आज आपण श्री. सागर दिनकर पेंडूरकर (एम.ए. बी.एड.) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. सागर हे मुक्काम/ पोस्ट- भुईबावडा ,तालुका -वैभववाडी, जिल्हा- सिंधुदुर्ग येथे राहत असून गेली 17 वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.आणि सध्या ते विद्यामंदिर आखवणे नं.1 येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करत आहेत. नुकतेच 13 एप्रिलला त्यांच्या शिक्षकी प्रवासाला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि शिक्षण सेवेचे व्रतअखंड पणे सुरू आहे.
‘शिक्षक व्हावेसे वाटले’ याचे पाहिले कारण त्यांचे प्राथमिक शाळेतील शिक्षक आहेत असे सागर सांगतात. 3री ला असताना सागर यांना त्यांच्या सरांनी काही कारणांमुळे हातापायांवर छडीने मारलेले होते, तेव्हा त्यांची आजी शाळेत त्यांच्याशी वाद घालण्यासाठी गेली , तेव्हा त्यांनी ही रागारागाने मनाशी ठाम निर्धार केला की,”मीही एक दिवस शिक्षक होऊन सरांच्या मुलांनाही छड्या देईन,” तेव्हाच त्यांनी प्रथम शिक्षक होण्याचे ठरवले होते. इयत्ता 8वी पासून इंग्रजी विषयातील परिच्छेदावर आधारित पर्सनल रिस्पॉन्स वर आधारलेला प्रश्न विचारला जायचा.तेव्हा ते ‘माझे ध्येय शिक्षक होण्याचे आहे’ ,असे लिहायचे.आणि त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याच्या दिशेने ते वाटचाल करत राहिले. जशी त्यांची समज वाढली ,तशी त्यांची स्वप्नामागे असणारी सूडभावना कमी झाली. पण प्राथमिक शिक्षक होण्याच्या स्वप्नाचा पाठलाग माञ सुरूच राहिला.
‘शिक्षक’ क्षेत्र निवडताना अडचणी:
श्री. सागर यांना शिक्षक तर व्हायचे होते मात्र ते कसे याची जास्त माहिती नव्हती.12वी नंतर शिक्षक होण्यासाठी नक्की काय करावे लागते? याची ही त्यांना नीट माहिती नव्हती. मित्रांच्या सहाय्याने डी.एड. प्रवेशासाठी त्यांनी अर्ज केला तेव्हा आवश्यक असणारा दाखला काढताना तलाठी कार्यालय,तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयात काही अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. डी.एड. साठी चित्रकलेची ग्रेड परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट याचे दोन गुण असायचे. पण त्यांना चित्रकलेची काही माहिती नव्हती, आणि आरक्षणाविषयी काही माहिती नव्हती. कमी टक्केवारी असणाऱ्या अनेक मुलांना प्रवेश मिळत होता, पण त्यांना पहिल्या दोन फेरीपर्यंत डी.एड, प्रवेश मिळाला नाही. तिसऱ्या फेरीत त्यांना यवतमाळ येथे डी.एड. साठी प्रवेश मिळाला. तेथून वारणा कोडोली येथे जिल्हा बदलीने कॉलेज बदलून मिळाले. यशवंत डी.एड. कॉलेज कोडोली येथून शिक्षण शास्त्र पदवीका त्यांनी पूर्ण केली .आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला .कॉलेज फी,मेस, रूम भाडे ,प्रवास यासाठी मित्र, नातेवाईक यांची मदत झाली . बहिण, आईवडिलांनी खूप मोलाची साथ दिली .चुलते ,मामा यांनीही मदत केली .त्यामुळेच आज ते शिक्षक म्हणून कार्यरत आहे असे ते आवर्जून सांगतात.
अविस्मरणीय प्रसंग/ क्षण:
शिक्षक सागर यांच्या आयुष्यात शिक्षक म्हणून 17 वर्षाच्या प्रवासात अनेक अविस्मरणीय प्रसंग आले. मात्र एक प्रसंग त्यांनीआवर्जून शेअर केला. तो दिवस होता 26 जून 2005. छत्रपती शाहू महाराज जयंती. या दिवशी देवगडमधील वाडा केंद्रांतर्गत वाडा हायस्कूलमध्ये समूह साधन योजने अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक शाळेचे दोनच विद्यार्थी सहभागी होणार होते, आमचे मुख्याध्यापकांनी स्पर्धेची जबाबदारी सागर सोपवली होती.शाळेतील अनेक विद्यार्थ्यांमधून मी कल्पना राऊळ व जुईली मसुरकर या दोन विद्यार्थिनींची निवड केली आणि त्यांची वक्तृत्वाची तयारी करून घेतली .स्पर्धेत सहभागी सर्व शाळांमधून प्रथम क्रमांक कल्पनाने व द्वितीय क्रमांक जुईलीने पटकाविला. त्यांची ही पहिलीच शिक्षक म्हणून जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली ,तेव्हा पारितोषिक वितरण वेळी मुलांनी केलेल्या मनोगतातून सागर यांचा झालेला उल्लेख झाला आणि उपस्थित केंद्रातील सर्व शिक्षक ,केंद्रप्रमुख यांनी पारितोषिक वितरण समारंभात सागर यांचे कोतुक केले जे आजही त्यांना आठवते.
अचिव्हमेंट
– गेल्या 17 वर्षाच्या प्रवासातील अनेक विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील यश, हीच त्यांची मोठी अचिव्हमेंट आहे असे ते म्हणतात.
– सागर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने मुंबई स्थित फोर्स फाउंडेशनकडून दोन संगणक संच मिळवले व शाळेतील विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेत संगणकाचे प्राथमिक ज्ञान दिले. फणसे येथे प्रशासन,ग्रामस्थ यांच्या मदतीने प्रयोगशाळाही सुरू केली .शाळेतील विद्यार्थी छोटे छोटे प्रयोग निर्भयपणे प्राथमिक शाळेतच करू लागले.
– फणसे शाळेतील मुला-मुलींच्या संघाने जिल्हा परिषद आयोजित कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवांमध्ये केंद्रस्तर ,प्रभाग स्तर, तालुकास्तरापर्यंत खो-खो विजेता ठरले, अनेक वेळा समूहगान , प्रश्नमंजूषा स्पर्धा यामध्येही यशस्वी झाले.
– सन 2012 पासून सध्याच्या विद्यामंदिर आखवणे नं.1 या शाळेतील विद्यार्थीसुद्धा जिल्हा परिषद आयोजित कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत यशस्वी ठरले. 2012 मध्ये मुलांचा खोखो संघ केंद्रस्तर , प्रभागस्तर ,तालुका स्तरावर विजय होऊन जिल्हास्तरावर सहभागी झाला.
– याच शाळेतील प्रेरणा वासुदेव नागप हिने नुकतेच बारावीनंतर सीए होण्याचे सीए फाउंडेशनची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली. त्या वेळेला तिने मम्मीकडून ही गोड बातमी सांगत आवर्जून माझी आठवण काढून सांगितली .तेव्हा खूप काहीतरी achieve झाल्याची जाणीव झाली.
– समाधान सुतार नावाचा विद्यार्थी 42व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला,
– आज देवगड मधील तुषार नावाचा विद्यार्थी दुबईमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम पाहतो तेव्हा तो आठवणीने हे प्राथमिक शाळेत त्याला शिकवलेले इंग्रजी चे टेन्स बद्दल कसा उपयोग होतो ते आवर्जून सांगतो, तेव्हा शिक्षक झाल्याचे समाधान वाटते
– त्यांच्या कडून शिकलेले अनेक विद्यार्थी आज मुंबईतील कार्पोरेट कंपन्यांमध्ये हे HOD आहेत.
समाजात शिक्षक विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज:
समाजात शिक्षक- विद्यार्थ्यांच्या बाबतीत आमूलाग्र बदल होणे शिक्षक सागर यांना गरजेचे वाटते. समाजात शिक्षकाला योग्य तो मानसन्मान मिळायला हवा. शिक्षकाच्या कामाचे कौतुक व्हायला हवे शिक्षकाला दिले जाणारे पुरस्कार यासाठी त्यांना स्वतः प्रस्ताव सादर करावे लागतात याचे दुःख वाटते. प्रस्ताव सादर न करता स्वतःहून माहिती देऊन अनपेक्षितपणे प्रशासन,स्वयंसेवी संस्थांमार्फत दिले जावे असे त्यांना वाटते तेव्हाच खरा आनंद, समाधान शिक्षकांना मिळेल असे सागर यांनी सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांना स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण द्यायला हवे.सध्या पालक, समाज विद्यार्थ्यांच्या कडून अवास्तव अपेक्षा ठेवतो .अशा अवास्तव अपेक्षा न ठेवता ताणतनाव विरहीत शांतपणे विद्यार्थ्यांना शिकू द्यावे, त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यात त्यांना पालकांनी मदत करावी .समाजाने मदत करावी असे मत शिक्षक सागर यांनी व्यक्त केले.
शिक्षक व्हायचे आहे त्यांना सल्ला:
शिक्षण अखंड चालणारी प्रक्रिया आहे. मनुष्याने आयुष्यभर शिक्षण घेतले तरी ज्ञानसागरामध्ये गुडघाभर पाण्यापर्यंत पोहोचेल. मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो .सतत अनुभवाद्वारे तो त्याचे ज्ञान वृध्दीगत करत असतो. शिक्षक हा समाजाचा कणा असतो राष्ट्र उभारणीत महत्त्वाचे योगदान देतो.त्याच्या हातून विविध शहरातील नामवंत व्यक्ती घडत असतात सजीवांवर प्रक्रिया करून त्यांना घडविणारा हा निर्मितीचा धनी म्हणावा लागेल. म्हणून शिक्षक होणाऱ्या प्रत्येकाने प्रथम आपण स्वतः अभ्यासू, ज्ञानी बनावे .फक्त ज्ञान असून उपयोगी नाही तर मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग करून जीवन जगावे ,ज्ञान आचरणात आणावे. निर्व्यसनी, सुसंस्कृत विद्यार्थी घडवावेत आणि आदर्श नागरिक घडवावेत आणि भारताला महासत्ता बनवण्यासाठी बलशाली समाज घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की,शिक्षकाने सदैव नावाप्रमाणे शिलवान,क्षमाशील व कर्तृत्ववान बनावे. असा मोलाचा सल्ला शिक्षक सागर यांनी शिक्षक होऊ इच्छीनार्यांना दिला.