S R Dalvi (I) Foundation

Tr. Sanjay Holkar

Tr. Sanjay Holkar

आज आपण श्री. संजय जयराम होळकर (बी.ए .बी.एड ),यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संजय सर हे उरण येथे राहत असून त्यांना शिक्षण क्षेत्रात २४ वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते मोठी जुई शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत आहेत.

तुम्हाला शिक्षक व्हावेसे कधी व का वाटले?
रायगड जिल्ह्यातील शेवटचा व दुर्गम तालुका म्हणून ओळखला जाणारा पोलादपूर तालुका छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे व शेलार मामा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व सावित्री नदीच्या तीरावर असलेल्या एका छोट्या वाडीत वाकण गोपाळवाडी येथे अत्यंत गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. परंतु शिक्षणाविषयी आवड व काही तरी बनण्याची जिद्द होती. मी माध्यमिक शिक्षक घेत असताना माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न आमच्याच तालुक्यातील प्राथमिक शिक्षक असणारे श्री लक्ष्मण माने गुरुजी यांचे सुपुत्र यांच्याशी झाला. त्यांच्या घरी येणे जाणे सुरू झाले व मलाही शिक्षक होण्याची भावना उत्पन्न झाली. त्यानंतर सन 1993 ला बारावी उत्तीर्ण झाल्यावर निवड मंडळ व जिल्हा परिषद यांची एकाच वेळी शिक्षक भरती जाहीरात सन 1993 ला निघाली. मी गुरुजींना विचारले, मी कोणता फॉर्म भरू? ते म्हणाले भर जिल्हा परिषदेचा… कारण आपलीच जिल्हा परिषद आहे. मी जिल्हा परिषदेचा फॉर्म भरला. व जानेवारी 1994 ला पहिला शिक्षक म्हणून माझ्या माध्यमिक शाळेच्या गावीच कापडे बुद्रुक या प्राथमिक शाळेवर रुजू झालो आणि 30 एप्रिल 1994 ला सेवानिवृत्तही झालो.फक्त चार महिने सेवा होती.ज्यांनी ज्यांनी दोन्ही फॉर्म भरले होते ते सेवेत कायम झाले व माझी कायम होण्याची संधी हुकली. मी त्याच दिवसापासून ठरवले काही झाले तरी शिक्षकच व्हायचेच.. कारण शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र दुसरे कोणतेच नाही. हे मला या चार महिन्याच्या सेवेने अनुभवयाला मिळाले. आणि शिक्षक होण्याची उर्मी प्राप्त करून दिली.
पुढे सातवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्यामुळे शाळेने मला जी सायकल भेट दिली होती त्याच सायकलने मी 1995 ते 97 या दोन वर्षात उरण ते पिरकोन 15 किलोमीटरचे अंतर दररोज पूर्ण करून डी.एड उत्तीर्ण झालो व 1998 च्या निवड मंडळाच्या भरतीत पुन्हा पवित्र अशा शिक्षकी पेशात रुजू झालो.

ज्या विद्यार्थ्याला शिकवणे तुम्हाला कठीण वाटते त्याला तुम्ही कसे हाताळता?
असे बरेचसे विद्यार्थी माझे पहिली शाळा उमरठ दुसरी शाळा कोंढरी व तिसरी शाळा मोठी जुई या तिन्ही शाळांमध्ये अध्यापनाचे काम करत असताना आढळून आले व येत आहेत अशा विद्यार्थ्यांना हाताळत असताना त्यांचा कल पाहून, त्यांना मायेने कुरवाळून, त्या त्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे असे विद्यार्थी अध्यापनाकडे तसेच अभ्यासाकडे आपली आवड जोपासत अभ्यासात लक्ष देतात हा माझा अनुभव आहे. काही मुले अभ्यासाव्यतिरिक्त विविध क्षेत्रात अग्रेसर असतात. उदाहरणार्थ -क्रीडा, संगीत,नाट्य, नृत्य, गायन, वादन, चित्रकला, स्वच्छता, कागद काम,मातीकाम किंवा नेतृत्व यामध्ये पुढे असतात. त्यांना जर त्यांच्यातील गुण ओळखून ही संधी उपलब्ध करून दिली. तर ही मुले नक्कीच पुढे समरस होतात. किंवा या मुलांना शाबासकी, बक्षिसे, प्रलोभने दिली तर नक्कीच अभ्यासात प्रगती करतात. त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक साहित्य डिजिटल माध्यमे यांचाही वापर केल्यास अधिक प्रभावी ठरतो.

तुम्ही विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करता?
याची मी दोन उदाहरणे दिली मी कोंढरी शाळेत असताना अर्णव रामचंद्र म्हात्रे हा पहिलीपासूनचा माझा विद्यार्थी. हा अभ्यासात नेहमीच मागे असायचा. पण जिथे जिथे तो बसेल तिथे तिथे तो हाताने बेंचेस, मध्यान्ह भोजनाचे ताट किंवा कंपास विविध वस्तू वाजवायचा, वर्गात अध्यापन करताना मध्ये मध्ये व्यत्यय आणायचा.बरेच दिवस निरीक्षण केले व त्याला ढोलकी, शाळेतला ताशा वाजवायला सुरुवात करायला सांगितले. ते साहित्य त्याच्या ताब्यात दिले .परिपाठाला संधी उपलब्ध करून दिली. अतिशय सुंदर वादन करू लागला व परिपाठ ही सुंदर होऊ लागला. अभ्यासही करू लागला. आज त्याचे स्वतःचे बँड पथक आहे.
तर दुसरा विद्यार्थी दीपेश पांचाळ हा देखील उत्कृष्ट चित्रकार म्हणून कार्यरत आहे सांगायचे एवढेच की मुलांना त्यांच्या कलेने हाताळले गेले पाहिजे तर नक्कीच मुले आपली प्रगती करत रहातील

तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना कसे motivate करता?
प्रेरणेने राष्ट्र मोठे होते. प्रेरणाच नेहमी पुढील कार्यासाठी ऊर्जा निर्माण करत असतात. त्यामुळे अध्ययन -अध्यापन प्रक्रियेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करणे, त्यांना शाबासकी देणे, बक्षिसे देणे व वाईट घडणाऱ्या गोष्टींमध्ये मार्गदर्शन करून अभ्यासाबरोबर संस्कार व मूल्य शिक्षण यातून त्याचा सर्वांगीण विकास करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम, कृती संशोधन, विविध स्पर्धा बक्षिस पर योजना, ऑनलाइन ऑफलाइन स्पर्धा सहभाग, न्यूज चॅनल, वर्तमानपत्रे यामधून त्यांच्या कार्याचा गौरव करून आपण केलेले काम, आपण केलेला अभ्यास हा देशहिताचा आहे हे जर त्यांच्या मनात बिंबवले तर नक्कीच मुले शाळेत शंभर टक्के उपस्थित राहून अध्ययन प्रक्रिया पूर्ण करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यदायी, ऐतिहासिक, पर्यावरण पूरक, स्वच्छता,ई विविध विषय घेऊन त्यांच्यासाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून त्याला प्रेरित करत असतो.

तुम्हाला पालकांशी संवाद साधायला आवडते का? मुलांच्या पालकांसोबत तुमचे संबंध कसे आहेत?
मला पालकांशी संवाद साधायला नक्कीच आवडतो. कारण शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील पालक हे दुवा असतात. त्यामुळे पालकांसोबतचे संबंध हे नेहमीच सलोख्याचे, जिव्हाळ्याचे व सौजन्यपूर्वक असतात.

तुम्ही वर्गात तंत्रज्ञान कसे वापरता?
माझ्या शाळेत प्रत्येक वर्गात एलईडी टीव्ही, स्मार्ट टीव्ही व दोन प्रोजेक्टर आहेत. माझ्या वर्गात प्रोजेक्टर असून विद्यार्थीच स्वतः हाताळत असतात.मी जेव्हा जेव्हा कार्यालयात शाळेची तातडीची कामे करतो तेव्हा ही मुले त्यांच्या आवडीचा विषय, घटक, कविता स्वतः लावत असतात. विद्यार्थ्यांना घरी मोबाईल द्वारे विविध ॲप तसेच ऑनलाईन अभ्यास, ऑनलाइन स्पर्धा, माहिती सूचना, व्हाट्सअप च्या माध्यमातून दिल्या जातात. विद्यार्थी दिलेला अभ्यास ,स्पर्धा सोडवत असतात अशा प्रकारे विद्यार्थी डिजिटल यंत्राचा उपयोग करत आहेत.

शिक्षण क्षेत्रातील तुमची सर्वात मोठी Achievement कोणती?
शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेचा शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 हा पोलादपूर तालुक्यातुन उरण तालुक्यात येऊनही शासनाने माझ्या केलेल्या कार्याची दखल घेऊन जाहीर केला आहे. हे माझ्या जीवनातील व सेवेतील माझ्यासाठी सर्वात मोठी Achievement आहे.

तर शाळा व विद्यार्थ्यांसाठी 2014 मध्ये कोकण विभागातून कोकण सरस मध्ये नृत्य स्पर्धेत कोंढरी शाळेचा प्रथम क्रमांक.

2018 मध्ये कोकण सरस मध्ये मोठीजुई शाळेचा प्रथम क्रमांक- दहा हजार रुपये रोख पारितोषिक ट्रॉफी व सन्मानपत्र.
2019 मध्ये रायगड सरस मोठीजुई शाळा नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
केंद्रस्तर,तालुकास्तर ,जिल्हास्तर ,
विविध स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग.

मला लहानपणापासून सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक,साहित्यिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याने ते मी कार्य करत आहे त्यामुळे मला
आतापर्यंत शासन,विविध सामाजिक संघटना, संस्था, राज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवरील समाजभूषण, समाज रत्न, शिक्षक रत्न, शिक्षक भूषण, आदर्श शिक्षक, द्रोणागिरी भूषण, उरण रत्न, कोरोना योद्धा असे विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

6 मे 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या सामाजिक व शैक्षणिक प्रबोधन करणाऱ्या अविरत नावाच्या मराठी चित्रपटांमध्ये मुख्याध्यापकाची भूमिका करताना रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच अभिनय करण्याची संधी मिळाली. ही देखील माझ्यासाठी मोठी Achievement आहे.

शिक्षक म्हणून तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासातील एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे.
2005 चा प्रसंग..हाच ऑक्टोबर महिना .. मी उमरठ शाळेत असताना सकाळचे साडे अकरा बारा ची वेळ होती. प्रत्येक शिक्षक आपापल्या वर्गात गेले होते. मी देखील माझ्या वर्गात गेलो होतो. अध्यापन करत असताना मला लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. माझ्या वर्गातल्या उत्तम तुकाराम कळंबे या विद्यार्थ्याचं घर माझ्या वर्गाशेजारीच होतं. अध्यापन करताना थांबलो आणि थोडा आवाज घेतला. तर बराच वेळ झालं छोटं बाळ रडत होतं.पहिला मी दुर्लक्ष केलं पण ते रडायचे काही थांबेना. मी उत्तम ला विचारलं, उत्तम घरात कोण आहे का? त्यांनी नाही उत्तर दिलं. सर्व घरातील आई -वडील,बहिणी, भात कापण्यासाठी शेतावर गेले होते. घरात एकट्याच बाळाला झोपवलं होतं. घराला लॉक लावलं होतं आणि उत्तम शाळेत आला होता. त्याचा मोठा भाऊ नामदेव देखील आला होता. बाळ रडायचं थांबत नव्हतं. मी त्याला बोललो घराची चावी कोणाकडे आहे. त्यांनी मला घराकडे घेऊन गेला. चावी दिली. मी दरवाजा उघडला. एका खोलीत हे छोटा बाळ रडत होतं. पण त्याच्यासमोर जे पाहिलं ते खूप भयानक असं होतं… एक अस्सल नाग त्याच्यासमोर फणा काढून उभा होता. आम्ही दोघेही भयभीत झालो. दरवाजाचा आवाज घेताच साप लाकडी पलंगा खाली निघून गेला. मी बाळाला उचलले व त्याचे हात पाय पहिले चेक केले. शांत केला. नामदेवला बोलवले ,सर्व शिक्षकांना बोलवून काही ग्रामस्थ पण आले. जवळजवळ एक ते दीड तास साप पूर्ण घरभर फिरत होता. माळ्यावर चढला.माळ्याच्या कौलाखाली बसला. माळ्यावर जाऊन त्या सापाला मारले. या बाळाचे दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने काही घडले नाही बाळ रडत असल्यामुळे तो साप त्याच्या कडेला गेला नसावा आणि देवानेच त्याला वाचविले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
असे असंख्य प्रसंग या तिन्ही शाळांमध्ये अनुभवायला मिळाले. आजही तो प्रसंग आठवला की मन हेलावून जाते. मी कधीही उमरठला गेलो की आजही उत्तम व त्याचे कुटुंब आदरातिथ्य करते .मी काही केले नाही पण त्याचा साक्षीदार मात्र होतो. या गावाने खूपच प्रेम दिले.

कोंढरी शाळेत इयत्ता पहिली पासून ते सातवी पर्यंत माझ्या वर्गात वंचित रमेश म्हात्रे विद्यार्थी होता. अभ्यासात मागे असायचा मी पालकांशी विचारलं तेव्हा त्याला जन्मतः काही प्रॉब्लेम झाले होते.अचानक त्याला चौथीत असताना फिट आली. तो वर्गात जमिनीवर कोसळला.आम्ही सर्व घाबरलो.मी लगेच त्याला उचलून एका वर्गात आणले. त्यांनी माझे सर्व कपडे खराब केले होते. पण त्यापेक्षा त्याचा जीव महत्त्वाचा ओळखून कोणी पाय घासत होते,कोणी तोंडावर पाणी तर कोणी कांदा फोडून नाकासमोर धरत होते.दातखिळी बसली होती… मला घाम फुटला होता..पण प्रसंगावधान ओळखून आम्ही सर्वजण तो शुद्धीवर येण्यासाठी प्रयत्न करत होतो. 10/15 मिनीटांनी तो शुद्धीवर आला.व आम्ही मोकळा श्वास घेतला. पुढे मी माझे मामा जे. जे. हॉस्पिटलमध्ये मुंबई येथे कामाला आहेत. त्यांच्या मदतीने त्याला त्या हॉस्पिटलमध्ये पाठवून तेथील डॉक्टर व औषध उपचार सुरू केले. आता 90% फरक पडला आहे. असे खूप चांगले व वाईट अनुभव आले आहेत.

Scroll to Top