S R Dalvi (I) Foundation

Tr .Prashant Chipkar

Tr .Prashant Chipkar

आज आपण श्री. प्रशांत भालचंद्र चिपकर ,(एमएससी फिजिकल केमिस्ट्री ), एम.एस.सी (सब्जेक्ट कम्युनिकेशन- केमिस्ट्री ), बीएड , डी.एस.एम. , एम. ए. (एज्युकेशन). यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रशांत सर हे सिंधुदुर्ग येथे राहत असून त्यांना शिक्षण क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते दाभोली नं 2, वेंगुर्ले या शाळेत कार्यरत आहेत.

खरं म्हणजे शैक्षणिक क्षेत्र हे माझ्यासाठी नवीन नाही .माझे वडील पेशाने शिक्षक होते त्यामुळे या क्षेत्राविषयी सुरुवातीपासूनच चांगली ओळख झाली होती. त्याचबरोबर या क्षेत्राविषयीची आपुलकी आणि आवड मनामध्ये होतीच. मुंबई येथील युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिस्ट्री येथे फिजिकल केमिस्ट्री या विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर सुरुवातीचे चार ते पाच वर्षे फार्मासिटिकल कंपनीमध्ये रिसर्च ॲनालिस्ट या पदावर रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर मध्ये काम केले व त्यानंतर 2011 मध्ये बीएड ही शिक्षण शास्त्रातील पदवी मिळवली . पदवीपर्यंतचे शिक्षण हे कुटुंबाच्या आधाराने पूर्ण केले ,परंतु बीएड पदवी चे शिक्षण घेत असताना स्वतः काम करून त्यानंतर पुढील शिक्षण घेण्याचा निर्धार केला .

शिक्षकी पेशा मध्ये येण्यासाठी माझे वडील ही हे प्रेरणा होतीच ,परंतु त्याचबरोबर माझ्या शालेय जीवनामध्ये माझ्या मनावर माझ्या शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्काराचा प्रभाव मला तेवढाच महत्त्वाचा वाटतो .याच माझ्या शालेय जीवनातील शिक्षकांकडे पाहून मला शिक्षक होण्याची प्रेरणा सतत मिळत राहीली. म्हणूनच औषध निर्मिती क्षेत्रामध्ये सुरुवातीला काम करत असून सुद्धा मनामध्ये कुठेतरी ही प्रेरणा मला स्वस्त बसू देत नव्हती आणि त्यामुळेच सन 2011 मध्ये बीएड ही पदवी प्राप्त केल्यानंतर या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्धार पक्का झाला .एकूणच माझ्या बालपणापासून संपूर्ण शालेय जीवनामध्ये मला मिळालेले माझे शिक्षक हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरले. केवळ त्यांच्या मुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो ही कृतज्ञतेची भावना माझ्या मनामध्ये सतत राहील .

शिक्षण क्षेत्रातील पदवी प्राप्त केल्यानंतर सुरुवातीची दोन वर्षे ही सरकारी इतर क्षेत्रांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करण्यामध्ये व्यतीत केली आणि त्यानंतर पणदूर येथील दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विषयाचे लेक्चरर म्हणून सात वर्षे काम करण्याचा अनुभव मिळाला आणि खऱ्या अर्थाने या शैक्षणिक क्षेत्रामध्ये भक्कमपणे उभे राहण्यासाठी एक अतिशय उत्कृष्ट पायाभरणी झाली .त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्कूल मध्येही काम करण्याची संधी मिळाली .सध्या जिल्हा परिषद शाळा दाभोली नंबर दोन या वेंगुर्ले तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळेमध्ये पदवीधर शिक्षक या पदावर कार्यरत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मिळालेल्या अनेक शैक्षणिक अनुभवांचा सध्या मला खूप फायदा होत आहे.

शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना अध्ययन अध्यापनामध्ये अनेक विद्यार्थी, पालक ,अधिकारी ,सहकारी शिक्षक यांच्याशी दैनंदिन जीवनामध्ये कामाच्या निमित्ताने संबंध येतो . विविध प्रकारची माणसे अनुभवायला मिळतात .त्याचबरोबर त्या सर्वांचे विविध दृष्टिकोन ,मानसिकता यांचेही दर्शन घडते आणि त्यामुळेच विविधांगी अनुभवाने समृद्ध होण्यासाठी हे शैक्षणिक क्षेत्र एक वरदानच ठरते.
दैनंदिन अध्ययन अध्यापन कार्यामध्ये वेगवेगळ्या बौद्धिक पातळीची तसेच कौशल्य असलेली विद्यार्थी अनुभवायला मिळतात. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना विविध समस्या समोर येत असतात. एक शिक्षक म्हणून या सर्व समस्यांकडे सकारात्मकतेने पाहत त्यावर उपाययोजना करण्याचा नेहमीच मी प्रयत्न करत असतो .

काही वेळेला एकाच वर्गामध्ये अतिशय हुशार विद्यार्थी असतात त्याचबरोबर काही विद्यार्थी अध्ययनअक्षम सुद्धा असतात. परंतु या सर्वांना पुढे घेऊन जाण्याचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर असतेच आणि हे उद्दिष्ट साध्य करत असताना त्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुरूप विविध साधनांचा, शैक्षणिक अनुभूतींचा वापर करावा लागतो .जेणेकरून अध्ययन अध्यापन कार्यामध्ये विद्यार्थ्यांना गोडी निर्माण होईल आणि एकदाका ही गोडी निर्माण झाली की त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सोप्या बनतात. विद्यार्थी स्वतःहून अध्ययन करण्यास तयार होतो आणि नेमके इथेच शिक्षक म्हणून आपण यशस्वी ठरतो .काही विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये पुढे असतात अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाने तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना अध्यापन केले असता अध्ययनामध्ये हे विद्यार्थी चांगल्या प्रकारे पुढे जातात .त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे संपादणूक वृद्धी पाहायला मिळते.

पारंपारिक पद्धतीमध्ये विद्यार्थी बरेच वेळा कंटाळतात आणि त्यामुळे अध्ययनामध्ये त्यांच्याकडून दुर्लक्ष होते .अशावेळी विविध नवनवीन तंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनाकडे यशस्वीपणे वळवण्यास निश्चित यश मिळते. माहिती तंत्रज्ञानाचा आपल्या सभोवती विस्फोट झालेले आपण चित्र पाहतच आहोत त्यामुळे ही सर्व माहिती आपल्या हाताच्या बोटावर काही क्षणांमध्ये उपलब्ध होते .परंतु या उपलब्ध माहितीमध्ये उत्कृष्ट, दर्जेदार आणि समर्पक साहित्य, माहिती निवडणे हे एका शिक्षकाचे कौशल्य असते . दैनंदिन अध्यापनामध्ये मी स्वतः अनेकविध नवनवीन तंत्रांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करत असतो .युट्युब स्वनिर्मित व्हिडिओज ,ऑनलाइन टेस्ट आनंददायी गणित अध्ययनासाठी विविध ॲप्स ,शैक्षणिक पीडीएफ अशा अनेकविध माध्यमांचा वापर करून मी दैनंदिन अध्ययन अध्यापन कार्य अतिशय चांगल्या प्रकारे पार पडत असतो .

अध्ययनअक्षम विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मित्र नावाचे मोबाईल ॲपही मी निर्माण केले आणि माझ्या शाळेतील सहावी सातवीच्या वर्गातील अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक , सामाजिक व भावनिक विकासासाठी या ॲपचा अत्यंत चांगल्या प्रकारे मी उपयोग करत आहे .या सर्व तंत्रज्ञानाच्या माध्यमांचा आपल्याला खरोखरच अतिशय उत्तम उपयोग करता येऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या दैनंदिन अध्यापन कार्यामध्ये मदतच होते. बऱ्याच वेळेला आपण शिक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक प्रकारच्या नवनवीन प्रशिक्षणाचा लाभ घेऊन नवनवीन कौशल्य आपण प्राप्त करतो परंतु एक माणूस म्हणून आपल्या मर्यादा असतात आणि अशावेळी तंत्रज्ञान हे आपले मित्र ठरते .याचा सुयोग्य वापर केल्यास अध्यापन कार्यामध्ये अतिशय उत्कृष्ट, समर्पक असा उपयोग होतो .

एक शिक्षक म्हणून नेहमीच विद्यार्थ्यांसोबत ,विद्यार्थ्यांच्या पालकांशी आपला संबंध येत असतो. शिक्षक विद्यार्थी संबंध हे ज्याप्रमाणे चांगले हवेत ,त्याचप्रमाणे शिक्षक पालक संबंध हेही चांगले असणे अतिशय आवश्यक आहे .माझ्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनातील प्रगतीसंबंधी नेहमीच मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना समुपदेशन करत असतोच .शेवटी विद्यार्थ्यांची अध्ययनातील प्रगती साधायची असेल तर शिक्षक व पालक ही दोन्ही चाके योग्य प्रकारे चालणे आवश्यक आहे. तरच विद्यार्थी यशस्वीतेच्या ध्येयापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो .विद्यार्थ्यांच्या पालकांशी सौहार्दपूर्ण वर्तणूक करणे व आपल्या वागण्या बोलण्यातून त्यांना आपल्या शाळेकडे ,शैक्षणिक क्षेत्राकडे आकृष्ट करणे आणि शिक्षण क्षेत्र व समाज यांच्यामधील बंध अधिक मजबूत करणे याकडे माझा नेहमीच कल असतो .

अद्याप पर्यंत शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जिल्हास्तरीय विज्ञान मेळावे , जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन त्याचप्रमाणे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व विज्ञान मिळावे ,विविध विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धा यासाठी परीक्षक म्हणून काम करण्याची संधी अनेक वेळा मिळाली आणि त्यातूनच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे एक अमूल्य समाधान मला लाभले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक यशस्वी, मानाचे आणि अभिमानाचे क्षण मला अनुभवायला मिळाले. विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि नवीन ज्ञान मिळाल्याचा आनंद हेच माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण असतात जे विशेष प्रेरणादायी असतात .

विशेष उल्लेख करण्यासारखा एक क्षण म्हणजे 2021- 22 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या एस सी इ आरटी विभागामार्फत राबविलेल्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये मला माझ्या नवोपक्रमासाठी राज्यात पाचवा क्रमांक प्राप्त झाला आणि या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये एस सी इ आरटीचे संचालक माननीय श्री एमडी सिंग यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचा सन्मान मला प्राप्त झाला. हा क्षण म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या शैक्षणिक वाटचालीतील अतिशय अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण आहे आणि हा क्षण मला नेहमी उत्कृष्ट काम करण्यासाठी सदैव प्रेरित करत राहील हे मात्र नक्की.
शिक्षण क्षेत्रातील माझे सर्वच शिक्षक बंधु भगिनी अत्यंत अभिमानास्पद , वाखाणण्याजोगे आणि अमूल्य असे कार्य करत आहेत. सर्वांना आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

English Marathi