मी श्री. मनोज भाऊ सुतार (डी .एड.,एम .ए. बी-एड ,डी .एस. एम.) रायगड येथे राहतो. गेले 21 वर्षे शिक्षक क्षेत्रात कार्यरत असून सध्या अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द ता. तळा जि. रायगड येथे शिकवत आहे.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
माझे आई-वडील प्राथमिक शिक्षक होते .त्यांच्या संस्कारक्षम वातावरणात मी माझे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले .माझे गाव ग्रामीण भागात मोडते. माध्यमिक शिक्षण घेत असताना माझ्या गावातील मुलींचे शिक्षण सातवीपर्यंतच थांबायचे. पालक त्यांना शिकवत नसायचे आणि मग पुढे कामाकरिता त्यांना मुंबईला पाठवायचे. अशातच मी दहावीला असताना माझ्या मनात विचार आला की माझ्याबरोबर ह्या सर्व मुली देखील शिकल्या पाहिजेत या विचाराने मी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना दहावीला असतानाच शिकवायला सुरुवात केली .पुढे बारावी झालो आणि डीएड ला नंबर लागला . बारावी झाल्यानंतर मेडिकल तसेच विविध कंपन्यांच्या अप्रेंटीशीप मिळाल्या होत्या परंतु माझ्या गावातील मुले शिकली पाहिजेत या उद्देशाने मी डीएड ला ऍडमिशन घेतलं आणि गुरुजी झालो .मला असं वाटत नव्हतं की मी शिक्षक होणार आहे. परंतु पूर्वी पासून मुलांना शिकवण्याची सवय आणि त्याच मुलांचा असणारा सपोर्ट, त्यांच्या पालकांची असणारी सोबत आणि माझी पुण्याई माझ्या कामाला आली आणि मी शिक्षक झालो.
सुरवातीला शिक्षक हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
सन 1997 साली डीएड पूर्ण केलं आणि शिक्षक या नोकरीच्या शोधात जाऊ लागलो. एक वर्षभर मात्र मला कुठे ही जॉब मिळाला नाही . त्या वेळेला मात्र मी जवळच्याच गावातील एका हायस्कूलमध्ये विनामूल्य सहा महिने शिकवण्याचे काम केले. पुढे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेच्या ठिकाणी इंटरव्यू दिला आणि मला अभिनव ज्ञान मंदिर उसर खुर्द ता. तळा, जि रायगड या विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. शाळा ही विनाअनुदानित तत्त्वावर असल्यामुळे अगदी 700 रुपये मानधनावर मी काम करू लागलो. 1999 ते 2004 या कालावधीत नाममात्र मानधनावर काम केल्यानंतर 20 टक्के अनुदान शाळेला प्राप्त झाले. पुढे ते 100% होण्यास 2008 साल उजाडले. म्हणजे 1999 ते 2008 नऊ वर्षे मी अगदी थोड्याफार मानधनावर काम केले परंतु जे माझ्या संस्थेत शिकायला मिळाले ते अनुभव अगदी सोन्यासारखे होते. शिक्षक म्हणून नोकरी मिळवण्यासाठी थोडीफार अडचण निर्माण झाली परंतु पुढे भविष्यकाळ उज्वल होताच आणि झाला.
21 वर्षाच्या प्रवासातील अविस्मरणीय क्षण कोणता?
माझ्या 21 वर्षाच्या शिक्षक सेवेच्या प्रवासातील अविस्मरणीय क्षण अनेक आहेत. त्यापैकी एक क्षण म्हणजे मी सेवेत लागल्यानंतर सन 2000 ला आदिवासी आश्रम शाळा उतेखोल या ठिकाणी आदिवासी मुलींचे ईशस्तवन व स्वागतगीत बसविण्याची जबाबदारी माझ्यावर दिली गेली. मला संगीताचं थोडाफार ज्ञान असल्याने व हार्मोनियम वादन येत असल्यामुळे ती जबाबदारी मी स्वीकारली. आदिवासी विद्यार्थिनींची भाषा, त्यांचे राहणीमान, त्यांच्या सवयी ,त्यांचे वागणे या सर्व गोष्टींचा विचार करून मी एका महिन्याभरामध्ये त्या मुलींचे सुस्वर स्वरांमध्ये ईशस्तवन स्वागत गीत बसवले त्यांची बोली भाषा बदलून शुद्ध भाषेमध्ये असलेलं इशस्तवन आणि स्वागतगीत ऐकून कार्यक्रमातील मान्यवरांनी माझं भरभरून कौतुक केले. दुसरा क्षण म्हणजे, एकदा ‘एक सूर एक ताल’ या कार्यक्रमात मी तळा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांचे समूहगान गायन बसविले आणि सादर केले. त्यामुळे माझ्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. शाळेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपली यामुळे दिशा फाउंडेशन मुंबई च्या वतीने मला सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करिता पुरस्कार मिळाला. 5 सप्टेंबर 2021 रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मला लाभला.1 ऑक्टोबर 2021 रोजी रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मला मिळाला. हा पुरस्कार माझ्या जीवनातील सुवर्णक्षण होता. पण त्याही पलिकडे पुढे जाऊन 13 नोव्हेंबर 2021 रोजी एस आर दळवी फाउंडेशन च्या वतीने मला महा शिक्षक या पुरस्काराच्या रूपाने माझ्या जीवनातील परमोच्च आनंद देणारा क्षण सोनेरी रूपाने आला. 21 वर्ष केलेल्या सेवेचं हे सगळं काही फलित होतं असंच मला वाटतंय.
तुमची आत्तापर्यंत ची मोठी Achievement कोणती?
शाळेमध्ये काम करत असताना आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून देऊन त्यांना शाळेच्या व शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम हे मी प्रामाणिकपणे केलेला आहे आणि करत आहे. शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळवून बहुतेक गरजा पूर्ण केल्या आहेत. युवा अनस्टॉपेबल अहमदाबाद यांच्या माध्यमातून शाळेला व परिसरातील जवळजवळ सतरा शाळांना डिजिटल स्मार्ट रूम ची सुविधा पुरवण्यात सहकार्य केले आहे. तसेच एस आर दळवी फाउंडेशन च्या वतीने मला महा शिक्षक या पुरस्कार मिळाला.
समाजात शिक्षक -विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे असं वाटते?
समाजातील शिक्षक- विद्यार्थी- पालक ही शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची आंतरक्रिया आहे. ही आंतरक्रिया जर योग्य साखळी प्रमाणे चालली तर शिक्षणाचा कार्य हे उत्तरोत्तर वाढत राहणार आहे. याकरिता शिक्षक जेवढे विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेत असतात तेवढीच मेहनत पालकांनी सुद्धा घेणे गरजेचे आहे. पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये बराच फरक आहे. जनरेशन बदललेल आहे. आपण नवीन तंत्रज्ञानाच्या युगात सगळेजण जीवन जगत असताना शिक्षकांचे योगदाना बरोबर पालकांचा सहकार्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे .यामधूनच विद्यार्थी विकास हा साधला जाणार आहे. गेली दोन वर्षे आपण covid-19 मधनं सावरत असताना आज टप्प्याटप्प्याने शाळा सुरू झालेले आहेत आणि या शाळा सुरू होत असताना विद्यार्थ्यांमध्ये असणारे ही चंचलता, विद्यार्थ्यांमध्ये असणारी उदासिनता , ऑनलाइन क्लास मुळे विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल प्रति वाढणारी आस्था, या सर्व गोष्टींवर बारकाईने विचार होणे गरजेचे आहे. या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक संतुलन देखील राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. याकरिता विद्यार्थी पालक व शिक्षकांनी आपली मानसिक सुदृढता राखून शैक्षणिक कार्य वाढवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. याकरिता शिक्षकांनी मोबाईलचे एप्लीकेशन प्रमाणे अपडेट व अपग्रेड राहणे गरजेचे आहे. नवनवीन शिक्षण, नवनवीन संकल्पना, नवनवीन तंत्रज्ञान हे समजून घेतले पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीही संस्कारक्षम वातावरणाचा उपयोग करून आपल्या भविष्याच्या दृष्टीने योग्य ती वाटचाल करण्याकरिता दृढनिश्चय करावा आणि हो या सर्वांमध्ये आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला आपल्या मुलाला सजगतेने समजून घेऊन त्याच्याप्रती शिक्षण रुपी प्रेम जागृत करावं असं मला वाटते.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?
या युगामध्ये होणारे शिक्षक हे नवीन तंत्रज्ञानाचे पाईक असणारे शिक्षक असणार आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांनी केवळ पदवी घेऊन आपण शिक्षक झालो आहोत हे विचारात न घेता ती पदवी आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकल रूपाने किती आपण प्रकट करतोय हे महत्त्वाचे आहे. म्हणून आजच्या शिक्षकाने अपडेट व अपग्रेड राहावं त्याच बरोबर नवीन पिढीला पोषक असे ज्ञान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. सध्याचा विद्यार्थी हा 5G स्पीड सारखा असून तो अत्यंत चाणाक्ष आहे त्यांच्या चाणाक्ष बुद्धीला आवश्यक असणारच ज्ञान शिक्षकाने तयार केले पाहिजे आणि त्याचे इम्पलेमेंटेशन आपल्या दैनंदिन शिक्षण प्रवाहामध्ये केले पाहिजे. त्यातूनच त्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास, सामाजिक विकास व सर्वांगीण विकास साधला जाईल.