आज आपण श्री. राजेंद्र संतोष पाटील, यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. राजेंद्र सर हे औरंगाबाद येथे राहत असून त्यांना शिक्षण क्षेत्रात २६ वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते न्यू हायस्कूल बनकिन्होळा, तालुका सिल्लोड ,जिल्हा औरंगाबाद या शाळेत कार्यरत आहेत.
शिक्षक होण्याचं कारण –
1996 यावर्षी मी माझी पदवी पूर्ण केली ,त्या अगोदर पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयाची पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पदवी पूर्ण केल्यानंतर ,मला वडिलांच्या इच्छेखातर स्पर्धा परीक्षा देण्याचं मी ठरवलं त्यासाठी एक एक प्रयत्न करून पाहिला .परंतु मला काही माझ्या मित्रांच्या अनुभवावरून असं लक्षात आलं की दुसऱ्याला एखादा विषय ज्या वेळेला आपण समजावून सांगतो त्यावेळेला आपण शिकवता शिकवता चांगल्या पद्धतीने त्या विषयाबद्दलची जाण आपल्याला पण होत असते .हे लक्षात घेऊन मी नंतर बीएड केलेले असल्याकारणामुळे शिक्षक होण्याचं ठरवलं.
शिक्षण क्षेत्रातील प्रवास –
नंतर खाजगी अनुदानित शाळेमध्ये माझी शिक्षक म्हणून निवड झाली. सुरुवातीला शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे अध्यापन प्रक्रियेमध्ये थोडा समस्या निर्माण झाल्या. परंतु नंतर मला लक्षात आलं ,जर आपल्या संकल्पना व्यवस्थितपणे स्पष्ट असतील. तर आपण विद्यार्थ्यांना अध्यापन चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यामुळे दहावीपर्यंतचा विज्ञान विषयाचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा मी पुन्हा एकदा सखोल अभ्यास केला विषय चांगला. समजून घेतला आणि त्यानंतर मात्र मला अध्यापन प्रक्रियेमध्ये त्याची खूप चांगल्या पद्धतीने मदत झाली आणि मी निवडलेल्या व्यवसायात आनंद घेऊ लागलो .तो मला वर्गामध्येच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जाणवू लागला आणि नंतर माझा स्पर्धा परीक्षा मधला जो इंटरेस्ट होता तो आपोआपच कमी झाला.
विद्यार्थ्यांना प्रेरित करताना-
अध्यापन करताना शिक्षकांना तेव्हाच आनंद मिळतो जेव्हा त्यांच्या समोरील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत असतील, यामध्ये जर अध्यापन एक मार्गी झालं तर ते नीरस ठरतं किंवा निरर्थक ठरत म्हणून मी विद्यार्थ्यांचा ,अध्ययन -अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभाग वाढवण्यासाठी. नेहमी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मार्गांनी प्रेरित करत असतो. जसं विद्यार्थी आपल्या आपल्या आकलन क्षमतेनुसार विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत असतात. यामध्ये मला अपेक्षित असलेल्या उत्तरापेक्षा थोडं वेगळं जरी उत्तर असेल, पण विषयाला अनुसरून जर ते उत्तर असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या उत्तरांचा स्वीकार करतो ,यामुळे वर्गामधील प्रत्येक विद्यार्थी उत्तर देण्यासाठी धडपड करतो.
अध्यापन प्रक्रियेमध्ये नाविण्यता –
मी वर्ग आठवी ते दहावी या वर्गांना विज्ञान विषय शिकवतो. विज्ञान विषय हा असा विषय आहे की ज्यामध्ये फक्त तोंडी स्वरूपामधील व्याख्यान पद्धत आपण सरसकट वापरू शकत नाही. कारण त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना हे स्पष्ट होत नाही. विज्ञान विषय हा संकल्पनाधिष्टीत असल्या कारणामुळे संकल्पना स्पष्ट होण्यावर माझा भर असतो आणि त्या स्पष्ट होण्यासाठी मी वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट किंवा वर्किंग मॉडेल्सचा वापर करून अध्यापन करत असतो. उदाहरणार्थ इयत्ता दहावी मधील किंवा आठवी ते दहावीपर्यंत विद्युत चुंबक, प्रकाश, बल, दाब इत्यादी संकल्पना आहेत. त्या व्याख्यान पद्धतींनी स्पष्ट करताच येत नाही, त्यासाठी वर्ग दहावी मधील डीसी मोटर किंवा विद्युत जनित्र, प्रकाशाचं परावर्तन,अपवर्तन,अपस्करण यांचं वर्किंग मॉडेल तयार करून, मी अध्यापन करत असतो .त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होत असते, हे मला जाणवलं .त्याचप्रमाणे अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग नोंदवण्यासाठी, मी विद्यार्थ्यांना वर्गामध्ये वेगवेगळ्या कृती स्वतः करायला लावतो .त्याचा सुद्धा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो हे मला अनुभवातून जाणवलं. त्याचप्रमाणे शाळेत प्रोजेक्टर असल्याकारणामुळे, वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिओ व्हिज्युअल साहित्याचा सुद्धा मी गरजेप्रमाणे वापर करतो .कारण की विद्यार्थी हा ज्ञानग्रहण करत असताना स्पर्शाने ,डोळ्यांनी पाहून ,कानाने ऐकून आणि प्रत्यक्ष कृती करून शिकत असतो. म्हणून मी अध्यापन प्रक्रिया करताना जास्तीत जास्त अनुभव विद्यार्थी कसे घेतील यासाठी प्रयत्न करत असतो.
शिक्षण क्षेत्रातील माझी सर्वात मोठी achievement
शिक्षण विभागामधल्या एका महत्त्वपूर्ण उपक्रमाचा माझ्या शैक्षणिक प्रवासामध्ये खूप मोठा आणि उपयोगी असा अनुभव घेतला .तो म्हणजे व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेमार्फत 2014 -15 या शैक्षणिक वर्षांमध्ये माझी मुंबई येथील IVGS संस्थेत एक वर्षाच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी निवड झाली. आणि हा माझा शैक्षणिक जीवनातला एक प्रकारचा टर्निंग पॉईंट ठरला कारण त्या अगोदर माझं विद्यार्थ्यांशी वागणं आणि त्यांच्या समस्यांच निराकरण करणे अयोग्य पद्धतीचं होतं .परंतु प्रशिक्षण करून आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समस्या, मग त्या अध्ययना बाबतीत असतील किंवा सामाजिक बाबतीत असतील, याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. प्रत्येक समस्या सोडवताना समस्यांचे विश्लेषण करून समस्येच्या मुळाशी जाऊन, नंतर त्यावर उपाययोजना करावी हे मला या प्रशिक्षणातून शिकायला मिळाले .त्याचप्रमाणे दहावीनंतर काय करावे हे प्रत्येक विद्यार्थ्याचं याबाबतीत गोंधळ असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांची आवड त्याची, बुद्धिमत्ता, त्याची आर्थिक परिस्थिती व सामाजिक परिस्थिती, समायोजन स्थिती या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून ,नंतर विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणे यामध्ये मला खूप आनंद मिळू लागला आणि विद्यार्थ्यांशी माझं नातं घट्ट बांधलं गेलं हे मला जाणवलं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मला एक जाणवलं की , बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक हे उच्चशिक्षित असून सुद्धा ,आपल्या पाल्यांना करिअरच्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करता येत नाही हे मला दिसून आल. त्यामुळे पालकांमध्ये सुद्धा मला मानाचं आणि आदराचे स्थान प्राप्त होताना दिसून आल.