आज आपण श्रीमती वर्षा संदेश घाग (M A B ed, M A education, D S M, Set education) यांच्या शिक्षिका प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. श्रीमती वर्षा या रत्नागिरी येथे राहत असून गेले 19 वर्ष त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
शिक्षिका वर्षा यांना गणित विषय अगदी लहानपणापासून आवडत असे .त्या इयत्ता पाचवीत असताना त्यांचे गणिताचे शिक्षक श्री डी.एच. पाटील सर यांनी त्यांना इयत्ता 9 वीच्या वर्गात नेऊन गुणाकाराचे उदाहरण फळ्यावर सोडवायला सांगितले.ते गणित त्यांनी अगदी बरोबर सोडवले त्यामुळे सर्वानी त्यांचे कौतुक केले . त्यांनाही खूप आनंद झाला तेव्हा त्यांना शिक्षक व्हावे असे वाटले.
शिक्षक होताना त्यांना बऱ्याच अडचणी आल्या. त्यांचे माहेरचे कुटुंब रत्नागिरी तालुक्यातील शेवटचे खाडी किनारी असणारे गाव सैतवडे येथे राहत असे. घरची परिस्थिती अतिशय गरीब होती. त्यांचे वडील त्या 10 वीत असताना देवाघरी गेले. सहा भावंडात त्या सर्वात लहान होत्या. आईच्या एकटीच्या खांद्यावर सर्व जबाबदारी पडली पण त्यांचा वडिलांची इच्छा होती त्यांना शिक्षण देऊन मोठं करायचं .त्यामुळे त्यांच्या आईने त्यांचे शिक्षण थांबवले नाही. डी एड करायचे तर 12 वी व्हायला हवं म्हणून त्यांनी गुहागर मध्ये 11 वी मध्ये ऍडमिशन घेतले. त्या आबलोली ते गुहागर असा रोज 30 किलोमीटर म्हणजे येऊन जाऊन 60 किलोमीटर प्रवास करत असे आणि तेही उपाशीपोटी. सकाळी 6 ला त्या जायच्या ते दुपारी साडे तीन ला घरी (ताईच्या घरी) यायच्या. त्या नंतर त्यांना जेवण करायला वेळ मिळत असे. 12 वी नंतर त्यांनी डी एड ला ऍडमिशन घेतले. ओपन असल्याने कोणतीच शिष्यवृत्ती नव्हती पण समाज कल्याकडून 4 हजार रुपये मदत मिळाली तेवढ खर्चाला मदत झाली. परिस्थिती गरीब असल्याने अनेकजण त्यांच्या आईला म्हणत असत कशाला शिकवता?मुलीचं लग्न करून टाका पण बाबांना दिलेल्या शब्दांमुळे आईने कोणाचंही न ऐकता त्यांना शिक्षण दिले.
शिक्षक म्हणून 19 वर्षाच्या त्यांच्या प्रवासात अनेक अविस्मरणीय प्रसंग घडले पण त्यातील एक प्रसंग – त्या जिल्हा परिषद कासारवेली येथे कार्यरत असताना त्यांना 1 महिन्यासाठी शेजारच्या शाळेत कामगिरी दिली होती. 15 दिवसांनी कासारवेळीच्या शाळेत एक कार्यक्रम होता त्या साठी त्या शाळेत गेल्या. त्या ज्या वर्गाची वर्गशिक्षिका होत्या त्या वर्गातील मुलांनी त्यांना पाहिलं व मुलांना खूप आनंद झाला .सर्व मुलांनी एकत्र येऊन वर्ग सजावट केली.बेंच लावल्या ,फळ्यावर स्वागताचे फलक लेखन केले .नंतर मला हात धरून वर्गात नेले तो क्षण त्यांच्यासाठी खरच खूप अविस्मरणीय होता .
त्यांच्या विद्यार्थ्यांची प्रगती हीच खरी त्यांची achievement आहे .यावर्षी म्हणजे सन 2022 त्यांच्या विद्यार्थ्यांना ब्रेन डेव्हलपमेंटची शिष्यवृत्ती मिळाली व वर्गाचा रिझल्ट 100℅लागला.
सन 2021 मध्ये लायन्स व लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.
तसेच शाळेत कोरोनाच्या लॉकडाऊनच्या कालावधीत देखील इंग्रजी उपक्रम राबवून मुलांची प्रगती केल्याने लीप फॉरवर्ड या राज्यस्तरीय संस्थेकडून त्यांना बेस्ट टीचर व शाळेला बेस्ट स्कूल पुरस्कार मिळाला.
NEP 2020 अंतर्गत NCERT मार्फत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा(NCF) तयार करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल द्वारे School Education विषयाचे District Consultation Report कार्यपूर्ततेसाठी तज्ञ म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली तसेच सलग पाच वर्षाचे गोपनीय अहवालातील शेरे अतिउत्कृष्ट मिळाले.
“आजच्या या स्पर्धेच्या युगात शिक्षक -विध्यार्थी या दोघांनाही ताण आहे .पालकांनी विश्वास ठेवावा. आज पालकांना -समाजाला शाळा म्हणजे जास्तीत जास्त पैसे कमवणारे विध्यार्थी घडवणारा कारखाना वाटतो. हा समज दूर झाला पाहिजे.या अपेक्षा कमी झाल्या पाहिजेत.शिक्षणातून बुद्धी, हृदय व कौशल्य या तिघांचाही विकास झाला पाहिजे.शिक्षण हे देता येत नाही किव्हा घेताही येत नाही ते घडतं. जस जेवण जेवल्यावर पोषण घडतं .
ग्रामीण भागातील शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी शिक्षकांनी मनापासून काम केलं पाहिजे तस गावातील लोकांनीही आपल्या गावची शाळा टिकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेतशाळेत वेगवेगळ्या सुविधा पुरविल्या पाहिजेत. गावच्या मंदिराला जस महत्व दिल जात त्याहीपेक्षा जास्त गावच्या शाळेकडे लक्ष दिले पाहिजे.” असा बदल शिक्षक विद्यार्थी व समाजात घडावा असे त्यांना वाटते.
ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करेन .कारण शिक्षक होण्याचा वसा आपण घेतला आहे.आज समाजात जे जे चांगलं टिकून आहे त्यात मोठा वाटा शिक्षकांचा आहे.आपण देशाचं भविष्य घडविण्याचे काम चांगल्या विचाराने करूया.मुलांसोबत आनंदाने- प्रेमाने वागूया. मुलं जे पाहतात ते अनुकरण करतात. म्हणून आपलं वागणं अनुकरणीय ठेवूया. मुलांना हसायला ,खेळायला देऊया.त्यांच्या चांगल्या गोष्टीच कौतुक करूया. प्रत्येक मूल हे आपलं स्वतःच आहे असं समजून वागूया. आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला अपडेट ठेवून आपलं काम प्रामाणिकपणे करूया. कितीही अंधार असला तरी एक पणती उजेड देऊ शकते .आपण सर्व पणती आहोत .एक एक पणती पेटवून सर्वत्र उजेड लावू शकतो. असा अल्ला त्यांनी शिक्षकाना दिला आहे.