नमस्कार मी राजेश जगन्नाथ गोसावी (M.A.D.Ed, Diploma In School Management, Mass Communication And Drama) रत्नागिरी येथे राहतो. गेल्या 21 वर्षांपासून मी शिक्षक म्हणून कार्यरत असून सध्या सेंट्रल स्कूल झरेवाडी रत्नागिरी या शाळेत समाजशास्त्र आणि विज्ञान हे विषय शिकवतो.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
मुळात काही गोष्टी ठरवून होत नाहीत तर त्या नशिबात असाव्या लागतात असे वाटते मला. माझे वडील कीर्तनकार वारकरी,आई चौथी शिकलेली आणि बाबा जुनी मॅट्रिक,मोठी बहीण शिक्षिका. त्यामुळे मोठा मीच.बारावीला मी जिल्ह्यात पहिला आलो होतो त्यावेळी डी.एड ला प्रवेश मिळणं म्हणजे एक प्रकारची कसरत होती. डी.एड प्रवेश आणि नोकरी या दोन्ही ठिकाणी मेरिट मध्ये बसल्याने दोन्ही गोष्टी माझ्यासाठी सहजसाध्य झाल्या.कारण डोनेशन देऊन ऍडमिशन घेणं किंवा नोकरीला लागणं हे तस आर्थिक दृष्ट्या मला शक्य नव्हतं. बुरंबी हायस्कुलला जेमतेम सहा महिने झाले नसतील तोवर जिल्हा परिषदमार्फत भरती झाली. त्यातही माझा नंबर लागला आणि मग शिक्षकी पेक्षा खऱ्या अर्थान सुरु झाला.
सुरुवातीला शिक्षक हे क्षेत्र म्हणून निवडताना अडचणी आल्या का?
शिक्षक क्षेत्र निवडताना अडचणी आल्या नाहीत.अडचणी दिसत असल्या तरी त्यात त्या त्या वेळी तरलो.मुळात माझे निर्णय घ्यायला मला पूर्ण स्वातंत्र्य होतं.फक्त आईला यातली फारशी गती नव्हती.तर बाबा कायमस्वरूपी मुंबईत.त्यामुळे पालक म्हणून त्यांनी खूप मस्त सांभाळलं पण माझे निर्णय मलाच घ्यावे लागले.आज शिक्षक म्हणून जे नाव मिळालं त्याचं सगळं श्रेय आई बाबा आणि माझे गुरुजन यांचं आहे.
शिक्षक म्हणून 21 वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत घेतल्या जाणाऱ्या नवोपक्रम स्पर्धेत तीन वेळा जिल्ह्यात पहिला तर राज्यात एकदा पाचवा एकदा चौथा आलो.तर एकदा राज्यात पहिला आलो.हा एकूणच अनुभव अविस्मरणीय होता..यानंतर मला शिक्षण क्षेत्रात खूप उपक्रम राबविता आले.अनेक पारितोषिक आणि पुरस्कार यांचा मानकरी होण्याची संधी मला मिळाली.
दुसरा अनुभव इथं लिहावसा वाटतो तो म्हणजे मी पहिल्यांदा माझ्या शाळेचा संघ डॉ काशिनाथ घाणेकर आंतरशालेय एकांकिका स्पर्धेसाठी उतरावला होता.यामध्ये 72 संघ सहभागी झाले होते.एकांकिका लेखन दिग्दर्शन मीच केले होते.प्राथमिक फेरीत आम्ही अव्वल ठरलो.तर अंतिम फेरीत विशेष उल्लेेखनीय एकांकिका पारितोषिक मिळालं.आणि समीर घाग या मुलाला अभिनायचं द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.सावरकर नाट्यगृह रत्नागिरी इथं हजारो प्रेक्षक समोर सिने अभिनेते भरत जाधव ,रमेश भाटकर ,राजन पाटील यांचे हस्ते पारितोषिक स्वीकारताना मन अभिमान आणि आनंदाने फुलून गेले होते .सांस्कृतिक क्षेत्रातील कारकीर्दीला इथूनच कलाटणी मिळाली.शिक्षण क्षेत्राबरोबर कला क्षेत्रात आज जे काही नाव आहे ते यामुळेच. यानंतर मी जीवन शिक्षण किशोर मासिक दिवाळी अंक,वर्तमानपत्र यातून, त्याचबरोबर अनेक शैक्षणिक त्याचबरोबर प्रयोगशील एकपात्री,एकांकिका,बालनाट्य,पथनाट्य,नाटक,कविता लेख या प्रकारात लेखन केलं बऱ्यापैकी पारितोषिके पटकावली .लघुपट,चित्रपट,मालिका,वे ब सिरीज यामधून अभिनय करण्याची संधी मिळाली. इथेही बऱ्यापैकी नाव आणि पारितोषिके मिळाली.
सध्या संस्कृती फाउंडेशन लांजा या संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक समाजिक संस्कृतिक उपक्रम राबवीत आहे
तुमची आतापर्यंतची मोठी Achievement कोणती?
नवोपक्रम स्पर्धेत राज्यात पहिला नंबर येणे ही माझ्या दृष्टीने खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट होती.तसेच बॅरिस्टर नाथ पै राज्यस्तसरीय एकांकिका स्पर्धेत मी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेली ‘संस्कार’ ही एकांकिका स्पर्धेत कणकवली सिंधुदुर्ग इथे सादर झाली.या स्पर्धेत सिद्धी संतोष गोताड या आमच्या मुलीला अभिनायचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालं. ही स्पर्धा अत्यंत दर्जेदार असते.म्हणूनच इथं मिळालेल्या पारितोषिकाला तितकेच महत्व आहे.
समाजात शिक्षक- विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे?
मुळात काळ बदलला शिक्षण पद्धती बदलत गेली. अगदी शिक्षक विद्यार्थी पालक यांच्यातही तसे बदल होत गेले. आता शिक्षण एका मोबाईल मध्ये समावलं गेलं आहे .गुणवत्तेपेक्षा भपका आकर्षण ठरू लागला.मला वाटतं जर आपल्या मुलाला खऱ्या अर्थान घडवायचे असेल तर त्याला मातीतलं शिक्षण देण्याची गरज आहे. आपल्याला त्यांना पुस्तकी किडा बनवता येईल पण व्यावहारिक जगाशी दोन हात करण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी शिक्षणातून करता यायला हवी. त्याला शोभेची बाहुली बनवून आपण मुलांना अपंग करता कामा नये.ते घातक आहे. सुख दुख संकट व्यवहार नीतिमत्ता या सगळ्यांची सांगड घालून त्याची अभ्यासातली गुणवत्ता सिद्ध करता आली पाहिजे.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांनी जरूर शिक्षक व्हा.कारण आपण जिवंत गोळ्याला आकार देत असतो आणि हे अत्यंत पवित्र आणि मनाला प्रचंड सुख देणारे काम आहे. फक्त त्यात आपण जीव ओतून काम करायला हवं. केवळ अर्थार्जन करण्यासाठी शिक्षक झालो तर आपल्यातला खरा शिक्षक कितीही शोधला तरी कधीच सापडणार नाही. आणि तुम्ही मुलांसाठी झटलात तर विदयार्थी तुम्हांला तुम्ही जिथं असाल तर त्याठिकाणी शोधत येतील. मला वाटतं यापेक्षा मोठी संपत्ती, मोठी कमाई कोणतीच नाही.