S R Dalvi (I) Foundation

Tr. Sachin Darekar

Tr. Sachin Darekar

”स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक”

आज आपण शिक्षक श्री. सचिन परशुराम दरेकर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. सचिनजी रायगड जिल्ह्यातील अतिशय दुर्गम व डोंगराळ अशा पोलादपूर तालुक्यात 19 वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत असून सध्या ते प्रतापगडाच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या गोळेगणी या ग्रामीण भागातील शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत.
सचिनजी यांचे वडील सैनिकी सेवेत होते, सहाजिकच तेव्हा त्यांना लहानपणापासून भारतीय सेनेत जाण्याची खूप आवड होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी लहानपासूनच सैनिक होण्याची स्वप्न पाहिली होती. त्यांच्या मनात सैनिकांविषयी खूप आकर्षण होते. मात्र त्यांच्या घरात ते एकुलते एक होते वडील 24 वर्ष देशसेवेकरिता घराबाहेर असत त्यामुळे वडिलांपेक्षा आईचा सहवास त्यांना जास्त लाभला आणि त्यांच्या आईची इच्छा होती की, त्यांच्या मुलाने कायम त्यांच्या सोबत राहावे. त्यांच्या शिक्षणासाठी अतिशय दुर्गम अशा खेडेगावात त्यांची आई  राहत असे  त्यामुळेच त्यांच्या आईचे सचिनजी यांच्या अभ्यासावर खूप लक्ष असे, नियमितपणे त्या शाळेत जाऊन त्यांच्या अभ्यासाविषयी चौकशी करत असे. गावच्या हायस्कूलचे शिक्षकांच्या सहवासात त्यांचे शिक्षण सुरू असल्याने हळू “शिक्षक” या पेशाविषयी त्यांना आवड निर्माण झाली आणि आदर वाटू लागला.. सैनिक म्हणून वडील देशसेवा करत आहे तेव्हा आपण शिक्षक बनून पवित्र अशी देशसेवा करु हे ध्येय मनात ठेवून त्यांनी  बारावीनंतर डि.एड् केले आणि  त्यानंतर शिक्षक म्हणून नोकरीला लागले. आज जेव्हा सचिनजी  हाताखालून गेलेले विद्यार्थी मोठ्या हुद्द्यावर पोहचले असून समोर दिसताच नतमस्तक होतात.. हे पाहून शिक्षक झालो यांचा सार्थ अभिमान वाटतो त्यांना वाटतो.

शिक्षक क्षेत्र निवडताना काही अडचणी:
वीस वर्षांपूर्वी शिक्षक बनण्याकरीता लागणारी अहर्ता प्राप्त होण्यासाठी गुणवत्ता यादी लागत होती.  शिक्षक सचिन हे कोकणातील ग्रामीण भागात राहत असल्याकारणाने या सर्व गोष्टींची माहिती त्यांना कमी होती.  1996 मध्ये बारावी परीक्षा झाल्यावर सैनिक सेवेचे आकर्षण असल्याने ते वडिलांसोबत राजस्थान गंगानगर या ठिकाणी मिलेटरी भरती करीता गेले आणि तीन-चार महिने सराव केला.त्या दरम्यान बारावीचा निकाल जाहीर झाला, आणि ते चांगल्या गुणांनी पास झाले होते. परंतु डीएडचा फॉर्म भरण्यास उशीर झाल्याने त्यांना त्या वर्षी डीएड ला ॲडमिशन मिळालं नाही. म्हणून त्यांनी एफ वाय बी ए ला ऍडमिशन घेतले. तेव्हा ग्रामीण भागात कोणत्याही ट्यूशन शिवाय वीस किलोमीटर कॉलेजला जावे लागे, चार तास प्रवासात आणि स्वयंध्यायनातून 55 ते 60% मिळत. त्यामध्ये संधी शोधावी लागे, परंतु वडिलांच्या सैनिकी सेवेच्या राखीव जागांमुळे मला डी एड प्रवेश मिळाला व आणि त्यांनी यशस्वीपणे त्यांचे सर्व शिक्षण पूर्ण केले.

अविस्मरणीय क्षण :
 आज मुलांना कृतीयुक्त आनंददायी शिक्षणाची गरज आहे हे ओळखून शिक्षक सचिनजी यांचा शाळेत जास्तीत जास्त सहशालेय व अभ्यास पूरक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न असतो. नाविन्यपूर्ण उपक्रम ,कृतिसंशोधन ,विज्ञान प्रदर्शनातील प्रतिकृती, विविध स्पर्धा अशा नवोपक्रमांची मालिका त्यांनी या 19 वर्षात राबवल्या आहेत ..
   परंतु २०१९/२०२० या सलग दोन वर्षात शाळेतील मुलांच्या मदतीने राबवलेल्या “चित्ररुपाने पुस्तक जिवंत” व शाळेतील परसबाग घरोघरी”या नवोपक्रमाला राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत रायगड जिल्ह्यात त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.. हे यश खऱ्या अर्थी त्यांना सुखावणारे होते.
 कारण लॉकडाऊच्या काळात शाळा बंद असताना ,मुलांकडे कोणतीही डिजिटल सुविधा नसताना, त्यांच्या मुलांनी ऑफलाइन उपक्रम करून हे यश मिळवले होते.तसेच विज्ञान प्रदर्शनात २०१६,२०१७,२०१८ या तीन वर्षात माध्यमिक शाळा, इंग्लिश मीडियम स्कूल या मोठ्या गटांमध्ये त्यांची एखादी जिल्हा परिषदेची शाळा  जिल्ह्यात विजेता ठरावी हे अविस्मरणीय होते .
 तसेच १९ वर्षाच्या काळात दोन वर्ष “विषयतज्ञ” म्हणून प्रतिनियुक्तीवर काम करत असताना आरोग्य विषयांतर्गत चार मुलांना हृदयरोगावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास शिक्षक सचिनजी सहभागी झाले . हे क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहेत.

समाजात शिक्षक विद्यार्थी यांच्याविषयी अजून काय बदल होण्याची गरज: 
 आज शिक्षण क्षेत्रात होत असलेली क्रांती, अनेक बदल आणि विद्यार्थ्यांची आज शिक्षणाविषयी असलेली मानसिकता याचा विचार केला तर शिक्षण हे कृतीयुक्त ,आनंददायी व तणाव मुक्त असावं, फक्त गुण मिळवण्यासाठी शिक्षण नको तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार ,त्यांचा कल पाहून शिक्षण मिळावे असे शिक्षक सचिन यांना वाटते.
मुलं मोबाईल मध्ये हरवली आहेत, एकलकोंडी झाली आहेत,आपली मनं मोकळे करत नाहीत अशा परीस्थितीत त्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकवणं योग्य होईल असे ही त्यांना वाटते.
बोरं हे झाड काटेरी आहे का? चिंच- कैऱ्या या आंबट/ गोड कशा होतात? मोबाईल वर रेसिपी पाहून पदार्थ बनवता येतात पण  रेसिपी पाहून सायकल चालवता येत नाही किंवा पोहता ही येत नाही यासाठी प्रत्यक्ष अनुभव, कृती महत्त्वाची म्हणून ‘कृतियुक्त शिक्षणावर’ भर असावा. अनुभवविश्वाबाहेरील तर्क ,घोकंपट्टी असं अध्यापन न करता मूल्यांवर आधारित मुल्ये, प्रसंग दररोज शाळेत असतील असे शिक्षण हवे असे मत ही त्यांनी व्यक्त केले.
 “परिवर्तन संसार का नियम है” हे जरी सत्य असले तरी या बदलत्या जीवनशैलीत अनुभव व कृतीयुक्त सहभागाद्वारे तणावमुक्त शिक्षण प्रत्येकाला मिळावे जेणेकरून भारताचा एक सुजान व आदर्श नागरिक आपण तयार करू.

 शिक्षक होण्याची इच्छा असलेल्यांना सल्ला 
फक्त नोकरी करता शिक्षक व्हाल तर ते जगणं माणसाचे जगणे म्हणता येणार नाही…शिक्षण क्षेत्रात होत असणारे नवनवीन बदलाप्रमाणे आपल्याला बदलणे गरजेचे आहे, शिक्षक हा अष्टपैलू असावा, नवनवीन ज्ञान, माहीती आत्मसात करणारा असावा, डिजिटलच्या या स्पर्धेच्या युगात तो “स्मार्ट स्कूल” प्रमाणे “स्मार्ट टीचर” असणे आवश्यक आहे.
संशोधक वृत्ती, नवोपक्रमांची आवड, देशसेवा व गुणवत्तापूर्ण तणावमुक्त शिक्षण हे ध्येय बाळगणारा व्यक्तीच आदर्श शिक्षक होईल….!
 ‘माझ्या मुलांनी जगासमोर अभिमानाने सांगायला हवे “ते माझे गुरुजी, ज्यांच्यामुळे मी घडलो.”    ‘शिष्याच्या कर्तुत्वाने गुरूंची ओळख’ या सचिन तेंडुलकर यांच्या रमाकांत आचरेकर सरांची महती लक्षात ठेवा व शिक्षक ही नोकरी नसून तो “पवित्र असा पेशा, सेवा आहे” हे लक्षात ठेवून शिक्षक बना’