S R Dalvi (I) Foundation

Tr. Sharada Sonavane

Tr. Sharada Sonavane

आज आपण श्रीमती शारदा लक्ष्मणराव सोनवणे[M.A. B.Ed, DSM]  यांच्या शिक्षिका प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्रीमती शारदा या पैठण जि.औरंगाबाद येथे राहत असून गेले 29 वर्ष त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
सध्या त्या जि. प. उच्च प्रा. शाळा गेवराई बाशी, केंद्र-ढोरकीन ता. पैठण येथे प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. हिरव्यागार वनराईने बहरलेला शालेय परिसर, चांगली गुणवत्ता व अपूर्व विज्ञान प्रयोगशाळा या मुळे त्यांच्या शाळेला एक विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.

दहावी नंतर डी. एड व पुढे निवड मंडळाच्या परीक्षेद्वारे जि. प. शिक्षिका होण्याचा त्यांचा हा आनंददायी प्रवास सन 1993 पासून सुरू झालेला आहे. तत्पूर्वी त्यांनी एका संस्थेतील शाळेमध्ये शिक्षक ते मुख्याध्यापक पदाचा अनुभव घेतला व  पुढे तो खूप कामी आला.

शिक्षक म्हणून 29 वर्ष काम करताना, त्यांचा एकच मूलमंत्र राहिला तो म्हणजे “ विद्यार्थी माझे दैवत व त्यांचे हित जोपासणे माझे कर्तव्य” या उक्तीने काम करताना बरीच सेवा MIDC एरिया, शहरी भागात त्यांनी केली. इथे येणारे विदयार्थी हे झोपडपट्टी, व्यसनी, व कौटुंबिक पार्श्र्वभूमी खूप खराब असणारे असायचे. भूकेची आग शमवण्यासाठी शाळेत येणाऱ्या हया मुलांमध्ये ज्ञानाची लालसा निर्माण करणं हे एक आव्हान असायचं. तेव्हा त्यांना अभ्यासाची गोडी लागावी , त्यांच्यात नैतिक मूल्ये रुजावी यासाठी कला, कार्यानुभवा सोबत अनेक सहशालेय उपक्रम त्यांनी राबवले.
किमान त्यांनी वाममार्गाला न जाता, एक चांगला नागरिक म्हणून जीवन जगावे एवढी अपेक्षा त्यांनी ठेवली. यातील अनेक विद्यार्थी आज छोट्या-मोठ्या पदावर काम करत आहेत. आनंदाची  एक गोष्ट म्हणजे यातील एक विदयार्थी डाॅक्टर झाला. त्याने कुणाकडून तरी त्यांचा मोबाईल नंबर मिळवला व त्यांना फोन केला,त्यावेळी मी वर्गात शिकवत होते. मॅडम ओळखलं का ? मी जॉन बोलतोय…… सातवी नंतर ते एम.बी.बी. एस पर्यंतचा त्याचा प्रवास त्याने त्यांना सांगितला त्यावेळेस त्यांचा त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता.
खूप गहिवरून आले आणि अश्रूंचा बांध फुटला. माझ्या डोळ्यासमोर त्याचे म्हातारे वडील भांडी धूणे करणारी, फार अजागळ राहणारी, त्याची आई,त्याचे कपड्याच्या तंबूचे घर दिसू लागले. माझ्या वर्गातील विद्यार्थी माझ्या कडे कुतुहलाने पाहू लागले. मुलांना त्यांनी जॉनचा हा प्रेरणादायी प्रवास सांगितला. विदयार्थी व शिक्षकात जिद्द असेल तर चिखलात ही कमळ कसे फुलते. याची त्यांना प्रचिती आली.

औरंगाबादेतील डायट संस्थेकडून इंग्रजी साहित्य पेटीच्या कृती युक्त संकल्पना दाखवणाऱ्या व्हिडीओ मध्ये विदयार्थ्यांसह सहभाग घेण्याची संधी त्यांना मिळाली तसेच ” तेजस” उपक्रमातंर्गत कर्नाटक राज्यातील अभ्यास पथकाने इंग्रजी अध्यापनाचे वर्ग निरीक्षण करून त्यांचे कौतुक केले गेले.
शिक्षकाचे विदयार्थ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असावेत. आपल्या कौशल्याने विद्यार्थ्यांची मन जिंकून  त्यांच्यात हवा तो बदल शिक्षकाला करता आला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या या युगात शिक्षकाने सदैव update असायला हवे असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.

Scroll to Top