आज आपण शिक्षक श्री. विवेक गोविंद कुलकर्णी (MA , B.ED) यांच्या शिक्षकी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. विवेक सर हे ता. देवगड येथे राहत असून त्यांना अध्यापनाचा एकूण 2४ वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते जि.प.केंद्रशाळा आरे-देवीचीवाडी, ता. देवगड या शाळेत कार्यरत आहेत.
विवेक सर 1991 ला SSC झाले. खरं म्हणजे त्यांना गणित, विज्ञान विषयांची आवड असल्यामुळे 12 वी सायन्स करून पुढे काय करायचे ते ठरवायचे होते. देवगडला पुढील शिक्षणासाठी त्यांना जावे लागणार होते. घरची परिस्थिती बेताची होती. कोणाच्या मदतीची अपेक्षा ठेवणेही त्यांच्यासाठी चुकीचे होते. त्यांच्या मागची तीन भावंडे शिक्षणाची होती. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर कमावता होऊन स्वतःच्या पायावर उभे राहणे अपेक्षित होते. आईच्या वडिलांनी; त्यांच्या आजोबांनी (सेवानिवृत्त शिक्षक) डी. एड. करून लवकर शिक्षक होण्याचा सल्ला त्यांना दिला, आणि स्वतःच त्यांना घेऊन मिठबाव डी. एड. कॉलेजला प्राचार्य मा. आर. आर. लोके साहेबांकडे घेऊन गेले. त्यांनी सर्व प्रोसेस त्यांना समजावून सांगितली. SSC ला मार्क्स चांगले असल्यामुळे प्रवेशही पहिल्या फेरीतच मिळाला. आणि त्यांचा शिक्षक होण्याचा पाया घातला गेला. त्या दोन वर्षांच्या कालावधीत शिक्षकी पेशाविषयी त्यांच्या मनात आवड निर्माण झाली.
विवेक सरांना शालेय जीवनात खूप चांगले शिक्षक लाभले. श्री. सुहास गोगटे गुरुजी व त्यांच्या सौ. गोगटे बाई, श्रीम. पेटकर बाई यांनी त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम केला होता. हायस्कुलला मुख्याध्यापक श्री. माधवराव ओगले सर, श्री. व. ल. वळंजू सर, श्री. दिवाणजी सर, श्रीम. जोशी बाई यांच्या संस्कारात आणि मार्गदर्शनात ते वाढले होते. त्यामुळे अशा आदर्श गुरुजनांचे आदर्श डोळ्यासमोर असल्याने आजतागायत सेवा देत असताना त्यांना कुठेच न्यूनता वा अडचणी भासल्या नाहीत. तसेच मिठबाव डी. एड. कॉलेजचा विद्यार्थी असल्याने त्या दोन वर्षांत चांगलाच तावून सुलाखून निघालेल्या सन्मा. आर. आर. लोकेसाहेबांच्या शिष्याला अडचणींवर कशी मात करायची हे माहीत आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून सेवा बजावताना ते नेहमीच नि:चिंत आहेत. जेवढे देता येणे शक्य आहे तेवढे मनापासून देण्याचा ते प्रयत्न करतात.
मात्र डी. एड. झाल्यानंतर त्यांना तीन वर्षे बेकारीत दिवस काढावे लागले. दुर्दैवाने शिक्षक भरती थांबली होती. आणि संस्थांच्या शाळांमध्ये डोनेशन देऊन नोकरी मिळविण्याएवढी आर्थिक बाजू सक्षम नव्हती. त्यात करून आम्ही ओपन कॅटॅगरीतले. त्यामुळे बेकारीचे कसे दिवस असतात ते त्यांना अनुभवायला मिळाले.
24 वर्षांच्या सेवा कालखंडातील अनेक अनुभव त्यांना आले ; ज्या अनुभवांनी त्यांना उमेद मिळाली, आनंद मिळाला, त्यांना खूप काही शिकता आले.
जिल्हा परिषद, सिंधुदुर्गकडे शिक्षक म्हणून भरती होण्यापूर्वी ऑगस्ट, 1996 ते जून, 1998 या 1 वर्ष 11 महिन्याच्या कालावधीमध्ये जि. प. कोल्हापूर मधील राधानगरी तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा कोनोली गावामध्ये ते रुजू झाले होते. सात-आठ तास चालल्याशिवाय एस. टी. चे दर्शन होणे नाही. फक्त उन्हाळ्याच्या तीन-चार महिन्यांत गावापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरून एस. टी. बस जायची. खूप हलाखीची व बिकट परिस्थिती होती. अतिशय मागास भाग,खूप गरिबी,अशिक्षितपणा असे ते गाव होते.
अशा गावात साक्षरता अभियान कार्यक्रमाचे अनुधावन लागले होते. कधीही गावाकडे न फिरकणारे अधिकारी वाट काढत गावात आले. तयारी सुरु झाली. नियोजनामागून नियोजने आली. मिटिंगा बसल्या. गावातील पुढारी, ग्रामसेवक आणि केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, BDO यांच्या शाळेकडे भेटी वाढल्या. दोन शिक्षकांना आणि शाळेला केंद्रस्थानी ठेवून सर्व काही घडत होते. स्वयंसेवक नेमले. वाडी-वस्तीमधून नवसाक्षरांचे वर्ग घेण्यासाठी जागा ठरविल्या. रंगरंगोटी, स्लोगन, सजावट झाली. गावातील नवसाक्षरांचे वर्ग सुरु झाले. गावातील प्रत्येक घर आणि घर पिंजून काढले.
येणाऱ्या टीमचे आगत-स्वागत, पाहुणचार याचे नियोजन, अहवाल तयार करणे, फाईली रंगविणे. सर्व काही केले. SNDT विद्यापीठाची टीम सर्व पाहून खुश झाली. चांगले रिपोर्ट केले. अधिकारी वर्ग बेहद्द खुश झाले . गावातील ग्रामस्थांच्या समोर या दोन्ही शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळाली. पंचायत समिती राधानगरी येथे बोलावून स्वतः गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.
शिक्षक सेवेच्या पहिल्याच वर्ष-दीड वर्षांच्या कालावधीत अशाप्रकारे जबाबदारी उचलण्याची एक संधी मिळाली आणि तीसुद्धा एका परजिल्ह्यात कार्यरत असताना. व्हिएक सरांसाठी हे सर्व उमेद देणारे होते एवढे निश्चित.
विवेक सरांची आतापर्यंतची मोठी Achievement :
◆ शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, सिंधू टॅलेंट सर्च एक्झाम, ब्रेन डेव्हलपमेंट एक्झाम यांसारख्या शासकीय व खाजगी स्पर्धा परीक्षांना अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
◆क्रीडास्पर्धा व ज्ञानी मी होणार स्पर्धांमध्ये अनेक वेळा कबड्डी, गीतगायन व प्रश्नमंजुषा स्पर्धेमधून तसेच ऍथलेटीक्समध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हास्तरावर प्राविण्य मिळविले आहे.
◆पं. स. देवगड यांच्याकडून मोठी मिरवणूक काढून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे जे कोडकौतुक केले, तो दिवस अविस्मरणीय होता. त्यामध्ये स्वतः सन्मा. गटशिक्षणाधिकारी व सन्मा. गटविकास अधिकारी, सन्मा. सभापती, उपसभापती पूर्ण दिवसभर त्यांच्या सोबत होते.
◆ अविष्कार फाउंडेशन कडून प्राप्त झालेला गुणवंत शिक्षक पुरस्कार.
◆जि. प. केंद्रशाळा कोटकामते, ता. देवगड या शाळेत कार्यरत असताना त्यावेळच्या त्यांच्यासह शिक्षक सन 2004 ते 20006 या कालावधीत विद्यार्थ्यांचा ‘नृत्य गीत रामायण’ चा कार्यक्रम बसविला होता. जिल्हाभरात सुमारे 35 प्रयोग सादर झाले होते. कणकवली येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात त्यांना नृत्य गीतरामायण सादर करायची संधी मिळाली होती. तो कालावधी त्यांच्यासाठी खूप अविस्मरणीय व त्यांची ओळख देणारा ठरला.
◆प्राथमिक स्तरापपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गुणात्मक मूलभूत शिक्षण मिळायला हवे.
◆विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये जी एकप्रकारची अनास्था जाणवायला लागली आहे, ती घालवण्यासाठी वर्गोन्नतीच्या निर्णयाचा निदान प्राथमिक स्तरावर तरी पुनर्विचार होणे गरजेचे वाटते.
◆शिक्षणावरील गुंतवणूक वाढवून शैक्षणिक सोयी-सुविधा निर्माण करून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या असे वाटते.
◆समाजानेही शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी सकारात्मक प्रयत्न करावे. जे आपल्या भावी पिढीसाठी गुंतवणूक ठरतील.
हे वरील बदल समाजात शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी होणे गरजेचे आहे असे त्यांना वाटते.
शिक्षण क्षेत्र हे उद्यमशील आणि पवित्र क्षेत्र आहे. ज्ञानवंतांसोबतच सुसंस्कारीत पिढी निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य अविरतपणे शिक्षक करीत असतो. कळत-नकळतपणे आपले विद्यार्थी आपला आदर्श घेत असतात. त्यामुळे शिक्षकांचीही जबाबदारी वाढते. समाजाचाही शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही सकारात्मकच आहे. शिक्षकाला ते गुरुस्थानीच मानतात. अशा या शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाने आपला विद्यार्थी हा आपला आरसा असतो, याची जाणीव ठेवून आपले अध्यापनाचे कार्य सचोटीने आणि प्रामाणिकपणे करूया असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.