आज आपण श्री.श्रीधर रघुनाथ जोशी (बी.एस्सी एम.ए.बी.एड् डी.एस. एम) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रीधर सर हे चिपळूण येथे राहत असून गेले ३० वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्य करत आहेत. सध्या ते दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल तिवरे ता.चिपळूण जि.रत्नागिरी या शाळेत कार्यरत आहेत.
श्रीधर सरांच्या मूळ गावी त्यांच्या घरी प्राथमिक शाळेतील शिक्षक गुरुवर्य श्री.जिनेंद्र आप्पा कर्नाळे गुरुजी राहायला होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाचही भावंडे सातवी उत्तीर्ण झाली व पुढे शिकत-शिकत पदवी व काहीजण पदव्युत्तर झाली. त्यांच्या सख्या दोन बहिणी ,आत्याच्या दोन मुली प्राथमिक शिक्षिका होत्या, म्हणून सरांना या पेशाची आवड निर्माण झाली. बी.एस्सी शेवटच्या वर्षात निरोप समारंभात त्यांना विद्यार्थी मनोगत म्हणून बोलायचे होते कारण शिकवलेल्या सर्व गुरुजनांबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी होती पण तेव्हा ते धाडस करुन व्यासपीठावर गेले नाहीत त्यावेळी त्या सर्व सरांच्या प्रती असलेला आदर पाहून आपणही कुठल्यातरी विभागाचे शिक्षक व्हावे असे वाटले. वास्तविक त्यांना प्राथमिक शिक्षक व्हायची मनापासूनची इच्छा होती पण त्यावेळी डी.एड्चा प्रवेश मेरिटनुसार असायचा त्यांना 60.50 %गुण होते प्रवेश मिळाला नाही मग बी.एस्सी करुन बी.एड्.केले व माध्यमिक शिक्षक झाले.
१० वी ,१२वी च्या गुणांवर डी.एड् .ला प्रवेश मिळाला नाही त्यामुळे ते स्वतःवरच नाराज होते. गणित -सायन्स या विषयाची आवड असल्याने बी.एस्सी.(रसायनशास्त्र) त्यांनी पूर्ण केले. एक वर्ष लिओ बॅटरी कंपनीत Quality Control व नंतर Assistant Chemist म्हणून त्यांनी नोकरी केली.पण त्या नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. सरांच्या मनामध्ये शिक्षक होण्याची आस जागृत होती. त्यामुळे ते व त्यांचा मित्र दोघेजण बी.एड्. कॉलेजमध्ये जावून आले. यथावकाश त्यांना प्रवेशही मिळाला. प्राथमिक नाहीतर माध्यमिक शिक्षक होण्यासाठी प्रवेश मिळाला व पदवी प्राप्तीनंतर कोकणभूमीत ते आले .
त्यांच्या नोकरीचे गाव म्हणजे ‘ तिवरे’ गाव होय. इथले निसर्गसौंदर्य ,ग्रामस्थांचे प्रेम,आपुलकी ,पाठबळ,विद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रसन्न चेहरे पाहून त्यांनी तिवरे विद्यालय हीच त्यांची कर्मभूमी मानली व तेथे ते टिकून राहिले.आज या यशस्वी प्रवासाला ३० वर्षे पूर्ण होत आहेत.
३० वर्षात असे अनेक सुखद,अनुभव आले. त्यांची शाळा सन 1984 साली सुरु झाली व ते 1992 साली नोकरीस लागले. इ.10 वीचा सरासरी निकाल 25%च्या खाली असल्याने हे विद्यालय अनुदानित व्हायला 9 वर्षे लागली. मार्च 1993 मध्ये त्यांची शाळा अनुदानित झाली.
मार्च 1995 बॅचचा निकाल 62.50% लागला व त्या बॅचचा विद्यार्थी कुमार-प्रितम प्रताप शिंदे याला माइया भूमिती विषयात 74/75 गुण प्राप्त झाले व एकूण गणितात147/150 गुण मिळाले तो पहिला अविस्मरणीय क्षण त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर 1999साली 90%निकाल लागला व 2000 साली 100%निकाल लागला तो दुसरा अवर्णनीय क्षण. 10वेळा 100%निकालाची व 14वेळा 90%पेक्षा जास्त निकालाची शाळा असा त्यांच्या शाळेचा नावलौकिक आहे.
पहिले विज्ञानातील बक्षीस,पहिला शिक्षक म्हणून मिळालेला पुरस्कार, व सर्वच उपक्रमात मिळालेले यश सारेच अविस्मरणीय असे आहे.तिवरे धरण फुटीच्या पार्श्वभूमीवर तिवरे विद्यालयाला मिळालेला 25 लाखाचा भरीव निधी, त्यामुळे आज हे त्यांचे विद्यालय स्वयंपूर्ण असे उभे आहे.
30 वर्षाच्या टप्यात सरांनी शाळेला 25 लाख रुपये मदत मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.त्याला अनुसरुन संस्थेकडून त्यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून यथोचित गुणगौरव करण्यात आला,त्यांना अनेक तालुका,जिल्हा, व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षक संघटना,विषय संघटनेमध्ये कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली. एक विषय शिक्षक म्हणून नाही तर सर्वव्यापी शिक्षक म्हणून भूमिका करण्याची संधी प्राप्त झाली.
समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी पुढील बदल होण्याची गरज आहे असे त्यांना वाटते:
१) समाजात आजचे विद्यार्थी हे पूर्ण तंत्रस्नेही आहेत व होतील,मात्र त्यात शिक्षकांचेही Updation व्हायला हवे.
२) पूर्वी विद्यार्थी-शिक्षक हे नातं मोठया आदराचे व उच्च दर्जाचे होते ते या युगात थोडे वस्तुनिष्ठ व वास्तववादी झाले आहे.
३)शिक्षकांनी स्वतःला झोकून देवून ज्ञानदानाचे पवित्र काम केले पाहिजे.
‘न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने’ याचा अभ्यास करुनच या क्षेत्रात यावे. किंवा अजानतेपणी का असेना या क्षेत्रात प्रवेश केला तर तर त्यात समर्पणाची भावना उच्च दर्जाची असावी. ||शिक्षक-तितुका मेळवावा,शिक्षण धर्म वाढवावा.||अशी भूमिका नवशिक्षकांची असायला हवी असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला आहे