S R Dalvi (I) Foundation

Tr. Seema Tayde

Tr. Seema Tayde

आज आपण शिक्षिका सीमा कृष्णकांत तायडे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास जाणून घेणार आहोत. श्रीमती सीमा या मुंबई मालाड येथे राहत असून यांचे शिक्षण एम. ए. एम. एड.पी.एच.डी. फेलो. झाले आहे. त्या गेली ३३ वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आणि सध्या त्याबई पब्लिक स्कूल मालवणी व्हिलेज मराठी या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत.

माझे प्राथमिक शिक्षण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत झाले.त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती काळे मॅडम आमच्या सर्वात प्रिय बाई होत्या. इतक्या प्रेमळ, शिस्तप्रिय ,अध्यापन कुशल अशा बाई आम्हाला त्या काळात लाभल्या. त्यांना पाहूनच मी इयत्ता चौथी मध्येच निश्चय केला होता की, मी पुढे जाऊन आमच्या प्रिय बाईंसारख्याच शिक्षिका होणार. आमच्या आदरणीय बाईचा ज्ञानदानाचा वसा मी सुरू ठेवला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि अभिमान आहे मी एक शिक्षक असल्याचा.

शिक्षक एक अभिनेता असतो. अध्यापनादरम्यान त्याला विविध भूमिका वठवाव्या लागतात. जसा विद्यार्थी तसेच शिक्षकाला अभिनय करावा लागतो. वर्गातील सारेच विद्यार्थी समान बुद्धिमत्तेचे, समान विचारसरणीचे आणि समान कौटुंबिक तसेच सामाजिक अधिष्ठान असलेले नसतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे आचरण हे वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे असते. काही विद्यार्थी शांत, अबोल, शिस्तप्रिय, नम्र असतात तर काही त्याच्याच विरुद्ध अतिशय चंचल, धांदरट, अस्थिर असतात. काही अभ्यासात कुशाग्र असतात ,तर काही संथगती. काही विद्यार्थी मनापासून अभ्यास करतात, तर काही विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्लृप्त्या करून अभ्यासाकडे घेऊन जावे लागते. रंजक पद्धतीने किंवा खेळाद्वारे अशा विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहण करण्यासाठी प्रेरित करावे लागते. अभ्यास म्हटलं हे विद्यार्थी दूर पळतात. पण तेच विद्यार्थी खेळायला जायचे, प्रयोग करायचे उपक्रमात भाग घ्यायचा आहे,असे म्हणताच उड्या मारायला लागतात. प्रत्येकाच्या अंगचे कौशल्य देखील वेगवेगळे असते. कोणी चित्रकलेत तरबेज असतं, कुणाचं हस्तकौशल्य अप्रतिम असतं,तर कोणी नृत्यात पारंगत असतं .कुणी गजरे विण्यात निपुण असतं, तर कोणी आकाशकंदील तयार करण्यात कुशल असतात. याच विद्यार्थ्यांचा कलागुणांचा शोध घेऊन त्यांच्या पद्धतीने त्यांना अभ्यासात आणि कौशल्यसंपादनात व्यस्त ठेवावे लागते .आणि हीच शिक्षकाची खरी कसोटी असते.

विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याच वाटेवरून विद्यार्थी जातील असे आदर्श जगात फार तुरळक आहेत. असे आदर्श विद्यार्थ्यांपुढे असणं ही काळाची गरज आहे. आताच्या युगात हेच आदर्श विद्यार्थ्यांना आपल्या अवतीभवती सापडत नाहीत त्यांचे शिक्षक त्यांचे पालक हेच त्यांचे आदर्श असतात, आणि जे आदर्श व्यक्तिमत्व आहेत, ती व्यक्तिमत्व त्यांच्या संपर्कात नाहीत, मग अशा आदर्श व्यक्तिमत्त्वांना शाळेत आमंत्रित करणे, त्यांचे व्याख्यान ठेवणे, त्यांचे विचार ऐकवणे या कृतीद्वारे विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक होण्यात प्रेरित करता येते. आताच्या या डिजिटल युगात छोट्या छोट्या व्हिडिओद्वारे क्लिप द्वारे हे करणे सहज शक्य होते.

खरं पाहता महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक हे शिक्षणाबाबत फारसे जागृत नसतात, त्यांचे कौटुंबिक प्रश्न, त्यांचे अर्थार्जनाचे प्रश्न हे त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणापेक्षा अधिक महत्त्वाचे असतात. त्यामुळे एकदा का विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले की, त्यांची जबाबदारी संपते, मग आम्ही शिक्षकच त्या विद्यार्थ्यांचे पालक होतो. जो विश्वास ते पालक आमच्यावर टाकतात त्या विश्वासाच्या बळावर आम्ही शिक्षक कार्य करत असतो. विद्यार्थ्यांबाबत कोणतीही तक्रार पालकांकडे केली तर ते फक्त एकच वाक्य म्हणतात, “बाई याला मारा”. म्हणजे जणू काही मारण्याने सगळे प्रश्न सुटून जातील. म्हणजे काय, सारी परिस्थिती हाताळायची ती फक्त शिक्षकांनी. अभ्यासाच्या बाबतीत पालकांचे सहकार्य म्हणावे तितके मिळत नाही, पण याच पालकांशी सामोपचाराने, प्रेमाने, समजुतीने घेतल्यास आपले बरेच प्रश्न सोपे होतात. प्रत्येक महिन्याला पालक सभा घेऊन, बऱ्याचदा फोन करून अशा पालकांच्या संपर्कात राहावे लागते, जेणेकरून त्यांना आपला कामधंदा सोडून सभेला येता येऊ नये. आम्ही शिक्षक पालकांच्या बऱ्याच समस्या ऐकून घेतो ,त्यांना समजून घेतो, त्या समस्येवर एखादा उपाय असल्यास तोही त्यांना सुचवतो. ते पालक आम्हा शिक्षकांनाच भला मार्गदर्शक मानतात. त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करावा यासाठी आम्हा शिक्षकांचा अटोकाट प्रयत्न असतो.

आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक शिक्षकांनी तंत्रस्नेही असावेच लागते .यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शिक्षकाला एम. एस .सी. आय. टी.परीक्षा अनिवार्य केली आहे. जेणेकरून शिक्षकाला आपल्या दैनंदिन अध्यापनात तंत्रज्ञानाचा किमान वापर करता यायला हवा. या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची निकड जाणवली ती कोरोना काळात. ऑनलाईन अध्यापन करताना तंत्रज्ञानाचा वापर करता यावा यासाठी वेगवेगळे ऑनलाईन प्रशिक्षण मी स्वतः घेतले. त्यामध्ये व्हिडिओ तयार करणे, गुगल शीट तयार करणे, स्वतः तयार केलेले व्हिडिओ युट्युब वर अपलोड करणे, झूम मीटिंगच्या लिंक तयार करणे, या साऱ्या गोष्टी मला नवीन होत्या तरीही त्या शिकणे क्रमप्राप्त होते. आणि ते मी चांगल्या प्रकारे केले. त्यामुळे कोरोना काळात देखील माझ्या वर्गातील शंभर टक्के विद्यार्थी माझ्या संपर्कात राहिले, हे मी अभिमानाने सांगते. माझा आठवीचा वर्ग असल्या कारणाने वर्गातील मुले या तंत्रज्ञानाच्या वापरात फार हुशार आहेत. माझे तीन विद्यार्थी संगणक क्लास करून तरबेज झालेले आहेत. त्यामुळे स्मार्ट टी.व्ही. चा वापर हे विद्यार्थी अगदी सहजरित्या करतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे edu. चॅनल हे अध्यापनाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. फक्त अध्यापनच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या गुण नोंदी करणे, वेगवेगळ्या शीट्स भरणे यासाठी देखील तंत्रज्ञानाची फार मदत होते. आम्हा शिक्षकांचे बरेचसे लेखी काम त्यामुळे सहज आणि सुलभ होते.

शिक्षण क्षेत्राने एक शिक्षिका म्हणून खूप समाधान दिले आहे. अनेक पिढ्या घडवल्याचे समाधान. माझे बरेच विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. यातील काही परदेशी स्थायिक झालेले आहेत. जेव्हा विद्यार्थी फोन करून त्यांची खुशाली कळवतात त्यावेळी झालेला आनंद हीच सर्वात मोठी Achievement आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग 2021-22 चा आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री आदरणीय श्रीयुत केळुसकर यांच्या हस्ते स्वीकारताना विद्यार्थ्यांचे चेहरे समोर आले.स्वतः शिक्षिका असल्याचा कृतार्थ अभिमान वाटला.

काम करताना असे बरेच प्रसंग आहेत , ते विसरता येणे अशक्य आहे. यातील एक विशेष अविस्मरणीय प्रसंग म्हणजे कोरोना काळात केलेली कामगिरी. ऐन कोरोनाच्या भयावह परिस्थितीमध्ये ‘करोना योद्धा’ म्हणून कामगिरी पार पाडावी लागली. न घाबरता संपूर्ण मे महिना ही कामगिरी बजावली. शिक्षक म्हणून या कार्यात देखील आपण आपला सहभाग नोंदवला याचा अभिमानच आहे.

Scroll to Top