S R Dalvi (I) Foundation

Tr. Rajesh Kalsulkar

Tr. Rajesh Kalsulkar

आज आपण श्री.राजेश कानु कळसुलकर यांचा शैक्षणिक प्रवास जाणून घेणार आहोत. राजेश सरांचे शिक्षण एचएससी डीएड झालेले असून ते वैभववाडी तालुक्यातील शाळा श्री रामेश्वर विद्यामंदिर एडगाव नंबर 1 या ठिकाणी दिनांक 09 जुलै 2011 पासून आज पर्यंत, गेली अकरा वर्ष कार्यरत आहेत.
इयत्ता दहावीला 78.93 टक्के गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले. त्यामुळे वडीलधाऱ्या माणसांच्या सांगण्यावरून त्यांनी अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला व 68.83% गुण मिळवून उत्तीर्ण झाले. इंजिनीयर होण्याच्या दृष्टीने त्यांनी इयत्ता बारावीला फिजिक्स ,केमिस्ट्री व मॅथ्स हे स्पेशल विषय घेतले होते. परंतु घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना त्यांचे ध्येय पूर्ण करता आले नाही. बालपणापासून त्यांच्यावर त्यांच्या शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार केले त्यामुळे शिक्षकांबद्दल त्यांना अपार आदर होता. त्यावेळी डीएड झाल्यावर लगेच प्राथमिक शिक्षकाची नोकरी लागत असे. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना डीएड करण्यास सांगितले. त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी डीएडला ऍडमिशन घेतले व प्राथमिक शिक्षक होण्याचे ठरवले.

2007 ला डीएड पूर्ण झाल्यानंतर ते चार वर्षे बेरोजगार राहिले. या कालावधीत त्यांनी लोकमत वृत्तपत्रामध्ये काही महिने काम केले. त्याचप्रमाणे कणकवली येथे चैतन्य क्लास या आदरणीय अच्युत देसाई सरांच्या क्लासमध्ये शिकवणी घेण्याचे काम केले. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केले. हे करत असतानाच त्यांनी शिक्षक भरतीसाठी सीईटी परीक्षेची तयारी केली. 2010 मध्ये शिक्षक भरतीसाठी झालेल्या सीईटी परीक्षेमध्ये 200 पैकी 144 गुण मिळवून चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये नंबर मिळवला. त्यांची शिक्षक म्हणून निवड झाली व त्यांना सध्याची श्री रामेश्वर विद्या मंदिर एडगाव नंबर 1 ही शाळा मिळाली.

शाळा श्री रामेश्वर विद्यामंदिर एडगाव नंबर १ येथे काम करत असताना त्यांना खूप उत्साह वाटला. अनेक पालकांचे चांगले सहकार्य लाभले. अनेक विद्यार्थ्यांना नेहमीच्या अभ्यासाप्रमाणेच स्पर्धा परीक्षांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या हाताखालून गेलेले बरेच विद्यार्थी इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी पास झाले. यावर्षी कुमारी तन्वी जितेंद्र कदम हिने दहावीच्या परीक्षेमध्ये 89 टक्के गुण मिळविले. तिचे वडील जेव्हा शाळेमध्ये पेढा घेऊन आले त्या वेळेचा तो क्षण अतिशय आनंदाने भारलेला होता. ते मला म्हणाले ,”सर तुम्ही तन्वीचा अभ्यासातील पाया भक्कम केला म्हणून आज तन्वी चांगले मार्क्स पाडू शकली.”त्यांचे हे बोल ऐकून सरांचे मन भारावून गेले. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे.

सध्याची पिढी ही अतिशय बुद्धिमान आहे. या पिढीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व त्यांच्या कलागुणानुसार शिक्षणाची संधी अभ्यासक्रमात उपलब्ध करून दिली जावी. यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. अगदी खेडेगावातील मुलांना देखील आपल्या आवडीनिवडीनुसार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. असे मत त्यांनी मांडले.

ज्यांना शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे त्यांनी तंत्रज्ञानातील कौशल्य आत्मसात करून विकसित करणे गरजेचे आहे. कारण डिजिटल शिक्षण पद्धतीचा उदय होत आहे आणि या डिजिटल शिक्षण पद्धतीमध्ये आपला निभाव लागण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक निर्माण होणे अतिशय गरजेचे आहे. विविध प्रकारची कलागुण कौशल्य आत्मसात केलेल्या शिक्षकांना शिक्षण क्षेत्रामध्ये सुवर्णसंधी उपलब्ध आहे.कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सकारात्मक दृष्ट्या विचार करणाऱ्या कृतिशील शिक्षकांची आज प्रामुख्याने गरज आहे. असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.

English Marathi