आज आपण श्री. विजय बबन धामापूरकर (HSC D.Ed, B.A. B.Ed, DSM, M.A.) यांचा शिक्षक होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत. श्री. विजय यांचे मूळ गाव वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग असून गेली २३ वर्ष ते शिक्षक या क्षेत्रात आहेत. आणि सध्या ते जि.प.पू.प्रा.शाळा निवजे क्र. १ ता. कुडाळ,जि.सिंधुदुर्ग येथे पदवीधर शिक्षक या पदावर कार्य करत आहे. शिक्षक क्षेत्रात त्यांना अडचणींचा सामना करावा लागला असे नाही मात्र श्री विजय यांचे शिक्षण ग्रामीण भागात झालेले आहे तसेच आजचा आणि त्या वेळेचे काळ खुप वेगळा होता त्यामुळे शैक्षणिकसुविधेतील विविधता तेव्हा फार कमी असायची आणि माहितीचे स्त्रोत ही फार कमी असायचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण मामांच्या गावी तेंडोली ला झाले, माध्यमिक शिक्षण मराठी विद्यालय घाटकोपर मुंबई येथे झालेले आहे. 10 वी झाल्यावर विजय गावी आले मग कॉमर्स शाखेकडे त्यांनी प्रवेश घेतला. 12 वी झाल्यावर काय करायचे हेही त्यावेळी त्यांना फारसे माहित नव्हते. तेव्हा नातेवाईकानीडी एड ला फॉर्म भरायचा सल्ला दिला, त्यानंतर त्यांनी डी एड फॉर्म भरला आणि शिक्षण पूर्ण केले.
अविस्मरणीय प्रसंग/ क्षण:
*जुलै १९९८ ला वयाच्या २१ व्या वर्षी शिक्षक विजय नोकरीला लागले. त्या वेळी शिक्षक संमेलन व्हायची. शिक्षक आदर्श पाठ सादरीकरण करायचे. त्यावेळी त्यांना इंग्रजीचा आदर्श पाठ सादरीकरण करण्याची संधी त्यांना मिळावी अशी विनंती केंद्रप्रमुख यांचे कडे केली. त्यांनी देखील परवानगी दिली. ऑगस्ट च्या संमेलन मध्ये पाठ सादरीकरण करायचे होते, त्यासंमेलन मध्ये परिपाठात प्रार्थना गायन केले व लगेच इंग्रजीचा पाठ प्रत्यक्षमुलांवर केंद्रातील सर्व शिक्षकांच्या समक्ष उत्तम सादरीकरण केले, पूर्ण 30 मिनिटे इंग्रजीचा वापर केला. पाठ सादरीकरण व प्रार्थना गायन एकाच संमेलनात कोणतेही दडपण न घेता त्यांनी उत्कृष्ट केले, तेही अध्यापनाचा फारसाअनुभव नसताना त्या वेळी केंद्रप्रमुखांनी त्यांचे बरेच कौतुक केले ‘असे शिक्षक आपल्या केंद्रात आहेत ही आपल्या सर्व शिक्षकांना अभिमानास्पद बाब आहे’ हे विधान केंद्रप्रमुखांनी काढले.
*वेर्लेक्र १ ता.सावंतवाडी येथे त्यांच्या ४ वर्षाच्या नोकरीच्या कालावधीत ५वी च्या २ मुलींची निवड नवोदय परीक्षेसाठी झाली. २००२ साली क्रीडास्पर्धेमध्ये लांब उडी प्रकारात जिल्हास्तरावर शुभदा राऊळ हिने प्रथम क्रमांक पटकावला. तालुका स्तरावर कबड्डी संघ विजयी ठरलेला त्यात ती मुख्य रायडर होती. २०२१ मध्ये तीने शिक्षक विजय यांना फोन केला.’सर, मी क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळलीअसून कबड्डी ची मेम्बर आहे. माझे प्रेरणास्थान तुम्हीच आहात. मी माझ्या डायरीमध्ये माझे ग्रेट मोटीवेटर म्हणून तुमचेच नाव लिहिले आहे.’ असे तिचे शब्द आज ही विजय यांना आठवतात. त्या मुलीचा तिचा भाऊ परमानंद हा मुंबईत डॉक्टर आहे. शिक्षक विजय हे २०२१ च्या दिवाळी मध्ये त्याचा वाढदिवस होता तेव्हा त्याला भांडूप येथे भेटायला गेले होते .’सर, ५, ६,७ वीत असताना तुम्ही शिकवलेल्या मराठीच्या कविता अजूनही आठवतात, शिकवण्याच्या पद्धतीमुळे मीही कविता करू लागलो.’ असे उदगार त्याने विजय यांना बघून काढले. अश्या घटनांनी विजय यांचा उर अभिमानाने भरून येतो आणि शिक्षक म्हणून मिळालेले समाधान कशातच मोजता येत नाही असे ते म्हणतात. त्यांच्या बदलीच्या वेळी निरोप समारंभ असो किवा विद्यार्थ्यांचा निरोप असो अशा वेळी त्यांनी ग्रीटिंग कार्ड च्या माध्यमातून व भाषणातून व्यक्त केलेली भावना शिक्षक म्हणून जीवन सार्थकी लावते. ते शब्द, विचार, भावना आयुष्यभर शिक्षक विजय यांनी जतन करून ठेवल्या आहेत.
अचीवमेंट्स:
* सन २०१२ मध्ये श्री. विजय शिक्षक म्हणून एका शाळेत कार्यरत असताना ५ वीमध्ये एक विद्यार्थी अन्य शाळेतून आला होता. त्याला मराठी व इंग्रजी काहीच वाचता येत नव्हते. सुरुवातीला विजय यांनी अन्य मुलांप्रमाणे त्याच्या वाचनासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. पण त्याला काहीच येत नव्हते. मग विजय यांनी त्याच्याकडून केवळ एक वाक्य वाचण्याचा प्रयत्न केला, एका दिवसात 15 ते 20 प्रयत्नात एकच वाक्य वाचले तेव्हा त्याचे वर्गात व शाळेत अभिनंदन केले. ‘अरे, तुला तर वाचता येते. तू याही पेक्षा चांगले व सर्व वाचू शकतोस YES,YOU CAN DO IT हा आत्मविश्वास विजय यांनी त्याला दिला दिला. मग त्याने मागे वळून कधीच पहिले नाही. अल्पावधीतच त्याची वाचनातील प्रगती आश्चर्यकारक होती. ‘तू हे करू शकतोस, तुला येते हे शब्द प्रभावी व परिणामकारक ठरले ज्याचा विजय यांनी वेळोवेळी गरजेनुसार उपयोग केला. त्यामुळे मुलांमधील कमीपणाची, न्युनगंडाची भावना जाऊन सकारात्मक बदल घडले. ही त्यांच्यासाठी मोठी अचीवमेंट आहे.
* जून २०१७ मध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थासिंधुदुर्ग येथे इंग्रजी विषय सहाय्यक या पदावर प्रतिनियुक्ती ने विहित पद्धतीने शिक्षक विजय यांची निवड झाली. जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर, NCERT भोपाल येथे विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून १ ली ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन व सुलभन प्रभावी व यशस्वीपणे करता आले.
* महाराणी ताराराणी भोसले,कोल्हापूर या संस्थेने श्री. विजय यांना ‘स्वराज्यरत्न राष्ट्रीय गौरव पुरस्काराने ‘ सन्मानित केले आहे. हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते दिला.
शिक्षक व विद्यार्थीयांच्यासाठी आवश्यक बदल:
प्रत्येक वर्गात व शाळेत ३ प्रकारची मुले असतात खूप हुशार, मध्यमव मागे असलेली मुले. अश्यामागे असलेल्या मुलांच्या बाबतीत अन्य मुले व शिक्षकांनी सुद्धा ‘तू हे करू शकतोस, तुला येईल प्रयत्न कर’, YOU CAN DO IT ‘ असा आत्मविश्वास द्यावा त्यामुळे निश्चित चमत्कार घडेल, तसेच स्वतःमध्ये असलेल्या उणिवांच्या बाबतीत सुद्धा YES, I CAN DO IT हा सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा मग बदल हा ठरलेलाच. शिक्षक व विद्यार्थी यांनी ज्ञानाचा प्रत्येक कान वेचावा.नाविन्याचा ध्यास घ्यावा. असे मत शिक्षक विजय यांनी व्यक्त केले.
शिक्षक व्हायचे आहेत्यांना सल्ला:
असे म्हणतात की ‘उच्चरावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते ‘यातील त्रिसूत्रीचा अवलंब करावा. शिक्षक हा आदर्शच असला पाहिजे, फार मोठा बदल घडवण्याचे सामर्थ्य शिक्षकात आहे हे लक्षात ठेऊन सर्वांनी वागले पाहिजे. असा मोलाचा सल्ला शिक्षक श्री. विजय यांनी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना दिला.