आज आपण श्रीमती विद्या शालिग्राम गवई [M.A. D.Ed] यांच्या शिक्षिका प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्रीमती विद्या या औरंगाबाद येथे राहत असून गेले २२ वर्ष त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाटोदा. केंद्र-पंढरपूर, ता.जि.औरंगाबाद येथे काम करत आहेत.
देशाची सुसंस्कारीत पिढी घडविणारे, ज्ञान दानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षक. शिक्षक म्हणजे सामाजिक अभियंता, Social Engineer!!
त्यांना या क्षेत्राची ओढ होती, त्यांची आई प्राथमिक शिक्षिका होती, परंतु घरातील जबाबदारी, भावंडं या व्यापामुळे त्यांच्या आईला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आज त्या घडल्या आहेत ते त्यांच्या आईमुळेच. आईची स्वप्ने आज साकार झाली, पण दुर्दैव असे की,त्यांच्या मुलींचे हे कौतुक पाहण्यासाठी त्या आज या जगात नाही.
12वी ला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन त्यांचा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलडाणा येथे D.ed.ला नंबर लागला. त्यावेळी त्यांच्यापेक्षा ही त्यांच्या वडिलांना खूप आनंद झाला होता. आणि दुसरे असे की,अनु.जाती प्रवर्गातील मुलींमधून मेरीटनुसार त्यांचे पहिलेच Admission झाले. त्यावेळी त्यांच्या वडिलांना खूप अभिमान वाटला होता.
हे क्षेत्र निवडताना त्यांना काही अडचणी आल्या नाहीत. त्यांचे शालेय शिक्षण भारत विद्यालय बुलडाणा येथे झाले आहे. आणि त्यांच्या या शाळेनं त्यांना घडविले आहे. जीवन शिक्षण देणारी अशी ही त्यांची शाळा, आणि शिक्षकवृंद यांचा मोलाचा वाटा आहे.
शिक्षक म्हणून त्यांनी सर्व प्रथम धोडप,ता.चिखली,जिल्हा, बुलढाणा येथे कार्य केले, त्यानंतर जिल्हा बदलीने औरंगाबाद पंचायत समितीला त्या हजर झाल्या. याठिकाणी त्यांना केंद्रीय शाळा पंढरपूर येथे सेवा करण्याची संधी मिळाली. पंढरपूर हा जवळजवळ कामगार वस्ती असलेला भाग होता याठिकाणी येणारे पालक वेगवेगळ्या राज्यातील होते. पंढरपूरला असतांनाचा एक अनुभव त्यांना सांगावासा वाटतो, त्यांच्याकडे सहावी चा वर्ग होता.गजानन नावाचा एक विद्यार्थी, शाळेत दररोज उशिरा यायचा, कारण विचारले असता सांगायचा की, “मॅडम सकाळी मी चहाच्या टपरीवर कामाला जातो, आईला मदत व्हावी म्हणून स्वतः काम करून थोडीफार मदत करतो.” वडील वारल्यामुळे लहानपणापासून जबाबदारी स्वीकारत आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच होते. प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करून उभे राहण्याची ताकद, ती चमक त्याच्या डोळ्यांमध्ये त्यांनी पाहिली. जे खरचं जिद्दीने, मन लावून शिकले, ते आज यशस्वी झाले आहेत. आजही अनेक विद्यार्थी भेटायला येतात. तेव्हा त्यांना खरचं खूप अभिमान वाटतो.
कोरोना काळात शाळा बंद होत्या. या काळात मुलांसाठी “संस्कार सुमने” हा गोष्टींचा उपक्रम त्यांनी हाती घेतला होता. विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला समृद्ध करणारा हा उपक्रम. या उपक्रमाचे आतापर्यंत 565 भाग पूर्ण झाले आहेत. या मध्ये “सादाको आणि कागदी बगळे”ही जपानी भाषेतील अनुवादित, ह्दयस्पर्शी कथा, लातूर भूकंपाचा अनुभव कथन करणारी,धैर्याने भीषण परिस्थितीत तोंड देणारे शिक्षक आणि विद्यार्थी”नवी पहाट”ही कथा.डॉ. वीणा गवाणकर लिखित एक होता कार्व्हर… ही प्रेरणादायी कथा, अशा अनेक गोष्टींचा समावेश या उपक्रमात केलेला आहे.
समाजात वावरताना शिक्षकांविषयी काही जणांचे विचार आजही संकुचित आहेत असे वाटते. त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे त्यांना वाटते.शिक्षक म्हणून काम करताना असे अनुभव त्यांना आले आहेत . पुरस्कार मिळवण्यासाठी लोकं (शिक्षक)काम करतात असे म्हणणारे ही आहेत. ही एक खंत वाटते. शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या बंधूभगिनींना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.