*एक चांगला शिक्षक आशा जागृत करून कल्पनेला प्रज्वलित करू शकतो*
आज आपण शिक्षिका संघमित्रा विजय कुरतडकर यांच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रीमती संघमित्रा या रत्नागिरी येथील असून यांचे शिक्षण बी एस्सी . एम ए. बी एड झाले आहे. त्या गेली 22 वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि सध्या त्या रत्नागिरी तालुक्यातील निवळी या गावात सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करत आहेत आणि आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विज्ञान या विषयाचे अध्यापन करीत आहेत.
संघमित्रा यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण 1990 मध्ये बी.एन. बांदोडकर कॉलेज ठाणे येथे पूर्ण झाले , आणि त्यांनी बीएड 1999 ला पुर्ण केलं. त्यांनी भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डे येथे रत्नागिरी सावर्डे अपडाऊन करून अभ्यासक्रम पूर्ण केला आणि 1999 च्या वर्षात त्या कॉलेजमध्ये तिसऱ्या आल्या. मे 1999 मध्ये त्या बीएड उत्तीर्ण झाल्या आणि जून मध्ये लगेचच रत्नागिरी तालक्यातील निवळी इथल्या कै. यशवंतराव माने माध्यमिक विद्यालयात रुजू झाल्या.
आम्ही संघमित्रा त्यांना शिक्षकीक्षेत्राशी निगडित काही प्रश्न विचारले मत जाणून घेतले.
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी अजुन काय बदल होण्याची गरज आहे अस वाटते?
सध्याच्या बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये काहीसा दुरावा निर्माण झालेला दिसतो. छोट्या छोट्या गोष्टींवर हे विद्यार्थी आपल्या पालकांना शाळेत घेऊन येतात नंतर पालकांमध्ये आणि शिक्षकामध्ये काहीसे मतभेद होतात आणि यामुळेच या विद्यार्थ्यांच्या मनात त्या शिक्षकाबद्दल आदर कमी होऊन जातो किंवा कमी असतो. हे चित्र बदलायला हवं असे मला वाटते.
तसेच वर्ग अध्यापन करताना शिक्षकांनी ई – साहित्यांचा (e-learning) वापर जास्तीत जास्त करून आता काळाची गरज बनलेली आहे परंतु त्यासाठी बहुतांश ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट सुविधा तेवढीशी उपलब्ध नसते तर त्याबद्दल काही बदल व्हावे असं मनापासून वाटतं.
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला दयाल?
हुशारी सोबतच शिकण्याची कला असणे गरजेचे आहे .विद्यार्थ्यांनी बद्दल,आत्मीयता ,पालकांविषयी आत्मीयता असायला हवी. पालकांशी संवाद साधता आला पाहिजे.समाजातल्या सर्व घटकांशी तुमचे संबंध चांगले असले पाहिजेत.या शिवाय शिक्षक म्हणून तुम्ही सुद्धा अपडेट असणे गरजेचे आहे. अध्यापन विषयाचे सखोल ज्ञान असायला हवे. एखाद्या विद्यार्थ्यांसमोर तुम्ही एक आदर्श असता त्यामुळे तुमचे चारित्र्य ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरते त्यामुळे चारित्र जपणे हे खूप महत्त्वाचे गोष्ट आहे.