S R Dalvi (I) Foundation

Tr. Sunil Deshmukh

Tr. Sunil Deshmukh

आज आपण श्री सुनिल अशोकराव देशमुख (MA (Marathi, History) and M. Ed) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सुनिल सर हे पालघर येथे राहत असून त्यांना शिक्षण क्षेत्रात १३ वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते जि.प. उच्च प्राथमिक शाळा कोटबी बुजडपाडा पालघर या शाळेत मुख्यध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

सुनील सरांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या शाळेविषयी थोडक्यात परिचय दिलेला आहे.

अरबी समुद्रापासून पूर्वेकडे साधारणतः १२ किमी अंतरावर वसलेल्या डहाणू तालुक्यातील संपूर्णपणे आदिवासी बहुल असलेला भाग , डोंगराळ व दुर्गम परिस्थिती वर मात करून जिल्हा परिषद पालघर, विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती , ग्रामपंचायत व लोक सहभाग यांच्या माध्यमातून चरी कोटबी ग्राम पंचायती मधील कोटबी आवारपाडा या पाड्यावर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोटबी बुजडपाडा या शाळेने शिक्षणाची ज्ञानगंगोत्री पाड्यावर वसवलेली आहे. ४ मार्च १९५७ रोजी सुरु झालेला शाळेचा प्रवास निरंतर चालूच आहे. शाळेने शासनाच्या विविध योजनांद्वारे, CSR फंडातून, विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले व शाळेच्या भौतीक गरजा पूर्ण करत गेले. थायासिन क्रूप व रोटरी क्लब माहिम, मुंबई यांच्या सौजन्याने अतिशय भव्य, प्रशस्थ व विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शाळेत शौचालय बांधून दिले.

त्यांच्या या शाळेमध्ये सर्व वर्गात प्रोजेक्टर , व्हर्च्यूअल क्लासरुम , विज्ञान प्रयोगशाळा , विद्याथ्यांचे दप्तर ठेवण्यासाठी लॉकर्स सुविधा, संगणक प्रयोगशाळा, वॉटर प्यूरीफायर ,गॅस कनेक्शन , मुबलक धान्य कोठ्या ,व्हाईट बोर्ड, क्रिडा साहित्य इ. भौतिक सुविधा उपलब्ध आहेत, तसेच शालेय विद्यार्थ्यांना गणवेश ,ID कार्ड, शुज तसेच मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व मदतनिस यांना देखील ।D कार्ड आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण , भौतिक सुविधा, शिक्षकांची मेहनत , वरिष्ठांचे मार्गदर्शन , विविध सामाजिक संख्यांची मायेची थाप व शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांची साथ यामुळे जिल्ह्यात  ISO मानांकनाचा बहुमान पटकावणारी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोटबी बुजडपाडा पहिली शाळा ठरली आहे. तसेच NPGEL अंतर्गत तालुका आदर्श शाळा पुरस्कार , तंबाखू मुक्त शाळा पुरस्कार असे विविध मानांकने या शाळेने भुषवली आहेत.

स्वच्छ विदयालय पुरस्कार या भारत सरकारच्या पुरस्कार सोहळ्यात पालघर जिल्हया मधून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तसेच राज्य स्तरावर सादरीकरण केले आहे. यामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अदाणी फाऊंडेशन व अदानी डहाणू थर्मल पॉवर स्टेशनकडून शाळेस २ वर्गखोल्या व एक सभागृह असे तब्बल ४० लाख रुपये किंमतीचे बांधकाम बांधून देण्यात आले आहे. याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर श्री सिद्धाराम सालिमठ व अदानी ग्रूप चे श्री राजेंद्र नंदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
गुणवत्ता पूर्ण शिक्षण , क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश, विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती असणारी आस्था , शिक्षकांची मेहनत , विद्यार्थ्यांप्रति प्रेम, शालेय स्वच्छता , वृक्षलागवड व संवर्धन , परसबाग , यामुळे ही शाळा वैशिष्ट्यपूर्ण आहे.

मदतनिसांच्या मेहनतीमुळे फुलणारी परसबाग , दैनंदिन शाळेची स्वच्छता , रुचकर पोषण आहार बनवणे , किचन व शौचालयाची नित्य नियमित स्वच्छता यामुळे या शाळेला एक वेगळ रुप मिळाले आहे . त्यांच्या मेहनतीने शाळेला जीवंतपणा आला आहे. ज्या प्रमाणे अडथळ्यावर मात करून फिनिक्स पक्षी आकाशात उंच भरारी घेतो त्याचप्रमाणे जि. प.उच्च प्राथ. शाळा कोटबी बुजडपाडा शाळेने अडथळ्यांवर प्रशासकिय अधिकारी , ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मात करत हे यश संपादन केले आहे. पुढे शाळा इयत्ता १२ वी पर्यत नेण्याचा सर्व शिक्षक , ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीचा मानस आहे. तो नक्की पूर्ण होईल यात तिळमात्र शंका नाही.

English Marathi