आज आपण शिक्षक श्री.सुनिल देवराम कदम (एम्. ए. बी.एड.) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. सुनिल सर हे विरार येथे राहत असून त्यांना अध्यापनाचा एकूण ३२ वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते छबिलदास हायस्कूल, दादर येथे कार्यरत आहेत .
मला शिक्षक व्हावेसे वाटले :
मी रत्नागिरी जिल्ह्यातील “कुचांबे” या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्या व दुर्गम खेड्यात इ.७ वी पर्यंत शिक्षण घेतले. लहानपापासून शिक्षणाची प्रचंड आवड. त्यामुळेच की काय सहा गावांची मिळून होणाऱ्या केंद्र परीक्षेत सहा गावात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण (पास) झालो, अर्थात यास शिक्षकांचे मार्गदर्शन सुद्धा तितकेच महत्त्वाचे होते.
शिक्षण घेत असताना माझ्यासमोर आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे शाळेतील सर्व शिक्षक व गावचे ग्रामसेवक. यांचे राहणीमान, त्यांना मिळणारा आदर मान-सन्मान पाहून मलाही वाटे की आपण सुद्धा मोठे होऊन शिक्षक किंवा ग्रामसेवक झाले पाहिजे.
आमच्या खेडेगावात त्यावेळी आमच्याच पालकांना माहिती नसायचे की आपला मुलगा किंवा मुलगी कोणत्या इयत्तेत शिकत आहेत तिथे आम्हाला मोठ्या करियरची स्वप्ने कोण दाखवणार? त्यामुळे डॉक्टर, इंजिनिअर, प्रशासकीय अधिकारी होण्याची स्वप्ने आम्ही कधी पाहिलीच नाही किंवा त्या संदर्भात मला शालेय स्तरावर किंवा समाजात कोणीच मार्गदर्शन केले नाही. लहानपणी पाहिलेले शिक्षक होण्याचे स्वप्न माझे २१ व्या वर्षी पूर्ण झाले आज मी या पेशात पूर्ण समाधानी आहे.
ज्या विद्यार्थ्यांना शिकवणे कठीण वाटते अशा विद्यार्थ्यांना याप्रकारे हाताळतो :
ज्या विद्यार्थ्यांचा मूलभूत पाया कच्चा असतो त्याला शिकणे ही प्रक्रिया फारच क्लिष्ट व कंटाळवाणी वाटते. त्यावेळी अशा मुलांना आईचे मायेने न ओरडता ” वाचन, लिखाण, जोडाक्षरे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या अध्ययनाच्या मूलभूत संकल्पना समजावून सांगाव्या लागतात तेंव्हाच त्यांना अभ्यासाची गोडी वाटते.
ज्या विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक समस्या असतात त्यांना शिकवताना सुद्धा शिक्षकांचा कस लागतो, काहींना आई वडील नसतात, काहींचे पालक व्यसनाधीन असतात, आई – वडिलांचा घटस्फोट असतो, फुटपाथवर राहणारे, गलिच्छ वस्तीत राहणारे विद्यार्थी व्यसनाच्या अधीन गेलेले विद्यार्थी, यांना बालमानस शास्त्रीय दृष्टिकोनातून समुपदेशन करतो, पालकत्वाच्या नात्याने त्यांना धीर देऊन, आधार देऊन, काही वेळेला आर्थिक मदत करून पालकांचे समुपदेशन करून तू किती सक्षम आहेस, तू किती हुशार आहेस, तू हे सहज करू शकतोस तुझ्यात हे गुण आहेत ही कौशल्ये आहेत तु जीवनात नक्कीच यशस्वी होऊन नाव मिळवशील असा आत्मविश्वास निर्माण करतो. त्यांच्या सतत संपर्कात असतो. आपलंच मुल समजून त्यांना शिकवतो.
विद्यार्थ्यांना प्रेरित करतो :
प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक मूल हे खास असते. प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते विशेष गुण, कौशल्य असते, त्याचे ते गुण हेरून त्यांचे कौतुक करतो. त्यांना प्रोत्साहन देतो. त्यांच्या कला – गुणांना शाळेतील विविध उपक्रमांच्या माध्यमातून संधी देतो, कला, क्रीडा, वक्तृत्व यात सहभागी करून त्यांना मार्गदर्शन करून प्रेरित करता येते. शिवाय अनेक थोर नेते, शास्त्रज्ञ, लेखक , विचारवंत, समाजसेवक, प्रसिद्ध गायक, खेळाडू यांच्या जीवनातील संघर्षाचे दाखले, उदाहरणे देऊन मी त्यांना प्रेरित करतो सकारात्मक गोष्टी शिकवतो.
पालकांशी संपर्क व संवाद :
विद्यार्थांच्या प्रगतीत पालक – शिक्षक यांच्या समन्वयाची नितांत गरज असते, विद्यार्थ्यांबद्दल विशेष सखोल माहिती पालकांना माहिती असते तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती शिक्षकांना असते त्यामुळे पालकांशी माझे संबंध खूपच चांगले आहेत पालकच मला येऊन सांगतात की आमची तुमच्याविषयी, तुमच्या शिक्षणाविषयी खूपच आस्थेने व आदराने बोलतात कित्येक पालक मला भेटून किंवा फोन करून माझ्या मुलाने कोणत्या करीयरच्या क्षेत्रात गेले पाहिजे याविषयी चर्चा करतात. जरी विद्यार्थी १० वी पास होऊन गेला तरी मी विद्यार्थी व पालकांच्या संपर्कात असतो.
अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर :
आमच्या प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर आहेत त्याचा आम्ही वापर करतो, कधी-कधी स्वतः अध्यापनाचचे व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना मोबाईलवर शिकवतो. त्यासाठी यु. ट्युब, गूगलमिट, झूम ॲप, टीम ॲप इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करतो.
शिक्षण क्षेत्रातील माझी अचिव्हमेंट :
३२ वर्षाच्या सेवेत हजारो विद्यार्थी शिकून गेले कित्येक डॉक्टर , वकील, अभिनेते , शिक्षक , प्राध्यापक, व्यावसायिक झाले. १३ वर्षे शारीरिक शिक्षण हा विषय शिकवला त्यात सलग १२ वर्षे ॲथलेटीक्स व कुस्ती मध्ये मुंबई जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी या शासकिय स्पर्धेत शाळेला चॅम्पियनशिप मिळवून दिली, कब्बडी, खो-खो, हँडबॉल, फुटबॉल , ॲथलेटीक्स या सर्व खेळात विद्यार्थांना सहभागी करून शाळेला घवघवीत यश मिळवून दिले, क्रीडा क्षेत्रात माझ्या शाळेचा दबदबा होतो, शिकडो विद्यार्थी राज्यस्तरावर जाऊन खेळले. दोन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘ शिवछत्रपती पुरस्कार ‘ मिळाला. जिल्हा , राज्यस्तरीय राष्ट्रीय पातळीवरील प्रमाणपत्रामुळे शेकडो विद्यार्थी पोलिस खात्यात भरती झाले तर अनेक जन खेळाडू म्हणून रेल्वे, बँकेत कामाला राहिले. शाळेला दोन वेळा अनुदान मिळवून दिले त्यात शाळेची व्यायामशाळा उभारली.
शिक्षण प्रवासातील अविस्मरणीय अनुभव :
शारीरिक शिक्षक म्हणून मी दरवर्षी १०० मुलांचे लेझिम पथक तयार करायचो त्यात स्वतः ताशावादन करून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत खेळवायचो. दोन वर्षे सलग मुंबई जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला. त्यामुळे शिक्षण संचलनातर्फे शाळेला बक्षीस मिळाले. शाळेचे नाव वृत्तपत्रात झळकले.
२० विद्यार्थ्यांचे मी योगासन पथक तयार करून बासरीच्या धूनवर योगासादरीकरण केले. महाराष्ट्रात बासरीवरील योगा हा पहिलाच प्रयोग मी केला, यामध्येही शासकीय योगासन स्पर्धेत शाळेला, वार्ड , झोन व संपूर्ण मुंबई जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला, हे दोन अनुभव फारच अविस्मरीय आहेत. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया , दुबई , कतार मध्ये नोकरीनिमित्त स्थायिक झालेले विद्यार्थी स्वताहून फोन करतात, मुंबईत आल्यावर येऊन भेटतात. आशीर्वाद घेतात. विद्यार्थ्यांचे प्रेम, आदर हेच आमचे पुरस्कार!