S R Dalvi (I) Foundation

Tr. Monali Shinde

Tr. Monali Shinde

नमस्कार मी मोनाली उदय शिंदे (HSC.DTed). मी वडगाव निंबाळकर, तालुका- बारामती,जिल्हा -पुणे येथे राहत असून आणि गेले  ७ वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. सध्या मी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित,शारदाबाई पवार विद्यानिकेतन डे स्कूल, शारदानगर या शाळेत  इयत्ता ५ वी ते ७वीतल्या विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवण्याचे कार्य करत आहे.

शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले? 

बऱ्याचदा माझ्या घराशेजारी असलेली छोटी मुले मला येऊन अभ्यासासंबंधी प्रश्न विचारायचे त्यावेळी मी त्यांना त्याची उत्तर समजावून सांगायचे आणि सांगितलेले त्यांना समजतय हे  कळायचे तेव्हा  मनाला खूप समाधान मिळायचे असे वाटायचे की, आपण शिक्षक झालो तर किती छान! हेच कारण होते जेव्हा मला शिक्षक व्हावेसे वाटले तसेच माझे बरेच नातेवाईक शिक्षक होते त्यामुळे माझी शिक्षक होण्याची इच्छा आणखी पक्की झाली.

सुरुवातीला ‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?

हो थोड्याफार प्रमाणात आल्या. बरेच जण ‘इतर क्षेत्रातील संधी चांगल्या असताना हे क्षेत्र का निवडत आहे?’ असे प्रश्न करायचे. पण माझा शिक्षक होण्याचा निर्णय ठाम होता.त्यानंतर सहसा काही अडचणी जाणवल्या नाहीत. शिक्षक होण्यासाठी दिलेल्या पहिल्याच मुलाखतीमध्ये माझी निवड ही झाली होती.

शिक्षक म्हणून ७ वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे

मी काम करत असलेल्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेने 2019 मध्ये नेदरलँड येथे तेथील शिक्षण पद्धती अभ्यासण्यासाठी  तेथे जाऊन प्रशिक्षण घेण्यासाठी संस्थेतील माध्यमिक विभागातील ६ जणांची निवड केली त्यामध्ये माझी निवड करण्यात आली. हा प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. कारण केवळ त्यामागे मी प्रामाणिकपणाने केलेले काम व संस्थेचा आपल्या कामावर असलेला विश्वासामुळे शक्य झाले होते.
 
तुमची आतापर्यंतची मोठी Achievement कोणती? 
संस्थेद्वारे नेदरलँड येथे प्रशिक्षणासाठी झालेली निवड आणि सध्या कोअर कमिटी म्हणून निवड.

समाजात शिक्षक-विद्यार्थी  यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज आहे अस वाटते?

शिक्षकांची निवड होताना सर्व क्षमता,ज्ञान, जबाबदारी, प्रामाणिकपणा इत्यादी सर्वच गोष्टींची तपासणी करून निवड व्हावी. कारण समाजात शिक्षक हा पुढील पिढी घडवणारा व समाजात बदल घडवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे.
शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील वातावरण खुल्या प्रकारचे असावे म्हणजे विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी किंवा त्यांना त्यांच्या मनामध्ये वाटत असलेले प्रश्न त्यांनी मोकळेपणाने आपल्या शिक्षकांशी बोलून त्यावर चर्चा करावी इतके मोकळे वातावरण त्यांच्यामध्ये असणे गरजेचे आहे.
शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांशी वागताना तसा विश्वास निर्माण होईल या पद्धतीने वागणे गरजेचे आहे.
जेवढे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना जवळचे वाटतात तेवढे ते स्वतःचे मनातील सर्व शंका तुमच्याशी बोलून त्याचे निरसन करतात.
शिक्षण क्षेत्रामध्ये आलेल्या नवीन गोष्टी यांचे प्रशिक्षण वेळोवेळी शिक्षकांना मिळणे गरजेचे आहे. फक्त शिक्षकांना ज्ञान असून उपयोग नाही तर ते ज्ञान तुम्हाला वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात देता येणे गरजेचे आहे किंवा त्यांना समजेल असे प्रेझेंटेशन करता येणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना फक्त  तोंडी ज्ञान न देता त्यांच्या प्रत्येक विषयाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे असते.
त्यासाठी कोणता विद्यार्थी कोणत्या क्षमतेला आहे हे ओळखणे गरजेचे आहे व विद्यार्थ्यांच्या त्या क्षमतेनुसार  त्यांना मार्गदर्शन करणे व संकल्पना समजून सांगणे गरजेचे आहे त्यासाठी शिक्षकांनी स्वतः स्वतःच्या संकल्पना विद्यार्थ्यांना कशा समजून सांगायच्या याचा विचार करणे आवश्यक आहे.

ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?

शिक्षण क्षेत्रामध्ये जे बदल होत आहेत त्यानुसार शिक्षकांनी अद्ययावत होणे गरजेचे आहे.
जसे की आपण म्हणतो आजची पिढी ही खूप फॉरवर्ड आहे किंवा त्यांना टेक्नॉलॉजी व इतर गोष्टीतील जास्त माहिती आहे त्याप्रमाणे आत्ताच्या पिढीमधील विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने ज्ञान देणे गरजेचे आहे हे अगोदर ओळखले पाहिजे व त्यानुसार ज्ञान द्यावे.
उदा.जसे की कोरोना चे महासंकट आल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे गरजेचे झाले व त्यानुसार शिक्षकाला ऑनलाइन शिक्षण पद्धती समजून घ्यावी लागली व PPT प्रेझेंटेशन किंवा विविध ॲप वापरून त्याचा वापर करून शिक्षकांना  विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण द्यावे लागले.
Scroll to Top