आज आपण शिक्षक श्री. रुपेश युवराज पाटील (B.Sc., B. Ed., M.A., M.Ed., D.S.M., Diploma in Journalism., Ph.D. (App) यांच्या आयुष्यातील प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्री रुपेश गेल्या 12 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून 16 वर्षांपासून ते पत्रकारिता या क्षेत्रात ही कार्य करत आहेत. सध्या ते विद्या विकास अध्यापक विद्यालय आजगाव,ता. सावंतवाडी,जि. सिंधुदुर्ग येथे शिक्षक असून त्यांनी दैनिक सकाळ धुळे आवृत्तीचे धुळे शहर प्रतिनिधी म्हणून आणि दैनिक लोकमत धुळे शहर प्रतिनिधी म्हणूनही कार्य केले आहे. तसेच त्यांनी गेली पंधरा वर्षे ‘स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून विविध विषयांची तयारी करून घेण्यासाठी लागणारी मानसिकता’ या विषयावर विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले आहे.श्री. रुपेश यांनी आतापर्यंत शिव – फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचारांवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सातत्याने व्याख्याने दिली आहेत. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट ) तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे आणि यशदा, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सातत्याने मार्गदर्शन केले आहे. सध्या ते कोकणसाद लाईव्ह या कोकणच्या महाचॅनेलचे गेस्ट अँकर म्हणून कार्यरत तसेच दैनिक कोकणसाद या वृत्तपत्रातून सातत्याने स्तंभलेखन आणि वृत्तांकन करीत आहे.
श्री. रुपेश यांना लहानपणापासूनच शिक्षण घेण्याची मनापासून आवड होती. शिक्षकांच्या प्रती त्यांची प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा असल्यामुळे विज्ञान विषयातून पदवी घेतल्यावर त्यांनी बी.एड. केले. त्यानंतर एक वर्ष एम.एस्सी. केल्यावर एम.एड. ही शिक्षण शास्त्रातील पदवी संपादन केली. मग धुळे शहरातील ताराबाई सोमानी अध्यापिका विद्यालय या विद्यालयात 2009 साली अधिव्याख्याता या पदावर गणित-विज्ञान व शैक्षणिक मूल्यमापन या विषयासाठी निवड झाली. सुमारे 2015 पर्यंत त्यांनी सदर महिला महाविद्यालयात प्रामाणिक कार्य केले. मार्च 2015 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील नावाजलेल्या अशा आजगाव येथील विद्या विकास अध्यापक विद्यालयात अधिव्याख्याता पदासाठी गणित-विज्ञान व मूल्यमापन या विषयासाठी त्यांची निवड झाली. तेव्हापासून आजपर्यंत गेली सात वर्ष आजगाव अध्यापक विद्यालयात अधिव्याख्याता पदावर ते कार्यरत आहे. त्यांना सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांची आवड असल्यामुळे अनेक कार्यक्रमात ते सहभाग घेत असतात. केवळ शिक्षक एके शिक्षक म्हणून जीवन न जगता शिक्षक म्हणून कार्यरत असताना शैक्षणिक सामाजिक व इतर क्षेत्रातही स्वतःचे काहीतरी वेगळे उपक्रम राबविण्याचा मानस असल्यामुळे सातत्याने विविध क्षेत्रात ते त्यांचे कार्य करीत आहेत. बालवयापासूनच लेखन व भाषण हे त्यांचे आवडीचे विषय असल्यामुळे सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान ते देत आहेत.
सांस्कृतिक व साहित्यिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी तसेच ग्रंथ चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आणि पुढील पिढीस मार्गदर्शन करण्यासाठी अविरतपणे प्रामाणिकपणे ते कार्य करीत आहे. त्यांचा लहान भाऊ सुद्धा धुळे येथे कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहे तसेच त्यांच्या घरात काका प्राचार्य व काकू मुख्याध्यापिका आहेत,त्यांची आत्या ही केंद्र प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाली आहे. एकंदरीत कौटुंबिक पार्श्वभूमी शिक्षकी पेशाची असल्यामुळे ते स्वतःदेखील विज्ञान विषयात शिक्षक होण्याचा मानस ठेवून आज शिक्षक म्हणून कार्य करीत आहे आणि याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.
‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना काही अडचणी:
घरातील वातावरण शिक्षक होण्यासाठी प्रेरणादायी असल्यामुळे श्री. रुपेश यांना ही शिक्षक होण्याची आवड होती. त्यांचे गुरुवर्य आणि जवळचे सर्व आप्तेष्ट हे रुपेश यांना शिक्षक होण्यासाठी प्रेरित करत होते. किंबहुना त्यांना ही शिक्षकच बनण्याची आवड असल्यामुळे त्यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले.
अविस्मरणीय प्रसंग/ क्षण:
धुळे येथील विनाअनुदानित अध्यापिका विद्यालयात कार्यरत असताना 2014 साली महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कार श्री रुपेश यांना जाहीर झाला, व माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे असा त्यांना ईमेल आला, तो क्षणत्यांच्यासाठी जीवनात अविस्मरणीय आहे. कारण त्यांच्या आईला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत बसून जेवण घेण्याचा आनंद अनुभवता आला. आणि एक पुत्र म्हणून त्यांनी त्यांच्या आईला मुख्यमंत्र्यांच्या पंगतीत जेवताना बघितले. तो क्षण त्यांच्यासाठी केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर जन्मोजन्मी एक व्यक्ती म्हणून निश्चीतच अविस्मरणीय राहील असे ते म्हणाले.
अचीवमेंट्स:
* महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कार 2014 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोख रुपये 51000/ शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व मानचिन्ह असे मिळाले.
* महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कार २०१३-१४. (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या हस्ते रोख ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान.)
* डॉ.मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार -२०१४ (पत्रकारिता क्षेत्रासाठी) – पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कांतीलाल उमाप यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान.
* खान्देश युवा रत्न पुरस्कार – २०१५- पुणे येथे महाराष्ट्राचे विशेष सरकारी वकील ऍड.उज्वलजी निकम व सुप्रसिद्ध अभिनेता पंढरीनाथ ऊर्फ पॅडी कांबळे यांच्या हस्ते प्रदान.
* डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॕशनल युथ फेलोशिप अॕवार्ड २०१५-१६. केंद्रीय मंत्री रामविलासजी पासवान यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान.
* इंडीयाज् युथ आयकॉन २०१८ अॕवार्ड.
* राज्यस्तरीय शिक्षक सरस्वती सन्मान पुरस्कार -१६-१७. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध किर्तनकार तथा प्रवचनकार, कवी ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या शुभहस्ते मुंबई येथे प्रदान.
* सोशल मिडीया मुख्यमंत्री महा-मित्र-२०१८ पुरस्कार .मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच अभिनेता मकरंद अनासपुरे, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, स्पृहा जोशी यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान.
* छत्रपती शिवराय महाराष्ट्र लोकनायक शिव सन्मान २०१९- महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते कोल्हापूर येथे प्रदान.
* प्राईड ऑफ हिंदुस्थान नॕशनल अॕवार्ड -२०१९-सुप्रसिद्ध दिग्दर्शक,निर्माते व अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते ठाणे येथे प्रधान.
* इंडियन टॕलेंट गोल्डन आयकाॕन अॕवार्ड -२०१९-वास्को-गोवा येथे महाराष्ट्राचे थोर समाजसेवक डॉ. प्रकाशजी आमटे व डॉ.मंदाकिनीताई आमटे यांच्या शुभहस्ते प्रदान.
* धुळे जिल्हा कलाध्यापक वेल्फेअर सोसायटी धुळे यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय जाणता राजा शिक्षक रत्न पुरस्कार – २०२० धुळे येथे प्रदान.
* महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार-२०२० (कोकण विभाग) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत, नेते श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे प्रदान.
* सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा लोकराजा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार २०२१-२२ (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत समाजसेवक तथा उद्योजक भाई उर्फ रघुवीर मंत्री यांच्या हस्ते ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे प्रदान.)
* ‘डॉ.अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्कार २०२१’ – महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी(IPS), यशदा, पुण्याचे उपमहासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी (IAS) यांच्या हस्ते पुणे प्रदान.
* भारत प्रतिमा गौरव राष्ट्रीय पुरस्कार-२०२१- मराठी चित्रपट व मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या हस्ते कोल्हापूर येथे प्रदान.
* इंडिया प्राईम नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड-२०२२ गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते पणजी येथे प्रदान.
* निर्भीड पत्रकार पुरस्कार-२०२२-परफेक्ट अकॅडेमी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. राजीव बिले यांच्या हस्ते कुडाळ येथे प्रदान.
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज:
शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. आजची ज्ञान हे उद्या अज्ञान ठरू शकते. म्हणूनच प्रत्येक वेळी शैक्षणिक प्रवाह हे सातत्याने बदलत असतात. येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकवून ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने शिक्षण द्यायला हवे त्याची गरज लक्षात घेऊन शिक्षक आणि पालकांनी स्वतःच्या मानसिकतेत आणि वागण्याच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. आधुनिक काळाची गरज लक्षात घेत त्या पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. पारंपरिकता ही निश्चितच जोपासली पाहिजे, मात्र ती जोपासत असताना तंत्रज्ञानाचीही कास धरणे क्रमप्राप्त आहे. शैक्षणिक पद्धती, तंत्रे, कौशल्य आणि मूल्यमापन प्रक्रिया या सर्व बाबी काळानुरूप बदलत असतात. त्याचे अवलोकन करून त्या स्वीकारणे ही काळाची गरज आहे. असे मत शिक्षक रुपेश यांनी व्यक्त केले आहे.
शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना सल्ला:
जर खरोखर शिक्षक म्हणून कार्य करावयाचे असेल तर निश्चितच जगाच्या पातळीवर सर्वात पवित्र असलेल्या या क्षेत्रात आपले स्वागतच आहे. येणारा प्रत्येक काळ हा आपल्यासाठी एक संधी तर आहे. पण एक आव्हान म्हणून आपण त्याला पाहायचे आहे. शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्या संधीचे सोने करणे आपल्या हातात आहे. ही पवित्र क्षेत्रातील गोष्ट प्रत्येकाने आत्मसात केल्यास निश्चितच शैक्षणिक क्षेत्राला एक वेगळा आयाम मिळेल. कारण जगाच्या पाठीवर कोणतीही व्यक्ती यशस्वी झाली तरी त्याचे श्रेय तो त्याच्या शिक्षकाला देतो, ही एक शिक्षक म्हणून प्रत्येक शिक्षकाला अभिमानाची गोष्ट आहे. असा मोलाचा सल्ला शिक्षक रुपेश यांनी दिला तसेच शिक्षक होऊ पाहणाऱ्या प्रत्येक बंधू-भगिनींना त्यांनी शुभेच्छा ही दिल्या आहेत.