आज आपण शिक्षक श्री. सतिश गजानन राहाटे (B.Sc, B.Ed) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. शिक्षक गणेश हे पालघर येथे राहतात. त्यांची मूळ नियुक्ती दिनांक 24/08/2009 ला झालेली असून त्यांना अध्यापनाचा एकूण १३ वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते पंचायत समिती जव्हार अंतर्गत पदवीधर शिक्षक या पदावर जि. प. शाळा काळीधोंड, ता. जव्हार येथे कार्यरत आहेत.
खरं तर शिक्षक व्हायचे ही गोष्ट त्यांच्या बाबतीत मुळी ठरवून केलेली नव्हतीच. बारावीनंतर बी. एस्सी. करण्याचा निर्णय झाला होता त्याप्रमाणे बी. एस्सी. त्यांनी पूर्णही केले. बी. एस्सी. नंतर आपण शिक्षक व्हावे असे मनोमन त्यांना वाटत होते. त्यासाठी डी. एड. ला प्रवेश घेतला. एक उत्तम शिक्षक बनण्यासाठी लागणारे सर्व गुण त्यांनी अंगिकारले पण अंतिम निकालावेळी गुण कमी पडल्यामुळे शिक्षक पदावर त्यांना नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे अर्थाजनासाठी पुण्याला एका कंपनीत सुपरवायझर पदावर त्यांना कामही करावे लागले. एके दिवशी कंपनीतील वरिष्ठ अधिकारी यांनी तु याच पदावर काम करत राहशील तर तुझी पुढे जास्त प्रगती होईल असे मला वाटत नाही, असा सल्ला दिला. त्यावर विचार करून औरंगाबाद येथे प्लास्टिक इंजिनिअरचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षण तर पूर्ण झाले पण आपला स्वभाव आणि व्यक्तीमत्व नेमके कोणत्या पेशासाठी बनले आहे याचा विचार मात्र सतत त्यांच्या मनात घोळत राहायचा. त्यातूनच आपल्या ज्ञानाचा व अभ्यासू वृत्तीचा फायदा इतरांना करून द्यायचा असा विचार करून त्यांनी 2008 ला झालेल्या प्रथम CET मधून शिक्षकी पेशा स्वीकारला.
शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये त्यांच्या या शिक्षकी पेशात कधीही न विसरता येणारा एक प्रसंग घडला. कोणतेही काम हातात घेतले की ते प्रामाणिकपणे पूर्ण करायचे हा सरांचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे ते शाळाबाह्य सर्वेक्षणाचे काम अगदी मनापासून करत होते. शाळेच्या कार्यक्षेत्रातच तळ्याचापाडा या ठिकाणी वीटभट्टी सुरु होती. त्यांनी तिथे भेट दिली असता वेगवेगळ्या शालेय वयोगटातील तीन मुली या वीटभट्टीवर काम करत असतांना त्यांना दिसल्या. एकीकडे आपण गुणवत्ता विकास, प्रगती, स्वच्छता याच्या मोठया गप्पा मारतो पण या मुली वरील सर्व गोष्टीपासून किती दूर आहेत आणि त्याकडे कुणाचे लक्षही नसावे याची त्यांना चीड आली आणि त्यांनी या मुलींना शाळेत आणणारच असा दृढनिश्च्चय केला. त्यानुसार त्यांच्या पालकांचे प्रबोधन करून वरिष्ठांचा सल्ला घेऊन त्यांना वयानुरूप शाळेत दाखल करून घेतले. या स्तुत्य कामाची दखल घेऊन जिल्ह्याने जिल्हास्तरीय बालरक्षक पुरस्कार देऊन सरांचा सन्मानही केला.
Achievement –
(1) जिल्हास्तरीय बालरक्षक पुरस्कार सन 2018-19
(2) जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात द्वितीय क्रमांक
(3) मॉडेल स्कुल (इंग्रजी माध्यम) मध्ये दोन वर्ष उत्कृष्ट अध्यापन.
(4) सन 2020-21 ला विद्यार्थीनीची नवोदय पालघर येथे निवड.
शाळा आणि समाज हेच शाळा विकासाचे अभिन्न असे पैलू आहेत. जोपर्यंत शाळेत समाज येणार नाही व माझी शाळा म्हणून स्वीकारणार नाही तोपर्यंत शाळेचा विकास होणार नाही असे मला वाटते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील दुरावत चाललेलं नातं पुन्हा घट्ट होण्याची आज गरज आहे असे त्यांना शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी वाटते.
आज प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला आहे, त्यास शिक्षणक्षेत्रही अपवाद नाही. त्यामुळे ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्या प्रत्येकाने नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. तसेच फक्त पुस्तकातील ज्ञानावर भर न देता त्याचे उपयोजन करता आले पाहिजे. एक शिक्षक म्हणून आपण स्वतः जिज्ञासू राहून तीच जिज्ञासूवृत्ती आपल्या मुलांमध्ये निर्माण करता आली पाहिजे. असा सल्ला त्यांनी सर्व शिक्षकांना दिला.