षेत्रातील चांगल्या संधी सोडून शिक्षक क्षेत्र निवडू नये असे त्यांना वाटत होते. त्यांच्या अशा प्रश्नांना मनीषा त्यांच्या परीने उत्तर देत होत्या. नातेवाईक व शिक्षकांनी त्यांना त्यांच्या शिक्षक होण्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. पण शिक्षक पेशाविषयीच्या अभिमानामुळे त्यांच्या निर्णयात तसूभरही फरक पडला नाही . नंतर त्यांच्या ठाम निर्धार पाहून त्या सर्वांनी त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि आता त्या अतिशय अभिमानाने सांगतात की, त्या Distinction मिळवून पहिल्याच प्रयत्नात मुलाखत यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून त्यांची निवड झाली आहे.
अविस्मरणीय आहे:
शिक्षिका मनीषा यांनी एप्रिल 1998 मध्ये जिल्हा परिषद शाळेत उपशिक्षिका म्हणून सेवेस सुरुवात केली . डिसेंबर 2000 मध्येच पुणे *जिल्ह्याचे CEO मा. श्री .एस.बी.पाटील* यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चाचण्यांतर्गत जुन्नर तालुक्यातील एकमेव आदर्श शिक्षिका म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.
– द्विशिक्षकी शाळेत काम करत असताना, बिबट्याप्रवण क्षेत्रात बिबट्यांची भीती असतानादेखील त्यांचा इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गांचा सर्व चाचण्यांचा निकाल शंभर टक्के होता .आणि वर्गातील 20 टक्के विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण आणि 70 टक्के विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांच्या पुढे गुण मिळवून त्यांचे दोन्ही वर्ग जुन्नर तालुक्यात अव्वल ठरले होते. त्यांच्या विद्यार्थ्यांची कष्ट करण्याची वृत्ती, त्यांच्यावरील विश्वास ,त्यांच्या सहकारी आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे मला हे शक्य झाले होते.असे मनीषा आवर्जून सांगतात.
Achievement :
– महाराष्ट्र राज्यातील SCERT या संस्थेत गणित विभागांतर्गत राज्यातील गणित विषयातील अतिशय तज्ज्ञ अधिकारी व शिक्षकांसोबत काम करण्याची मिळालेली संधी
– वर्कशॉप मध्ये केलेल्या कामाचे वरीष्ठांमार्फत झालेले कौतुक
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी काय बदल व्हायला हवेत:
शिक्षकांची निवड केली जात असताना ज्ञानाबरोबर सर्व क्षमतांना ही अनन्यसाधारण महत्त्व आहे हे लक्षात ठेवले पाहिजे .सर्वच शिक्षक आपल्या पेशासंबंधी स्वाभिमान तसेच सचोटी आणि प्रामाणिकपणा यांना प्राधान्य देणारे असावेत. नवीन पिढी घडविण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे शिक्षक. म्हणून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील वातावरण मैत्रीपूर्ण असणे गरजेचे आहे . असे शिक्षिका मनीषा यांना वाटते.
तसेच विद्यार्थ्यांनी न लाजता ,न घाबरता आपले प्रश्न शिक्षकांना विचारून शंकानिरसन करून घेणे आणि तसे खेळीमेळीचे मोकळे वातावरण शिक्षकांनी ठेवले तरच शिक्षक विद्यार्थी यांच्यातील संबंध गुरुकुल शिक्षणपद्धती सारखे अतिशय दृढ आणि निकोप होतील. यामुळे गुरू-शिष्याचे नाते पुन्हा एकदा बहरेल. असे मत शिक्षिका मनीषा यांनी मांडले.
आणि एक सक्षम नागरिक घडवण्याचे कार्य शिक्षकांच्या हातून होईल .विद्यार्थ्यांच्या फक्त बौद्धिक विकासास चालना न देता शारीरिक व भावनिक विकास साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे .विद्यार्थ्यांच्या क्षमता, आवड ,सुप्त कलागुणांना लक्षात घेऊन त्यांना खर्या अर्थाने मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. असे ही त्या म्हणाल्या.
शिक्षक होणाऱ्यांसाठी सल्ला:
शिक्षकी पेशात असलेला चांगला पगार, नोकरीची शाश्वती व स्थैर्य आणि शाळेची वेळ व मिळणाऱ्या सुट्ट्या पाहून हा पेशा स्वीकारू नका .मनापासून जर तुम्हाला विद्यार्थ्यांना काही नव्या पद्धतीने मार्गदर्शन करून ,स्वतः कायम विद्यार्थी राहून चौकस बुद्धीने ,वैज्ञानिक दृष्टिकोन वापरून नवनव्या पद्धतींचा वापर करून शिक्षणात रंजकता आणून विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी लावणे गरजेचे आहे. विद्यार्थी कोणत्याही दडपणाखाली न वावरता ,अतिशय आनंदाने मुक्त वातावरणात स्वतःच्या आवडीनिवडी जपून आनंददायी शिक्षण घेईल तेव्हाच शिक्षक खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. म्हणूनच पोटार्थी होण्यापेक्षा सदैव ज्ञानार्थी होऊन नवनवीन तंत्रज्ञान शिकून स्वतः अपडेट होऊन विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान अवगत करून देणारा शिक्षक नक्कीच विद्यार्थी प्रिय होईल. म्हणून अतिशय विचार करूनच शिक्षक पेशाची निवड करावी. असा मोलाचा सल्ला शिक्षिका मनीषा यांनी दिला.