रवींद्र सर प्रशिक्षक म्हणून मुंबई पब्लिक स्कूल आर्यनगर उच्च प्राथमिक मराठी शाळा येथे कार्यरत आहेत . त्यांची शैक्षणिक अर्हता- बी.ए.डी.एड. आहे. सध्या ते वसई तालुक्यातील विरार येथे राहत असून आजपर्यंत मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात त्यांची 28 वर्षाची अविरत सेवा झालेली आहे.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला असून गावातील वातावरण शैक्षणिक चळवळीने ते भारावलेले होते,त्यामुळे आपोआपच शिक्षणाची आवड निर्माण झाली. गावात प्रत्येक घरात शिक्षक त्यामुळे शिक्षक हीच सेवाभावी व राष्ट्र घडविणारी नोकरी मन :पूर्वक स्वीकारून ते शिक्षक झाले.
त्यांच्या 28 वर्षाच्या नोकरीच्या कालावधीत 30 टक्के विद्यार्थी हे आव्हानात्मक होते . त्यांना शिकविणे अत्यंत कठीणजात असे. करोना महामारीमुळे आव्हानात्मक विद्यार्थ्यांचा संख्येचा रेशो 40 ते 50% च्या आसपास आला, हे प्रकर्षाने जाणवले, अशा मुलांना अत्यंत प्रेमाने तणावरहित व आनंददायी वातावरणात कृतीयुक्त उपक्रम राबवून त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना हाताळणे त्यांना प्रेरित करणे आणि कार्यप्रवृत्त करणे हे अत्यंत जिक्रीचे कार्य आहे असे त्यांना वाटते.
शिक्षक विद्यार्थी व पालक यांचा जेव्हा त्रिवेणी संगम होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने अध्ययन-अध्यापन आंतरक्रिया जास्त परिणामकारक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकाच्या संपर्कात राहणे, व्हाट्सअप द्वारे, फोन द्वारे त्यांना संपर्क करणे त्यांच्याशी सुसंवाद साधने त्यांना फार आवश्यक वाटते.
वर्गात अध्यापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे डिजिटल टीव्ही. ओव्हर हेड प्रोजेक्टर,मोबाईल आणि इतर शैक्षणिक साधनांचा वापर करून कौशल्यपूर्ण अध्यापन ते शाळेत करतात.
त्यांच्या अचिव्हमेंट बद्दल म्हटलं, तर डॉ. राजेंद्र बर्वे मानसोपचार तज्ञ मुंबई, यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशनचे धडे घेतल्यामुळे मुलांच्या समस्या व उपाय यांची त्यांना जाण झाली. त्यामुळे समस्या प्रधान विद्यार्थ्यांना हाताळताना अत्यंत सोपे जात आहे. पालकांचेही समुपदेशन करण्याची संधी मिळाल्यामुळे पालकांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सार्वत्रिक प्रगतीत भर पडली आहे. विद्यार्थी उपस्थिती, शैक्षणिक स्तर यात वाढ झाली असून पूर्णभानाने शिक्षण प्रवाहात विद्यार्थी सहभागी होत असताना आढळून येत आहे. यात मोठे समाधान त्यांना प्राप्त होत आहे.
एक अविस्मरणीय अनुभवाबाबत बोलायचं तर अनंत अविस्मरणीय क्षण त्यांच्या जीवनात नोंद झाल्याची खात्री होते. जेव्हा एखाद्या विषयाचा घटक समजल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व समाधान हेच माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. हे मी खात्रीपूर्वक नोंदवू इच्छित आहे.