S R Dalvi (I) Foundation

Tr. Sadhana Bhanushali

Tr. Sadhana Bhanushali

आज आपण सौ.साधना मुकेश भानुशाली ( बी.ए. सामाजिक नाव शास्त्र,  डी.एड , बी. एड – मराठी आणि इतिहास ) यांचा शिक्षिका होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.श्रीमती साधना या वाडा येथे राहत असून गेले २६ वर्ष त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच सध्या त्या जिल्हा परिषद केंद्र शाळा गोऱ्हे या शाळेत शिकवतात. शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र,  गुरूंना मिळणारा आदर, प्रेम , आपुलकी आणि ते घडत असलेले सुसंस्कृत पिढी याचे लहानपणापासूनच साधना यांना खूप आकर्षण होते. त्यांचा लहानपणीचा खेळही ‘शाळा शाळा’ असायचा. भातुकलीच्या खेळातही पाहुणे म्हणून त्यांच्या कंठे बाई व वाघ गुरुजी यायचे. तेव्हाच त्यांचे ठरले होते की मोठे होऊन शिक्षक व्हायचं . पण पुढे काही वर्षांनी त्यांना वाटलं डॉक्टर व्हावं , पण परिस्थितीमुळे ते काही जमले नाही .त्यांचे वडील फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये होते. आणि घरात ते कमावणारे एकटेच होते. नंतर त्यांच्या आईनेही कंपनीत नोकरी करत अपार कष्ट केले. सौ साधना या घरातत्या भावंडांमध्ये  मोठ्या होत्या . त्यामुळे सारासार विचार करून परिस्थितीमुळे  डॉक्टर होण्याचे त्यांनी टाळल. मग  इयत्ता दहावीत असताना  इतिहास विषय शिकविणाऱ्या हंडे सरांचा आदर्श समोर  पाहून त्यांनी ठरवलं  की डॉक्टर, इंजिनिअर,वकील यांना घडवणारे शिक्षक व्हावे. आणि मग विद्यार्थी हेच प्रथम दैवत मानून त्यांच्यावर योग्य असे शैक्षणिक संस्कार रुपी अभिषेक घालण्यासाठी शिक्षक व्हावेसे त्यांना वाटले.

‘शिक्षक’ हे क्षेत्र निवडताना अडचणी:
दहावी नंतर डीएडसाठी सौ साधना यांनी फॉर्म भरला. पहिल्याच यादीत त्यांचा नंबर ही लागला.पण वडिलांनी येऊन सांगितले की, तुझा नंबर लागला नाही. या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसला नाही. त्या दिवशी त्यांना खूप वाईट वाटले. काही दिवसांनी  त्यांच्या वडिलांनी असे करण्याचे कारण सांगितले .”डीएडला कशाला पाठवतोस साधनाला.त्यापेक्षा तिला दूभाषिक ( language translator) बनव.अर्थात जर्मन,फ्रेंच यासारख्या परदेशी भाषा शिकव” असे त्यांच्या काकांनी वडिलांना सांगितले होते. पण त्यासाठी लागणारा खर्च खूप होता. त्यांच्या काकांनी आर्थिक मदत काही दिली नाही.त्यामुळे मग त्यांनी अकरावीला प्रवेश घेतला. अकरावीत त्यांचा  कॉलेज मध्ये पहिला नंबर आला. सर्वांना खूप आनंद झाला. मग पुन्हा त्यांनी डि.एड साठी फॉर्म भरला.आणि त्यांचा नंबर  वसईतील सेंट अलायन्सेसस  पापडी  या कॉलेजला लागला.

अविस्मरणीय प्रसंग/क्षण:

शिक्षिका साधना यांनी त्यांच्या कार्यातले काही निवडक अविस्मरणीय प्रसंग आपल्याबरोबर शेअर केले आहे.

– इयत्ता चौथीच्या वर्गात भूगोल विषयाचे अध्ययन चालू होते.  घटक -आपला महाराष्ट्र.  महाराष्ट्रात 35 जिल्हे , महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई ,उपराजधानी नागपूर. प्रशासकीय विभाग किती व कोणते. कोणत्या प्रशासकीय विभागात कोणते जिल्हे येतात या सर्व प्रश्नांची उत्तरे मुले लाह्या  फुटाव्यात तशी चटकन देत होती. त्या म्हणाल्या  कालच्या वर्तमानपत्रातील बातमी वाचली का? शिवाजी विद्यापीठाने प्रत्येक विद्यार्थ्याला एक गवताची पेंढी आणायला सांगितली आहे. बातमी वाचलेल्या मुलांनी तपशील पूर्ण केला… ‘ शेजारच्या सांगली व सातारा जिल्ह्यात दुष्काळ आहे. प्रत्येकाने जनावरांसाठी एक पेंडी गवत द्यायचं आहे.’ त्या अधिक भर घालत म्हणाल्या , ‘आपला महाराष्ट्र शिकतांना हे सगळं समजून घ्यायला हवे.आपण काय करू या, विचार करा.’

मधल्या सुट्टीत चौथीची मुले शाळेच्या मैदानात एका कोपऱ्यात काहीतरी करत होती त्या म्हणाल्या  , ‘अरे मुलांनो आज हे काय?’ मुले म्हणाली बाई येथे खणतो. आम्ही येथे गवत लावतो. आपल्या पेंढ्याही पाठवू या.

– मुलांना गाणी म्हणणे गोष्टी सांगणे व नृत्य करणे याची मनापासून आवड असते हा अनुभव त्यांना एका गीतांमधून प्रत्यक्षात देण्यासाठी शाळेच्या शेजारी असलेल्या प्राजक्ताच्या झाडाखाली नेले पाचवीच्या एका वर्गाचे दोन गोलाकार फेर त्या झाडाखाली धरायला लावून टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर भिर भिर भिर त्या तालावर गाणे अमुचे झुले हे गाणे विविध ताला सुरात गाऊन घेतले. वाऱ्याबरोबर काही प्राजक्ताची फुले त्यांच्या अंगावर आणि जमिनीवर पडत होती. हा संस्मरणीय अनुभव त्या आणि त्यांचे विद्यार्थी अजून विसरले नाहीत. प्रत्यक्ष भेटीत ते या गाण्याची आठवण काढतात

– विद्यार्थ्यांनी शिक्षिका साधना यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना दिलेली एक अनमोल भेट . हा त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अविस्मरणीय अनुभव आहे.

– शाळेत ‘ विद्यार्थ्यांचे वाढदिवस ‘हा उपक्रम राबवला . ग्रामीण दुर्गम भाग . मुलांना केक हा प्रकार माहीत नव्हता . त्याची अनुभूती द्यावी व सलोख्याचे, आपुलकीचे, प्रेमाचे नाते रहावे . तसेच अशा वातावरणात कसे वागायचे असते, हे मुलांना कळावे म्हणून  प्रत्येक महिन्यात असणारे  विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरे केले जायचे.  त्यासोबतच शिक्षकांचे वाढदिवस साजरे होत असत.

– शिक्षिका साधना यांचा वाढदिवस 5 जून. जागतिक पर्यावरण दिनी असतो. या दरम्यान शाळेला सुट्टी असते त्यामुळे शाळेत वाढदिवस साजरा होत नसे. पण एके दिवशी मुलांनी त्यांना  सुखद धक्का दिला.त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, सारे नियोजन मुलांनीच केले होते. केक,दिवा,  मेणबत्त्या,खाऊ ,भेटवस्तू इ. त्यांच्या भेटवस्तू सौभाग्याचे संपूर्ण लेने व माझ्या विषयी त्यांच्या मनात असलेल्या भावना व्यक्त करणाऱ्या कवितांची वही होती. ही  वही त्यांनी अजूनही जपून ठेवली आहे.त्यातील एक कविता

‘देवासारखे वडील मिळाले भाग्य माझे नवे

देवी सारखी आई मिळाली भाग्य माझे मोठे

सोनाली व भक्ती सारख्या मैत्रिणी मिळाल्या भाग्य माझे उजळले

साधना मॅडम सारख्या  शिक्षिका मिळाल्या

जन्म सार्थकी लागला जन्म सार्थकी लागला ‘.

मॅडम नी जे प्रेम दिले ते आईप्रमाणे आहे

मॅडम ने जे शिक्षण दिले ते प्राणाहूनही प्रिय आहे

साधना मॅडम सारख्या शिक्षिका जन्मोजन्मी मिळाव्या

अशी देवाकडे जन्मोजन्मी प्रार्थना

ही अनमोल भेट मला जीवनातील सर्वोत्तम पुरस्काराचं समाधान देत आहे.

 अचिव्हमेंट –

विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार ते अजूनही विसरलेले नाही आहेत ते आचरणात आणत आहेत ही त्यांच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. असे शिक्षिका साधना यांनी सांगितले.

त्याचबरोबर- आतापर्यंत मिळालेले  पुरस्कार

आदर्श शिक्षिका पुरस्कार सन २०१६-१७

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जागतिक महिला दिना निमित्त सन्मान सन २०१८

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या बाबत जिल्हा परिषद पालघर कडून सम्मान

उल्लेखनीय लेखनाबद्दल तेजश्री प्रकाशन इचलकरंजी यांच्याकडून सन्मानपत्र २०२०

जायंट्स ग्रुप इंटरनॅशनल  क शिक्षकरत्न पुरस्कार २०१९

सर फाऊंडेशन पालघर आयोजित ‘काव्यानंद देशभक्तीचा ‘या उपक्रमातील उत्कृष्ट सहभागाबद्दल सन्मानपत्र २०२१.

उपक्रमशील शिक्षक जिल्हास्तरीय पुरस्कार (पालघर)

काव्यधारा राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सम्मान २०२०

गौरवशाली रचना सादर केल्याबददल सन्मान करून द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सन्मानपत्र २०२१

अभिजात मराठी साहित्य सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित काव्यलेखन स्पर्धेत काव्य हेमंत सम्मान

अष्टपैलू कला अकादमी मुंबई कया संस्थेकडून  अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय पुरस्कार सन २०२१

मातृसेवा फाउंडेशन ठाणे स्माईल टीम यवतमाळ शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनी कर्तुत्ववान महिला पुरस्कार २०२१.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी कडून राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार २०२१

तेजभूषण बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र या संस्थेकडून तेजभूषण साहित्य दर्पण पुरस्कार २०२१

साहित्य कला विचारमंच आयोजित चौथ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात काव्य सन्मान २०२२

२२ मे २०२२ रोजी मिळणार  pride of nation हा  राष्ट्रीय पुरस्कार

शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज वाटते: 

शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी शाळेत प्रोजेक्टर कम्प्युटर उपलब्ध व्हायला हवेत. शिक्षणातून भविष्यासाठी उपयुक्त अशा क्षमता व कौशल्याचा विकास करायला हवा. सध्या ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार वाढला आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे विद्यार्थ्यांची वाचन लेखन गती कमी झाली आहे तो मागे पडला आहे पण आता सर्व काही सुरळीत झाले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुन्हा नियमित शिक्षणाच्या प्रवाहात येणे गरजेचे आहे.आज बदलत्या काळानुसार काळाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी बदलत्या काळानुसार बदलावे. तंत्रस्नेही बनावे. स्वतःला अपडेट ठेवावे. स्वतःहून शिकणे,विचार करता येणे, मिळालेल्या अनुभवातून योग्य ज्ञान घेता येणे, शोध घेता येणे, पर्यायाची निवड करता येणे ,कल्पनाशक्ती वापरणे, नवनिर्मिती करणे ,निर्णय घेता येणे अशा क्षमता व कौशल्यांचा विकास करायला हवा. केवळ शाळेच्या चौकटीत अनुभवांची विविधता आणि व्यापकता साधने कठीन आहे आणि म्हणूनच शाळा ,घर, परिसर व समाज मिळून शाळा बनली पाहिजे . ज्ञानरचनावाद असो वा ऑनलाइन शिक्षण असो विद्यार्थी  व शिक्षक यांच्यातील दरी कमी होणे अभ्यासक्रम समकालीन शाळा साधन संपन्न असलेले ही काळाची गरज आहे असे मत शिक्षिका साधना यांनी वाटते.

ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही सल्ला:

शिकवण्यापेक्षा शिक्षण यावर अधिक भर द्यावा.पारंपरिक चौकट मोडून कृतिशील अनुभव द्यावेत.मार्गदर्शक व एक सुलभक म्हणून मुलांबरोबर काम करावे.विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून वर्गरचना व वातावरण निर्मिती करावी.मुलांचे भावविश्व समजून घ्यावे.पाठ्यपुस्तक हे साधन म्हणून वापरावे. ज्ञानरचनावाद ही संकल्पना बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.त्यामुळे ज्ञानरचनावादावर अधिक भर द्यावा.शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे त्यामुळे भावी पिढी कर्तुत्ववान चारित्र्यवान व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली   घडविण्याचा प्रयत्न करावा.असा सल्ला शिक्षिका साधना यांनी दिला.

English Marathi