नमस्कार मी श्री सुनील आत्माराम साळुंखे (बी.ए .बीएड). मी गेले 23 वर्ष शिक्षक क्षेत्रात कार्यरत असून सध्या श्री पांडुरंग रुपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय शीर तालुका -गुहागर येते शिक्षक म्हणून कार्य करत आहे.
शिक्षक का आणि कधी व्हावेसे वाटले?
आमचे कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे. शेतामध्ये दिवसभर आई-वडील राबायचे. त्यांचे एक मित्र होते श्री आर आर पाटील जे शिक्षक होते. त्यांना भेटण्यासाठी जेव्हा त्यांचे माजी विद्यार्थी यायचे तेव्हा त्यातले बरेच जण उच्च पदावर अधिकारी असायचे. ते जेव्हा पहायचो तेव्हा असे वाटायचे की माझ्या सरांनी एक मोठे सामाजिक कार्य केले आहे एक मोठी पिढी घडवलेली आहे मग आपण का करू शकत नाही तेव्हाच मी ठरवलं की आपण शिक्षक व्हायचे. तेव्हा मी साधारण अकरावी-बारावी मध्ये होतो.
शिक्षण क्षेत्र निवडताना काही अडचणी आल्या का?
वडील शेतकरी असल्यामुळे घरची परिस्थिती गरिबीची होती अभ्यासाशिवाय आपल्याला पर्याय नाही हे तेव्हा पासूनच माहित होते त्यामुळे शेताची कामे करून अभ्यासाकडे लक्ष दिले. ग्रॅज्युएशन डिस्टिंक्शन मध्ये झाले, बीए फर्स्ट क्लास मध्ये झाले परंतु नोकरी शोधत असताना खूप त्रास व्हायचा माझ्या गावामध्ये एक शिक्षण संस्था होती तिथे काही शिक्षक पद भरायची होती तेव्हा मी ही त्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेलो परंतु एकाच वेळेला मी आणि माझा मित्र इंटरव्यूसाठी गेलो होतो त्याचे वडील गावचे पुढारी होते त्यामुळे त्याला कमी मार्क असूनही तिथे ते पद मिळाले. इथूनच जाहिराती बघणे, नोकरीसाठी वणवण सुरू झाली आणि ज्या गावांमध्ये आज मी 23 वर्ष शिक्षकीपेशा मध्ये नोकरी करतोय त्या गावांमध्ये पहिल्याच इंटरव्यू मध्ये मला नोकरी मिळाली आणि तिथून शीर महालक्ष्मी या गावाचे आणि माझे ऋणानुबंध जुळले. 1999 ते 2003 पर्यंत विनाअनुदानित शाळे वरती काम केले परंतू जिद्द आणि चिकाटी याच आधारे कुठेच कमी पडायचे नाही असे ठरवले आणि सतत शाळेचा निकाल शंभर टक्के दिला.
शिक्षक म्हणून 23 वर्षाच्या प्रवासातील काही अनुभव
माझी जनता शिक्षण संस्था शिर ही नेहमी आमच्या पाठीशी उभी राहते. माझी शाळा ग्रामीण व दुर्गम भागातील आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यासाकडे कसे वळवायचे यादृष्टीने रात्र अभ्यासिकेचे नियोजन करून सतत दहा वर्ष अभ्यासिका चालवली त्यासाठी सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत रात्र अभ्यासिका आणि दिवसभर शालेय शिक्षण याचे नियोजन केले.
गाव वाड्यावर त्यांचे व दुर्गम असल्याने गावांमध्ये दवाखाना नाही त्यामुळे विद्यार्थी आजारी पडला तर त्याचे पालक बनून आम्हीच त्या विद्यार्थ्यास जवळच्या गावातील हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्या वरती उपचार करून पुन्हा त्याच्या घरी नेऊन पालकांना काळजी घेण्यास सांगणे.
असाच एक प्रसंग सन 2019-20 या शैक्षणिक वर्षांमध्ये घडला होता. ऑगस्ट महिन्यातील गोष्ट आहे. विद्यार्थी मैदानावर क्रिकेट खेळत होती तेव्हा एका मुलाच्या हातून बॅट निसटली व पुढे असणाऱ्या मुलाच्या कपाळावरती जोराने आपटली मुलगा बेशुद्ध पडला पालकांना शाळेत बोलून घेतले लगेच चिपळूण येथील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये नेले तिथून काही तासात रत्नागिरीतील हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा तेथील काही लोकांनी पालकांना सांगितले की, शिक्षिका वरती पोलीस केस करा पण त्यावेळेला पालकांनी ठामपणे सांगितले की हे माझे शिक्षक आहेत तुम्ही फक्त उपचार करा आम्ही पाहतो काय करायचे. ही आजपर्यंत केलेल्या कामाची पावती होती.
तुमची सर्वात मोठी आतापर्यंतचे अचीवमेंट
शिक्षक म्हणून कार्यरत असताना वेळोवेळी सामाजिक व विद्यार्थ्यांसाठी वेग वेगवेगळे उपक्रम राबवणे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ, सुट्टीच्या कालावधीत संस्कार शिबिर वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून देणे कृतियुक्त अध्यापन करणे. हे कार्यक्रम करत असताना सामाजिक बांधिलकी जपणारे कोल्हापूरच्या क्रांतीसुर्य फाउंडेशनने मला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले हा सन्मान म्हणजे माझ्या शिक्षकी जीवनातील सर्वात मोठी अचीवमेंट आहे.
समाजात शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी अजून काय बदल होण्याची गरज आहे असे वाटते?
बदलत्या काळानुसार शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी खालील बदल व्हावेत असे वाटते
– बदलत्या काळानुसार अद्ययावत शिक्षण पद्धतीचा अवलंब शिक्षक व व विद्यार्थी यांच्यासाठी आवश्यक आहे. उदाहरणार्थ, ऑनलाईन शिक्षण पद्धती विविध तंत्रज्ञानांचा वापर यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
– तसेच सामाजिक मूल्ये व नैतिक मूल्य यांची जोपासना करणे हे शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक असावे.
– पाठ्यक्रमा व्यतिरिक्त सामाजिक आर्थिक व सामान्य ज्ञान यांची माहिती शिक्षक व विद्यार्थी यांना आवश्यक आहे.
– विद्यार्थी व शिक्षक यांचा कृतीयुक्त व सर्वांगीण कौशल्याधिष्ठित विकास होणे आवश्यक आहे
ज्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
देशाचे भविष्य शिक्षक घडवत असतात त्यामुळे तुमची वर्तणूक आदर्शवत हवी. तसेच कामाशी एकनिष्ठ व प्रामाणिक रहावे ज्यामुळे आदर्श विद्यार्थी पुढे जाऊन सुजान नागरिक होतील व आपला देश प्रगतीपथावर जाईल.