नमस्कार मी सुदेश रघुनाथ कदम (B.Sc M.A. M.Ed D.S.M) मी कोकण किनार पट्टी लगतच्या गुहागर तालुक्यातील जामसुत या गावी सर्वोदय शिक्षण मंडळ,मुंबई संचालित; सरस्वती विद्या मंदिर जामसुत या प्रशालेमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून गेली 25 वर्षे कार्यरत आहे .माझी शाळा ग्रामीण भागात असून परिसरातील विद्यार्थ्याना गेली 55 वर्षांहून अधिक काळ ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरतपणे करीत आहे.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
अगदी प्रामाणिक पणे सांगायचं तर शिक्षक व्हावं अस लहानपणी कधी वाटल्याच मला आठवत नाही. माझे वडील महाराष्ट्र शासनाच्या कोयना धरण प्रकल्पाच्या पाटबंधारे विभागात कार्यरत होते. वडिलांची शासकीय सेवा असल्याने दर दोन-तीन वर्षांनी त्यांची बदली होत असे .साहजिकच माझी शाळाही बदलत असे .प्रत्येक वेळी नवीन शाळा नवीन शिक्षक आणि नवीन वर्ग मित्र यासगळ्यामुळे बालवयातच प्राप्त परीस्थितीशी समायोजन करणे, मिळत जुळते घेणे मला जमू लागले होते ज्याचा फायदा मला पुढे माझ्या शिक्षक म्हणून व्यावसायिक वाटचालीसाठी उपयुक्त ठरला .
मी नववीला असताना वडिलांची बदली चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे झाली . खऱ्या अर्थाने माझी वैचारिक जडणघडण याच ठिकाणी झाली. शालेय शिक्षणानंतर मी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. काही काळ लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असे वाटत असताना पदवीनंतर B .Ed साठी प्रवेश घेतला याच काळात मी शिकवणी घेत होतो विद्यार्थ्यांना शिकवत असतानाचा आनंद उमगत होतो तेव्हाच पुढील आयुष्यात आपण शिक्षक म्हणूनच कार्य करायचे अगदी निश्चित झाले होते.
सुरुवातीला शिक्षक हे क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
नाही अडचण अशी आली नाही कारण माझे वडील शासकीय सेवेत असल्याने आणि माझीही बौद्धिक क्षमता चांगली असल्याने साहजिकच त्यांना अपेक्षित होत मी शासकीय अधिकारी व्हावं पण मला माझे करियर पूर्णता उमगले होते . मला मनापासून शिक्षक व्हायचे आहे हे लक्षात आल्यावर वडिलांनी पूर्ण पाठिबा दिला .आणि माझ्या निर्णयाच कौतुकही केले
शिक्षक म्हणून 25 वर्षाच्या प्रवासातील असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय आहे
25 वर्षाच्या या दीर्घ कालावधीतील अनेक प्रसंग आहेत त्यातील काही अनुभव सांगायला निश्चितच मला आवडेल. यामध्ये सातारा येथे संपन्न झालेल्या शिक्षण परिषदेचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय .कारण या परिषदेमध्ये मला रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि शिक्षण सचीवांसमोर विषयाचे सादरीकरण करता आले .शिक्षण क्षेत्रातील दिग्गजासमोर संधी मिळण,कौतुक होण हे शिक्षक म्हणून नक्कीच अविस्मरणीय आहे .
विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,अंतराळ वीर, शास्त्रज्ञ,समाजसेवक यांच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन,विद्या प्राधिकरण पुणे, राज्य विज्ञान संस्था नागपूर आंध्रप्रदेश कुप्पम, मध्यप्रदेश भोपाळ या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी मिळालेली संधी शिक्षक म्हणून अनुभव समृद्ध करत होते हे सर्व प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत.
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग ,विज्ञान नाट्य स्पर्धेत सहभाग व यश ,शिक्षकांसाठीच्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत माझे टेबल टेनिस खेळातील प्रथम क्रमांकाचे यश या यशासाठी माझ्या संस्थेचे चेअरमन यांनी रोख बक्षिसासह केलेले कौतुक .या सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या या प्रवासतील अविस्मरणीय आहेत.
तुमची आतापर्यंतची मोठी achievement कोणती?
– नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई याठिकाणी सलग दोन वर्षे अन्वेषणा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा सहभाग आणि एकदा यश संपादन.
– नुकतीच एस आर दळवी फाउंडेशन च्या रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.
यासगळ्या सोबत माझे विद्यार्थी जे समाज हिताचे राष्ट्र विकासाचे कार्य करत आहेत त्याच आदराच्या भावनेन माझ्याशी असलेला शाळेतला स्नेह जोपासत आहेत. असे प्रसंग, अशा घटना, असे विद्यार्थी या कारकिर्दीतील achievement आहेत.
समाजात शिक्षक- विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे?
शिक्षक हा विद्यार्थी केंद्री असावा व विद्यार्थी हा ज्ञान केंद्री असावा. दोघातील संबंध हे मैत्रीपूर्ण असावेत. बदलत्या काळाला सामोरा जाणारा विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकाने आधुनिक तंत्रज्ञान अध्यापनाची तंत्रे आत्मसात करणे गरजेचे आहे. विद्यर्थ्यानीही आपल्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील रहाणे गरजेचे आहे .
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल ?
शिक्षक हा राष्ट्र निर्मितीचा महत्वाचा घटक आहे .त्यामुळे सदैव जबाबदारीचे भान ठेऊन नव-नवीन कल्पनांचा अवलंब करून,दृक श्राव्य माध्यमाचा वापर करून,शिक्षण आनंददायी करण्यासाठी प्रयत्नशील असणारा व सकारात्मक दृष्टीकोन असणारा हवा तरच डॉ कलाम याच्या कल्पनेतील भारताची निर्मिती होईल आणि सुजाण व सदृढ पिढी घडेल.