S R Dalvi (I) Foundation

Tr. Reena Ghag

Tr. Reena Ghag

नमस्कार मी. श्रीमती रीना राजेश घाग (B.Sc.,B.Ed.,T.E.T.) चिपळूण येथे राहते. मी गेले  20 वर्ष  शिक्षक म्हणून  कार्यरत असून सध्या प्रेरणा इंस्टिट्यूट मध्ये शिकवत आहे.

शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले? 

2001 साली माझ्या घराजवळील गरीब आणि 12 वी नापास विद्यार्थ्यांंनी  पास व्हावे म्हणुन त्यांच्याकडून मी कसून अभ्यास करून घेतला आणि त्यानंतर ते विद्यार्थी परीक्षेत पास ही झाले. हे माझ्यासाठी मोठे यश होते. तेव्हा मला वाटले आपली खरी गरज गरजू विद्यार्थ्यांना आहे त्याच वेळी मी शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला आणि  २० वर्ष या क्षेत्रात कार्य करत आहे.
सुरुवातीला ‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का? 
बर्‍याच अडचणी आल्या. ‘चांगल्या संधी सोडून शिकविण्याचे काम का करतेस?’ असे उपदेशच मला जास्त मिळायचे. माझ्या निर्णयावर पाठींबा फार कमी जणांनी दिला. या क्षेत्रात स्वतः ला सिद्ध करण्यासाठी खूप कमी संधी मिळतात असे मला वाटते .

शिक्षक म्हणून 20 वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे 

बरेच अनुभव आहेत त्यातील एक शेअर करते,
साल 2014 ची गोष्ट आहे. शाळेत 9 वी मध्ये एक नवीन मुलगा आला होता. तो नेहमी मला स्वतः मध्येच एकलकोंडा वाटायचा .काही दिवसानंतर मला कळल की,  त्याच्या आईचे निधन झाले होते, म्हणुन त्याला ईकडे पाठवले आहे. मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी त्याला त्या परिस्थितुन बाहेर पडायला मानसिक मदत केली, त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याला मधल्या सुट्टीत डब्बा ही आम्ही द्यायचो,अर्थात  हे सगळे मनात काही न ठेवता केले होते.
एकदा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने माझ्यासाठी एक भेटकार्ड आणले. आणि त्यावर लिहिले होते, ‘माझ्या आईस वाढदिवसाच्या शुभेच्छा’ ते पाहून माझे डोळे भरून आले. शिक्षिका होणे कदाचित सोपे असेल, पण शिक्षिका असताना विद्यार्थ्यांच्या मनात आई ची जागा मिळणे हे भाग्य फार कमी जाण्याच्या वाट्याला येत. आजही ते क्षण मनाच्या कोपर्‍यात जसेच्या तसे आहेत.

तुमची आतापर्यंतची मोठी Achievement कोणती? 

IIT Bombay आणि RMSA ( राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान) यांच्या तर्फे 12500 गणित शिक्षकां मधून तज्ञ प्रशिक्षक ट्रेनिंग साठी माझी निवड झाली आणि 2 वर्षांच्या अथक प्रशिक्षणानंतर 175 तज्ञ प्रशिक्षका मध्ये निवड होऊन रत्नागिरी जिल्ह्य़ासाठी 300 गणित शिक्षकांना प्रशिक्षित करण्याची संधी मिळाली मला

समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज आहे अस वाटते?

– शिक्षक आणि शिक्षण दोघांबद्दल आदर असावा.
– अतिशय कसोटी वर पारखून शिक्षकांची निवड व्हावी.
– बदलत्या वैश्विक काळानुसार शिक्षकाला ट्रेनिंग मिळावे.
– शिक्षकी पेशाला चांगले मानधन मिळावे.
– विद्यार्थी परीक्षार्थी न बनवता. अभ्यासू बनावा.

ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?

आज जगाला चांगल्या शिक्षकांची खूप गरज आहे, हे काम फार जबाबदारीचे आहे. आपण लहान मुलांच्या मनावर कायमचे संस्कार करत असतो त्यामुळे विद्यार्थी घडला पाहिजे हा दृढनिश्चय मनाशी केला पाहिजे. हे व्रत पूर्ण आयुष्य झोकून पूर्ण केले पाहिजे. रोज नवीन शिकले पाहिजे. हे करण्याचे धाडस असेल तरच शिक्षक व्हा .
या क्षेत्रात कदाचित पैसा कमी मिळेल पण मान सन्मान खूप मिळेल. ज्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला चांगले वळण लावले असेल ते तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाहीत.
English Marathi