नमस्कार, माझे नाव श्री सुरेंद्र पांडुरंग यादव(शिक्षण – बी कॉम , डी एड). मी वैभववाडी, सिंधुदुर्ग चा असून माझं सर्व शिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं. १ ली ते ५ वी माझ्या गावी, ६ वी ते १० वी नवोदय विद्यालय सिंधुदुर्गला झालं.
माझ्या सर्व शिक्षणाचा भार माझ्या काकांनी उचलला. त्यांची इच्छा होती की आपल्या घरात आणि वाडीत एक तरी शिक्षक व्हायला हवा. कारण ते जाणून होते की शिक्षकाला समाजामध्ये मानाचं स्थान असतं आणि हा एकमेव पेशा असा आहे की तो माणसाला संस्कारित करतो. त्यामुळे त्यांच्या इच्छे खातर मी डी एड केलं.
सध्या मी जि प शाळा लोरे नं 1 , कणकवली येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. मला या क्षेत्रात 12 वर्षे झाली. या बारा वर्षात 3 जिल्हा परिषद शाळांमध्ये सेवा बजावली. यामध्ये ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील शाळा ही होत्या. शहरी भागातील पालक व विद्यार्थी अध्यापनातील तंत्रज्ञान वापराबाबत अधिक परिचित आढळले. याउलट ग्रामीण भागातील शाळांची परिस्थिती होती. पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात तंत्रज्ञानाची ओळख करून देताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद जास्त महत्त्वाचा वाटतो.
अध्यापन करताना तंत्रज्ञानाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे या मताचा मी आहे. ज्या ठिकाणी मुलांना प्रत्यक्ष अनुभव देता येत असेल तिथे तंत्रज्ञानाचा वापर करू नये असे मला वाटते.