आज आपण श्री प्रसाद रामा गावडे (एम. ए. बी एड, डी एड) यांचा शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री प्रसाद हे गाव आंबोली, तालुका सावंतवाडी येथे राहत असून गेले ११ वर्षे शिक्षक क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या ते जि प प्राथमिक शाळा आसोली नं १ ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग येथे अध्यापनकरत आहेत.
प्रसाद यांचे वडील शिक्षक असल्याने त्यांच्या घरामध्ये शिक्षकी वातावरण पहिल्यापासूनच होते आणि शिक्षकी पेशाबद्दल त्यांच्या मनामध्ये नेहमीच आदर आणि आवड होती. पुणे येथे ज्युनिअर कॉलेज ला असताना त्यांना त्यांच्या शिक्षकांकडून प्रेरणा मिळाली आणि तेव्हाच त्यानी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला.
‘शिक्षक’ क्षेत्र निवडताना अडचणी:
हे क्षेत्र निवडताना प्रसाद यांना काही अडचणी अशा आल्या नाहीत. शिक्षक म्हणून सेवेची सुरुवात प्रसाद यांनी ज्या शाळेत शिकले त्याच गावातील युनियन इंग्लिश स्कूल आंबोली या शाळेतून केली. त्यामुळे सोबत काही नवीन शिक्षक सोडले तर त्यांचेच शिक्षक होते त्यामुळे त्यांना फारशी कोणतीही अडचण जाणवली नाही.
अविस्मरणीय क्षण/प्रसंग
शिक्षक म्हणून काम करताना युनियन इंग्लिश स्कूल आंबोली येथे विविध उपक्रम घेत असताना आंबोली गावातील मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब या संस्थेच्या माध्यमातून शाळेमध्ये पर्यावरण विषयक विविध उपक्रम होत होते त्यांच्या माध्यमातून सन २०१५ साली एका आंतरराष्ट्रीय प्रकल्पामध्ये प्रसाद यांची शाळा सहभागी झाली होती. प्रकल्पासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या एक विद्यार्थ्याला प्रकल्प सादरीकरणासाठी अमेरिका येथे बोलविण्यात आले होते. त्यांना १० दिवस अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये राहून आंतरराष्ट्रीय अनुभव घेता आला. तेथिल शाळा व शैक्षणिक बाबी पाहता आल्यात. ही गोष्ट शिक्षक प्रसाद यांच्यासाठी अविस्मरणीय प्रसंगातील आहे.
शिक्षक विद्यार्थ्यी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज:
आज शाळामधून विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देताना आताच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात व्यावहारिक बाबींचा जास्तीत जास्त समावेश करणे गरजेचे आहे. जगामध्ये जसजसे बदल होत आहे तर तशाप्रकारे आपणही काळानुसार कसं बदललं पाहिजे याच व शिक्षण देण आवश्यक आहे. आज शाळेत शिक्षण उत्तम दर्जाचे मिळत आहे परंतु समाजातील अनावश्यक बाह्य गोष्टींकडे मुलांचे आकर्षण जास्त आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेट मुळे मुलांना जग खूप जवळ असल्याचे भासते त्यामुळे कधीतरी प्राचीन गुरुकुल पद्धतीनुसार शिक्षणाची आवश्यकता आहे असे प्रसाद यांना वाटते.
ज्यांना शिक्षक होण्याची इच्छा आहे त्यांना काय सल्ला द्यायला?
शाळेत अध्यापन करणारे फक्त शिक्षक असतात, आपल्याला ज्या गोष्टीची चांगली माहीती आहे, आपल्याला ज्या गोष्टीबद्दल ज्ञान आहे ते ज्ञान इतरांपर्यंत चांगल्या प्रकारे पोचवणारा प्रत्येक व्यक्ती हा शिक्षक असतो असे प्रसाद यांना वाटते. शिक्षक होण्यासाठी ‘ वाचन’ ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे वाचनातूनच प्रगल्भता येते त्यामुळे अवांतर वाचनाची आवश्यकता आहे आणि शिकवणे ही एक कला आहे त्यामुळे ती कला आत्मसात करणे आवश्यक आहे. तसेच काळाबरोबर शिक्षकाने प्रत्येक बाबतीत अपडेट राहणे खूप आवश्यक आहे. असा सल्ला प्रसाद यांनी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना दिला.