नमस्कार मी श्री.राजेश विश्वास इंगळे (M.Sc; M.ED, D.S.M., TAX LAW, E- TAX, Human Rights (App.) मंडणगड-रत्नागिरी येथे राहत असून गेले 7 वर्षापासून मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि सध्या मी लाटवण पंचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर लाटवण, ता. – मंडणगड , जिल्हा – रत्नागिरी या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत आहे.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
खर तर मला मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचं होत.परंतु काही कौटुंबिक अडचणीमुळे प्रवेश घेता आला नाही. वर्ष फुकट जाऊ नये म्हणून मग B.Sc. ला ऍडमिशन घेतलं. मग B.Sc. Last year ला असताना नेमके परीक्षेच्या वेळी आजारी पडलो आणि मला परीक्षा देता आली नाही. तेव्हा समोर प्रश्न उभा राहिला की आत्ता काय करायच. वर्ष फुकट गेलं याच शल्य मनाला लागत होत.अक्षरशः मरणाच्या दारातून परत आलो होतो. डॉक्टरांनी ६ महिने आराम करायला सांगितलाहोता पण शांत बसणं हे मूळ स्वभावात नसल्याने ते जमत नव्हतं. तेव्हा मनाशी ठरवलं की लवकर बरं होऊन पुन्हा उभ रहायचं आणि काहीतरी करायच.अशातच मला एक मार्ग दिसला तो म्हणजे स्वतःचे क्लासेस सुरु करण्याचा.केवळ इच्छाशक्तीच्या बळावर मी एका महिन्यातच आजरातून उभा राहिलो आणि इ. ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे क्लास घेण्यास सुरुवात केली आणि कमी वेळातच क्लासला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.तेव्हा मला जाणीव झाली की आपण उत्तम प्रकारे शिकवू शकतो. तेव्हाच मला योजक कला क्रीडा व आरोग्य सेवा मंडळ संचलित इंग्रजी माध्यम, मांडणगड या शाळेत शिक्षक म्हणून कार्य करण्याची संधी चालून आली. मी इंटरव्यू दिला आणि सिलेक्ट ही झालो.शाळा आणि तिथून क्लास असा दुहेरी प्रवास सुरू झाला. मग मी B.Ed. करण्याचा निर्णय घेतला.B.Ed झाल्या नंतर त्याच शाळेने मला पुन्हा रुजू करून घेतलं.खऱ्या अर्थाने माझा *शिक्षक हा प्रवास* २००९ पासून सुरू झाला.
सुरुवातीला शिक्षक हे क्षेत्र म्हणून निवडताना अडचणी आल्या का?
हो आल्या, कारण मुळात मनात शिक्षक व्हायचं नाही असा विचार होता.त्यामुळे तो प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता.मी या क्षेत्रात जाणीव पूर्वक ढकलला गेलो.खूप अभ्यास करायला लागायचा परंतु नंतर सवय झाली काटेकोरपणा अंगात आला आणि वेळेचे महत्व समजायला लागलं त्यातूनच व्यक्तिमत्व बदलायला लागले.
शिक्षक म्हणून 7 वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे
इंग्रजी माध्यमच्या शाळेत काम करत असताना ‘विज्ञान प्रदर्शनात सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाचे* पारितोषिक पटकावले .त्यासाठी दिवस रात्र प्रचंड मेहनत घेतली होती. त्यामुळे ते यश मी कधीही विसरु शकणार नाही.
तुमची आतापर्यंतची मोठी Achievement कोणती?
आत्ता पर्यंत ३ आंतरराष्ट्रीय, ५ राष्ट्रीय, ७ राज्यस्तरीय, आणि ३ जिल्हास्तरीय पुरस्कार पमिळवलेले आहेत.
समाजात शिक्षक- विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे?
शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्व कला अवगत करायला हवेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेने शिकवावे.विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा.विद्यार्थी अजूनही केवळ परीक्षार्थी आहेत त्यांनी ज्ञानार्थी व्हावे.नविन ज्ञान ग्रहण करून नाविन्याचा ध्यास मनाशी बाळगावा. स्वतःला ज्यात रस आहे त्यामध्ये पारंगत व्हावे. तसेच पालक आणि आपल्या देशाचा गौरव होईल यासाठी सदैव झटावे.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
सध्याची पिढी भरकटत चालली आहे . त्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची त्यामुळे शिक्षकांनी ,पालक, मित्र, भाऊ अशा सर्व भूमिका पार पाडाव्या जेणेकरून तरुणाईला शिक्षक हे आपलेसे वाटतील आणि ते भविष्याकडे मार्गक्रमण करतील.शिक्षकी पेशाला समाजात अनन्य साधारण महत्व आहे. विद्यार्थ्यांचे मन जाणणारा आणि त्यांचे मन जपणारा शिक्षक होणे ही *काळाची गरज* आहे आणि असे झाले तरच शिक्षण क्षेत्रात क्रांती होईल.